मध्य प्रदेशातील एक प्राचीन शिलालेख. सांचीपासून सु. १२ किमी. अंतरावर आणि विदिशा रेल्वे स्टेशनपासून सु. ५ किमी. अंतरावर बेसनगर येथे हा हेलिओडोरसचा गरुड-स्तंभ शिलालेख आहे.

हेलिओडोरसचा गरुड-स्तंभ, बेसनगर, मध्य प्रदेश.

या स्तंभाचा शोध सर्वप्रथम अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी १८७७ साली लावला. परंतु त्यावेळी स्तंभाभोवती शेंदूर फासल्याने त्यांना त्या खाली दडलेला शिलालेख दिसू शकला नाही. या स्तंभाशेजारीच एक पुजारी राहत होता व ‘खंबा बाबा’ किंवा ‘खाम बाबा’या नावाने या स्तंभाची पूजा केली जात होती. पुढे १९१० च्या सुमारास एच. एच. लेक यांच्या नेतृत्वाखाली पुरातत्त्ववेत्त्यांच्या एका गटाने या ठिकाणाला भेट दिली. शेंदूर काढल्यानंतर त्या खालील शिलालेख उजेडात आला. जॉन मार्शल यांनी या शिलालेखाची व्यवस्थित नोंद करून घेतली. त्यानंतर १९१३ आणि १९१५ च्या दरम्यान डी. आर. भांडारकर यांनी स्तंभ-परिसराचे सर्वप्रथम उत्खनन केले. परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही. दुसरे उत्खनन १९६३-१९६५ च्या दरम्यान एम. डी. खरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी स्तंभासमोरील टेकडीचेही उत्खनन करण्यात आले. उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष, तसेच प्राचीनकाळी गरुड-स्तंभासारखे अजून सात स्तंभ अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. गरुड-स्तंभाचे उर्वरित अवशेष ग्वाल्हेर येथील गुजरी महल संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. या शिलालेखाचे विश्लेषण ई. जे. रॅप्सन, विष्णु सीताराम सुकथनकर, रिचर्ड सालोमन व शेन वॅलेस इत्यादी विद्वानांनीही केले.

अभिलेखाचे दोन भाग असून एकात सात, तर दुसऱ्यात केवळ दोनच ओळी आहेत. या लेखाची ब्राह्मी लिपी सम्राट अशोकाच्या अभिलेखाच्या नंतरची व हाथीगुंफा तथा नाणेघाटच्या लिपीपेक्षा जुनी आहे. त्यामुळे विद्वानांनी या स्तंभलेखाचा काळ इ. स. पू. दुसरे शतक ठरविला आहे. शिलालेखाची भाषा प्राकृत असून काही संस्कृतच्या वळणाचे शब्दही दिसून येतात. हा लेख कोणी कोरवून घेतला, हे जरी अस्पष्ट असले तरी या मागे स्वतः हेलिओडोरस असावा असा कयास बांधला जातो.

गरुड-स्तंभावरील शिलालेख, बेसनगर, मध्य प्रदेश.

या अभिलेखाचा मूळ पाठ असा आहे :

भाग-१

[दे]वदेवस वा[सुदे]वसगरुडध्वजे अयं

कारितो इ[अ] हेलिओदोरेण भाग

वतेन दियस पुत्रेण तख्खसिलाकेन

योनदूतेन आगतेन महाराजस

अंतलिकितस उप[म]ता सकासं रायो

कासीपुत्रस [भा]गभद्रस त्रातारस

वसेन [चतु]दसेन राजेन वधमानस

भाग-२

त्रिनि अमुतपादानि [?] [सु]अनुठितानि

नेयन्ति [स्वगं] दम चाग अप्रमाद

अर्थ : देवांचेही देव वासुदेव याचा हा गरुडध्वज येथे भागवत हेलिओडोरस द्वारा स्थापित केला गेला, जो दियचा पुत्र, तक्षशिलेचा निवासी, महाराज अंतलिकितकडून राजा काशीपुत्र भागभद्र त्राता वर्धमानाकडे त्याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षी आलेला यवन दूत होता.

दम, त्याग आणि अप्रमाद या तीन अमृतपदांचे व्यवस्थित पालन केल्यास स्वर्गप्राप्ती होते.

