जोशी, नीळकंठ पुरुषोत्तम : (१६ एप्रिल १९२२—१५ मार्च २०१६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे-मुरुड येथील असलेले हे जोशी कुटुंबीय काही काळ मुंबई व नंतर मध्य प्रदेशात वास्तव्यास होते. वडील वैद्यकीय अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते वाराणसी येथे स्थायिक झाले. त्यामुळे नीळकंठ जोशी यांचे शिक्षणही वाराणसी येथेच झाले.

जोशी यांनी प्रथम गुर्जर प्रशाला (सध्याचे गुजरात विद्यामंदिर) आणि नंतर हरिश्चंद्र इंटरमिजिएट कॉलेज येथून उच्च माध्यमिक व शालान्त पदव्या मिळविल्या (१९३९, १९४१). त्यानंतर बनारस हिंदू विश्व विद्यापीठातून त्यांनी ‘प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती’ या विषयात आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्राच्यविद्यापंडित अनंत आळतेकर व वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘मटेरियल सिव्हिलायझेशन ऑफ नॉर्दन इंडिया फ्रॉम सि. २०० बी. सी. टू ३०० ए. डी. अॅज रीव्हील्ड बाय द स्कल्पचर्स, टेराकोटाज अँड कॉइन्स’ या विषयावर पीएच.डी मिळविली (१९५६). हा प्रबंध नंतर बनारस हिंदू विश्वविद्यापीठाने एन्शीयंट उत्तरपथ या शीर्षकाखाली प्रकाशित केला (१९६७). एम. ए. नंतर त्यांनी शिक्षक प्रशिक्षणाची बी. टी. पदवीदेखील मिळविली. ह्याच कालावधीत त्यांना हिंदी साहित्य संमेलनाची ‘विशारद’ पदवीही प्राप्त झाली.

विद्यार्थीदशेपासूनच ‘चंद्रमौली’ या टोपणनावाने त्यांनी अनेक लघुकथा, कविता, निबंध व एकांकिका लिहिल्या. सन्मार्ग, आज, गीताधर्म, त्रिपथगा, श्रीकृष्णसंदेश, वसन्ति इ. नियतकालिकांतून त्यांचे लेखन नियमितपणे प्रसिद्ध होत असे. १४-१५ व्या शतकांतील विष्णुदास या कवीने रचलेले रुक्मिणी मंगल हे काव्य त्यांनी संपादित केले (१९७३). वाराणसीचे संस्कृत विद्यापीठ, ‘अभिनयज्योती’ तसेच लखनौच्या महाराष्ट्र मंडळासाठी ते संस्कृत आणि मराठी नाटके बसवीत व त्यांत अभिनयही करीत.

जोशी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४६ मध्ये लखनौच्या प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात अभिरक्षक म्हणून केली. त्यानंतर १९५१ मध्ये त्यांची वाराणसीच्या गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेजमध्ये इतिहासाचे व्याख्याते या पदावर बदली करण्यात आली. १९५८ ला याच महाविद्यालयाचे रूपांतर ‘वाराणसेय संस्कृत विश्वविद्यालय’ (आताचे संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय) या संस्थेत करण्यात आले. जोशी येथे प्राचीन इतिहास विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तत्कालीन कुलगुरू आदित्यनाथ झा यांनी विश्वविद्यालयात एक वस्तुसंग्रहालय उभे करायची नवीन जबाबदारी जोशींवर सोपविली. जोशी यांनी आपली सर्व कामे सांभाळून अल्पावधीतच वस्तुसंग्रहालय सुरू केले, तसेच शिल्पे, नाणी, मृण्मूर्ती, हस्तलिखिते, थंका (तिबेटी चित्रे) इ. दुर्मीळ पुराणवस्तुंचा भव्य असा संग्रहदेखील गोळा केला. याच कालावधीत बनारस हिंदू विश्वविद्यालयाने राजघाट येथे केलेल्या उत्खननात सहभागी होऊन त्यांनी प्रत्यक्ष पुरातत्त्वीय स्थळी काम करण्याचा अनुभव घेतला. १९६३ मध्ये ते मथुरा येथील पुरातत्त्वीय संग्रहालयात अभिरक्षक म्हणून काम पाहू लागले. चार वर्षांनी त्यांना संचालकपद प्राप्त झाले; तेथे ते १९८० पर्यंत कार्यरत होते.

मथुरा व लखनौ येथील वस्तुसंग्रहालयांत काम करताना त्यांनी तेथील प्राचीन मूर्तींचा सखोल अभ्यास केला. विद्यार्थीदशेत ते विनायक गणेश भागवत यांच्याकडे संस्कृत शिकले होते. मूर्तिशास्त्राचा अभ्यास करताना जोशी यांना आपल्या संस्कृत अध्ययनाचा फार उपयोग झाला. एका परीने धर्मग्रंथ, पुराणे यांच्या अभ्यासाने जोशी यांच्या मूर्तिशास्त्रातील संशोधनाचाच पाया दृढ केला, असे म्हणता येईल. सुरुवातीला ते आपले मित्र नारायण दत्तात्रय कालेकर यांच्यासह वाराणसीच्या गल्लीबोळात, घाट, देवळे, झाडाखाली, अगदी एखाद्या घराच्या आवारात वा कचऱ्यात पडलेली शिल्पे तसेच शिल्पावशेष शोधून, त्यांचे छायाचित्रण व रेखाटन करून त्यांचा अभ्यास करीत. या कष्टप्रद सायासांमुळेच मथुरा आणि गंधार शिल्पशैलीप्रमाणेच वाराणसीचीही स्वतंत्र शिल्पशैली विकसित झाली होती, असा खातरीलायक निष्कर्ष जोशी यांना काढता आला.

