देगलूरकर, गोरक्षनाथ बंडामहाराज : (१० सप्टेंबर १९३३). प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ; मंदिरस्थापत्य, मूर्ती व शिल्पवैभवाचे ख्यातकीर्त संशोधक आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती. मराठवावाड्यातील हिप्परगा (ता. लोहारा, जि. लातूर) येथे हरीभक्तपरायण देगलूरकर घराण्यात जन्म. चुलते धुंडामहाराज देगलूरकर यांची ज्ञानेश्वरीवरील प्रवचने व कीर्तने त्यांना लहानपणापासून ऐकायला मिळाली. घरातूनच संतवाङ्मय आणि भक्तीसंप्रदायाचा वारसा लाभला. पंढरपूरसारख्या तीर्थस्थळी त्यांचे बालपण व्यतीत झाले. शालेय शिक्षण पंढरपूर आणि हैदराबाद येथे झाले. नंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथून इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांत बी. ए. (१९५५), तर उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथून एम. ए. (इतिहास) उत्तीर्ण (१९५९).

डेक्कन कॉलेजचे माजी संचालक शां. भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठातून ‘कल्चरल हिस्टरी ऑफ मराठवाडा विथ स्पेशल रेफरन्स टू ओल्ड मॉन्युमेंट्सʼ या विषयावर पीएच्.डी. मिळवली (१९७२). या दरम्यान ते औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात इतिहासाचे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत राहिले (१९६३–६८). पुढे नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभाग येथे अधिव्याख्याता म्हणून काम केले (१९६८–८०). यावेळी त्यांनी ‘टेम्पल आर्किटेक्चर अँड स्कल्पचर ऑफ महाराष्ट्रʼ हा विदर्भ-मराठवाड्यातील मंदिरांचे वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, मूर्तिशास्त्र संबंधीचा विस्तृत चिकित्सा करणारा प्रबंध लिहिला. या प्रबंधासाठी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्याकडून डी.लिट्. पदवी प्रदान करण्यात आली (१९७६). प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व या विषयांत डी.लिट्. मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच अभ्यासक ठरले. नागपूर विद्यापीठात असतानाच देव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पवनी (जि. भंडारा) येथील उत्खननात सहभाग घेतला. तसेच भोकरदन, मांढळ इ. ठिकाणांच्या उत्खननांतही त्यांनी भाग घेतला. त्यांमध्ये सापडलेल्या मूर्तिशिल्पांचा त्यांनी अभ्यास केला. उदा., भोकरदन येथील हस्तिदंत स्त्री प्रतिमा. तसेच मांढळ येथील वाकाटककालीन अष्टमूर्ती शिव, द्वादश सर्वपार्श्वमुख शिव, नैगमेष, त्रिपुरांतक शिव इ. मूर्तींची ओळख त्यांनीच सर्वप्रथम संशोधकांना करून दिली.

देगलूरकर डेक्कन कॉलेज, पुणे येथे प्रपाठक म्हणून रुजू झाले (१९८०–९३). या काळात त्यांनी श्रीविठ्ठल उपासना व भारतीय मूर्तिशास्त्र या विषयांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. याला नैमित्तिक कारण घडले ते म्हणजे डेक्कन कॉलेजने प्रसिद्ध केलेला फ्रेंच संशोधक फादर दलरी यांचा कल्ट ऑफ विठोबा हा ग्रंथ. या ग्रंथाचा आधार घेऊन अभ्यासकांनी वीरगळाचा विठ्ठल झाला अशी संकल्पना मांडली होती. देगलूरकरांनी ही संकल्पना मूर्तिशास्त्राच्या आधारे तपासली आणि विठ्ठलाची मूर्ती ही योगस्थानक आहे, असे प्रतिपादन केले. त्यांनी रायपूर, बोरगांव, माहुरझरी या विदर्भातील आणि शिऊर (जि. नांदेड) या अनुक्रमे महापाषाणीय व ऐतिहासिककालीन पुरास्थळांचे उत्खनन केले. त्यातूनच त्यांचा मेगॅलिथिक रायपूर हा ग्रंथ तयार झाला. या ग्रंथलेखनाच्या अनुषंगाने त्यांना पुढे इंग्लंडमधील ब्रिटिश म्यूझीअममधील वस्तूंचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. याशिवाय त्यांनी १९८१ पासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे आणि इतिहास विभाग, पुणे विद्यापीठ येथे अभ्यागत व्याख्याता म्हणूनही काम पाहिले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे चालविण्यात येणाऱ्या भारतविद्या अभ्यासक्रमांची निर्मिती, अध्ययन व संशोधन यामध्ये त्यांचा अनेक दशके सहभाग होता. पुढे त्यांना या विद्यापीठाकडून डी.लिट्. पदवी प्रदान करण्यात आली (२०१३).