अंतलिकितस हा एक इंडो-ग्रीक (भारतीय यवन) राजा होता. भागभद्र या राजाविषयी अनेक मतभेद असले, तरी हा संभवतः शुंग वंशाचा किंवा एखादा स्थानिक राजा असावा असे समजले जाते.

प्राचीन भारतीय इतिहासाच्या दृष्टीने हा शिलालेख खूप महत्त्वाचा आहे. यामुळे मौर्योत्तर काळ विशेषतः भारतीय–यवन इतिहासात भर पडते. तसेच पश्चिमोत्तर भारतावर राज्य करणाऱ्या अंतलिकितसची तिथी निर्धारित करण्यास मदत मिळते. त्यामुळे अन्य यवन राज्यांची तिथीही स्पष्ट होते. या शिलालेखावरून हेही लक्षात येते की, तक्षशिला हे अंतलिकितसच्या राज्यात मोडत होते व तो भागभद्राशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू इच्छित होता. हा भारतातील पहिला लेख आहे, ज्यावरून राजनीतिक दौत्यकर्माविषयी माहिती मिळते.

हा शिलालेख वैष्णव पंथाच्या इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. शिलालेख व गरुड-स्तंभामुळे हे स्पष्ट होते की, विदिशा इ. स. पू. दुसऱ्या शतकात वैष्णव पंथाचे एक मुख्य केंद्र होते. वासुदेवाला देवांचा देव अर्थात सर्वोच्च देवता म्हणून पूजले जात होते. तसेच हा संप्रदाय मध्य-पश्चिमी भारतात तसेच युनानी लोकांतही लोकप्रिय झाला होता. हेलिओडोरस स्वतःला भागवत म्हणवून घेतो, त्यामुळे त्याने संभवतः गीतामहाभारताचे वाचन केलेले असावे. स्वर्गप्राप्ती करून देणाऱ्या तीन अमृतपदांचा उल्लेख महाभारतातही आढळतो.

बेसनगर येथील उत्खननातून प्राचीन मंदिर अस्तित्वात असल्याचे आढळून आलेले आहे. स्तंभ व मंदिर वासुदेव संप्रदायाचे सर्वांत प्राचीन पुरातत्त्वीय उदाहरण मानले जाते.

हा शिलालेख भाषिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या अभिलेखाच्या भाषेवर युनानी प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. जसे यात भागभद्रासाठी प्रयुक्त ‘त्रातार’ उपाधी स्पष्टतः युनानी ‘sotres’ (रक्षक) चे प्राकृत रूप आहे. देवदेवस वासुदेवास (देवतांचे देव) अशा बिरुदावल्या लावण्यामागे युनानी प्रभाव दिसून येतो. यात अंतलिकितससाठी प्रयुक्त उपाधी ‘महाराज’ ही यवन प्रभावाची सूचक आहे. कारण या काळापर्यंत भारतीय राजे स्वतःला ‘राजन’ म्हणायचे. महाराज व राजाधिराज अशा उपाधी ग्रीक व शक राजांनी प्रचलनात आणल्या होत्या. या शिलालेखातही अंतलिकितसला महाराज तर भागभद्राला राजा या उपाधीचा प्रयोग केलेला आहे. यावरून असे दिसते की, हा शिलालेख जरूर एखाद्या युनानी किंवा स्वतः हेलिओडोरसनेच कोरवून घेतलेला असावा.

संदर्भ :

  • Bhandarkar, D. R. ‘Excavations at Besnagar’, Annual Report 1913-1914, Archaeological Survey of India, Government of India Press, 186-225, 1915.
  • Irwin, John,‘The Heliodorus Pillar at Besnagar’, Purattatva, 8 : 166-176, 1974.
  • Khare, M. D. ‘Discovery of a Vishnu temple near the Heliodorus pillar, Besnagar, Dist. Vidisha (MP)’, Lalit Kala, 13:21-27, 1967.
  • Khare, M. D. ‘The Heliodorus Pillar – A Fresh Appraisal : A Rejoinder’, Proceedings of the Indian History Congress, 36 : 92-97, 1975.
  • Rawlinson, H. G., Bactria : The History of a forgotten Empire, London,1912.
  • Salomon, Richard, Indian Epigraphy, New York, 1998.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                         समीक्षक : रूपाली मोकाशी