मथुरा संग्रहालय म्हणजे मथुरा शैलीतील शिल्पकलेचा खजिनाच होता. अभिरक्षक असल्यामुळे संग्रहालयाच्या कोठारात दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या शेकडो मूर्ती सूक्ष्मपणे अभ्यासणे त्यांना शक्य झाले. परिणामत: मथुरा शिल्पशैलीच्या १०० अजोड मूर्तींचा समावेश असलेली तालिका मथुरा की मूर्तिकला या नावाने हिंदीत व मथुरा स्कल्पचर्स या शीर्षकाखाली इंग्रजीत प्रकाशित झाली आणि हा अनमोल ठेवा समाजासमोर आला.

लखनौच्या संग्रहालयात असताना त्यांच्या प्रयत्नामुळे विविध प्रकारच्या संग्रहांना वाहिलेल्या तालिका प्रकाशित झाल्या. त्यांपैकी कॅटलॉग ऑफ ब्राह्मनीकल स्कल्पचर्स इन स्टेट म्युझियम, लखनौ’ – भाग १ व २ ही जोशी यांनी स्वतंत्रपणे, तर कॅटलॉग ऑफ गंधार स्कल्पचर्स ही ए. के. श्रीवास्तव यांच्यासह लिहिलेली आहे. आयकोनोग्राफी ऑफ बलराम (१९७९), मथुरा स्कल्पचर्स, मातृकाज–मदर्स इन कुषाण आर्ट (१९८६), तपस्विनी पार्वती (१९९६) ही जोशी यांची इंग्रजी व हिंदी भाषेतील ग्रंथसंपदा. त्यांतील पार्वती, बलराम ही पुस्तके मराठीतही अनुवादित झाली. याशिवाय त्यांचा मराठीतील भारतीय मूर्तिशास्त्र (१९७९) हा ग्रंथ मूर्तिशास्त्राच्या अभ्यासातील मैलाचा दगड ठरावा. त्यांची दुर्वांकूर, उपदेवता–एक स्वतंत्र अध्ययन (२००१), देवपूजन विधी की सांस्कृतिक मीमांसा (२००२) ही पुस्तकेही उल्लेखनीय आहेत. १९७२ मध्ये त्यांनी वस्तुसंग्रहालये आणि पुरातत्त्व या विषयांना वाहिलेले नियतकालिक सुरू केले, ते अल्पावधीतच संशोधनक्षेत्रात लोकप्रिय झाले. मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांतून त्यांनी २५० हून अधिक संशोधनपर लेख लिहिले. ‘बिहार राष्ट्रभाषा परिषद’ येथे भारतीय मूर्तिशास्त्रावर त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा संग्रह पुढे भारतीय मूर्तिकला या शीर्षकाखाली हिंदीत प्रकाशित झाला. ग्रोव्ह्ज मेमोरियल लेक्चर्स (१९८२), डॉ. व्ही. एस. अग्रवाल मेमोरियल लेक्चर्स (१९९९), डॉ. मोतीचंद्र मेमोरियल लेक्चर्स (२००२), डॉ. आर. के. मुखर्जी मेमोरियल लेक्चर्स (२००२) या व अशा अनेक व्याख्यानमाला त्यांनी गाजविल्या. भारताबाहेरही मूर्तिशास्त्र, पुराणे, प्राचीन भारतीय संस्कृती या विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली.

मथुरा, लखनौ आणि अलाहाबाद येथील संग्रहालयांच्या तज्ज्ञ समितीवर ते काही काळ होते. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठात ते ‘भारतीय मूर्तिशास्त्र’ या विषयाचे अतिथी व्याख्याते होते (१९८२). पांचाल शोध संस्थान, कानपूर या संस्थेच्या ते अध्यक्षपदावर होते (१९९३-९६). वाराणसीतील ‘ज्ञानप्रवाह’ या भारतीय संस्कृतीला वाहिलेल्या संस्थेशी जुळलेले त्यांचे भावबंध शेवटपर्यंत कायम राहिले. निवृत्तीनंतर त्यांनी तेथे मानद ‘आचार्य’ हे सन्माननीय पद भूषविले व हिंदू शिल्पशैलीसंबंधी शिल्पसहस्रदल हा त्रिखंडात्मक बृहत्कोश पूर्ण केला. दीर्घकाळ ते इंडियन आर्ट हिस्ट्री काँग्रेसचे सदस्य व पदाधिकारी होते. पुण्याच्या डेक्कन कॉलेज या स्वायत्त संस्थेने मानद ‘डी. लिट्’ देऊन त्यांचा गौरव केला (२००८). एम. एन. पी. तिवारी व कमल गिरी यांनी बिल्वपत्र–ट्रेजर्स ऑफ इंडियन आर्ट (२०१३) या ग्रंथाद्वारे जोशी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.

‘कीर्तनकार’ हा जोशी यांचा आणखी एक विशेष. भागवत यांच्या भक्तीसंप्रदायाच्या प्रभावाने ते कीर्तन शिकले. भक्ती व लोकसंगीताचा वारसा जपणे या हेतूने वाराणसीच्या काही देवळांत विशेष प्रसंगी ते नारदीय कीर्तन करीत.

वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Joshi, M. N. ‘Nilakantha Purushottam Joshi : Person and Personality’ Bilvapatra – Treasures of Indian Art, New Delhi, 2013.
  • Giri, Kamal, ‘Obituary : Dr.Neelkanth Purushottan Joshi (16th April 1922-15th March 2016)’, Kala – The Journal of Art History Congress, Vol – XXII, 2016-17.

                                                                                                                                                                           समीक्षक : मंजिरी भालेराव