देगलूरकरांनी बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म या दोन अभिनव संकल्पना मांडल्या. ज्या वास्तूत गेल्यावर ब्रह्माचे आकलन होते ती वास्तू म्हणजे वास्तुब्रह्म; तर या ब्रह्माचे आकलन ज्या मूर्तीमुळे होते ती मूर्ती म्हणजे बिंबमूर्ती होय. हिंदू मूर्तिशास्त्रातील तत्त्वे आणि विकास यांच्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे ‘अल्टिमेट इन हिंदू आयकॉनॉग्रफीʼ हा विषय त्यांनी पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठातील कर्णिक व्याख्यानमालेत मांडला. त्यांनी भारतासह ब्रिटिश म्यूझीअम (लंडन); रोम, नापोली व पाँपेई (इटली); लॉस अँजेल्स व शिकागो (अमेरिका); बोरोबूदूर, प्रबानन, डीआंगप्लॅटो (इंडोनेशिया) इ. ठिकाणी आमंत्रणावरून अभ्यास-व्याख्यान दौरे काढले.

प्राचीन भारतीय इतिहास, पुरातत्त्व, भारतीय मंदिर स्थापत्य, शिल्पकला, मूर्तिशास्त्र या विषयांवर देगलूरकरांचे सुमारे शंभराहून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी ६ इंग्रजी व १० मराठी ग्रंथांचे लेखन केले असून त्यामध्ये बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म, सुरसुंदरी, दुर्गम दुर्ग देवगिरी, मार्कंडी मंदिरे, विष्णूमूर्ते नमस्तुभ्यम्, शिवामूर्तये नम:, वेरूळ दर्शन, घारापुरी दर्शन, कोप्पेश्वर मंदिर, मेडिव्हल टेम्पल्स ऑफ सातगाव इत्यादींचा समावेश होतो. १९९० च्या दशकात त्यांनी दै. सकाळमध्ये ‘अरूपाचे रूप’ ही मूर्तिशास्त्रावरील लेखमाला लिहून सर्वसामान्य लोकांना सोप्या शैलीत या शास्त्राचा परिचय करून दिला. त्यांना के. के. बिर्ला अधिछात्रवृत्ती मिळाली (१९९३-९६). यातूनच त्यांचा पॉर्टे्अल ऑफ द विमेन इन द आर्ट अँड लिटरेचर ऑफ द एन्शंट डेक्कन  हा ग्रंथ साकार झाला. भारतीय इतिहास संकलन समितीने महाराष्ट्रातील नाशिक, पैठण, कोल्हापूर इ. शहरांविषयी विशेष चर्चासत्रे घेतली होती. या ठिकाणी वाचल्या गेलेल्या निबंधांचे त्यांनी संपादन करून या शहरांचे विविधांगी स्वरूप ग्रंथरूपाने अभ्यासकांसमोर उलगडले. तसेच जेष्ठ इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी यांच्या इंग्रजी ग्रंथांचे व लेखांचे संपादन त्यांनी केले. डी. एन. झा लिखित एका पुस्तकाचा मौर्योत्तर आणि गुप्तकालीन राजस्वपद्धती हा त्यांचा अनुवादित ग्रंथही महत्त्वपूर्ण आहे.

प्राचीन कला व स्थापत्यविषयातील भरीव योगदानासाठी त्यांना छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूरच्यावतीने जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार (२००७), महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेतर्फे इतिहासाचार्य न. र. फाटक पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार, हर्डीकर फाउंडेशनतर्फे पुरस्कार, स्नेहांजली पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, श्रीगुरुजी पुरस्कार, सुहृद कोहिनूर पुरस्कार, पूना क्लबचा प्राईड ऑफ पुणे पुरस्कार, टागोर नॅशनल अधिछात्रवृत्ती, तसेच पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) तर्फे ३१ वा पुण्यभूषण पुरस्कार (२०१९) अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

देगलूरकर यांनी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती हे पद भूषविले (२००६–१६). विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर व महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था या संस्थांचे कार्यवाह; राजा केळकर संग्रहालयाचे व महाराष्ट्र दर्शनिका विभागाचे सल्लागार; मराठी विश्वकोश प्राचीन ऐतिहासिक काळ ज्ञानमंडळ तसेच भारतीय इतिहास संकलन समिती, संस्कार भारती अशा प्रतिष्ठीत संस्थांच्या समित्यांवर तज्ज्ञ सभासद म्हणून ते कार्यरत आहेत. याशिवाय २०१९ मध्ये कंबोडिया देशातील अंगक्वोर वाट येथील अखिल विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

संदर्भ :

  • पाठक, अरुणचंद्र; ताठे, विद्याधर, संपा., प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा  : शिल्पकार चरित्रकोश, खंड ८, भाग १, पुणे, २०१८.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              समीक्षक : गिरीश मांडके