चर्चमन, चार्ल्स वेस्ट : ( २९ ऑगस्ट, १९१३ ते २१ मार्च, २००४ )
चर्चमन यांनी तत्त्वज्ञान विषयात बी.ए., एम.ए. आणि पीएच्.डी. या पदव्या अमेरिकेतील पेनसिल्वानिया विद्यापीठातून प्राप्त केल्या. ‘Propositional Calculus’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.
दुसऱ्या महायुद्धात त्यांनी अमेरिकेच्या लष्करी साहित्य-संबंधीच्या प्रयोगशाळेत गणिती विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. तेथे चर्चमन यांनी बायोएस्सेच्या (bio-assay) सांख्यिकी पद्धती वापरून युद्धसामुग्रीतील लघु हत्यारे व दारुगोळा तपासणीसाठी काही नव्या नमुना-प्रणाली विकसित केल्या. तसेच द्रुतगती छायाचित्रीकरण करुन स्फोटाबाबत गणिती सिद्धांत अभ्यासले. या सर्व कामातून अनुरूप गणिती प्रारूपे विकसित करुन व्यावहारिक प्रश्न सोडवण्याच्या कल्पना त्यांच्या मनात रुजल्या आणि ते तत्त्वज्ञानाकडून प्रवर्तन संशोधन या विषयाच्या स्थापना आणि विकासाकडे वळले.
ते १९४५-५१ दरम्यान पेनसिल्वानिया विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर १९५१-५७ या काळात ओहायो राज्यातील त्यावेळची केस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेत ते अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक होते. चर्चमन यांनी त्यांचे पूर्वीचे पीएच्.डी.चे विद्यार्थी आर. एल. एकॉफ (R. L. Ackoff) यांच्यासोबत प्रवर्तन संशोधनाचा जगातील पहिला पदवी पाठ्यक्रम तेथे सुरू केला. चर्चमन यांनी आपला युद्धकाळातील अनुभव कल्पकतेने वापरुन नागरी प्रश्न प्रवर्तन संशोधनाने कसे सोडवावेत याचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले. नंतर ते बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले आणि शेवटपर्यंत तिथे मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. अनेक व्यावसायिक आणि शासकीय व सामाजिक संस्थांना त्यांनी सल्लागार म्हणून आपली सेवा दिली.
त्यांचे प्रवर्तन संशोधनातील मुख्य काम सांख्यिकी नमुना निवडीचे उपयोजन आणि मूल्यमापन (value measurement) यावर होते. चर्चमन मुळचे तत्त्वज्ञानी असल्यामुळे मानवी मूल्ये यांचे मूल्यमापन आणि प्रवर्तन संशोधन यांची सांगड घालण्याचे कार्य त्यांनी शेवटपर्यंत केले.
आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत चर्चमन यांनी विविध विषय हाताळून त्यांत प्रभावी भर घातली. ते विषय असे आहेत : लेखा परीक्षण, प्रवर्तन संशोधन, व्यवस्थापन, संशोधन व विकास, नगर नियोजन, तंत्रज्ञानाचे परिणाम, शिक्षण, मानसिक आरोग्य, अंतराळ शोध आणि शांती व विवादांचा अभ्यास. कुठलीही प्रणाली विकसित करताना आणि सेवा पुरवताना नैतिक मूल्ये पाळलीच पाहिजे या मताचा आग्रह, काही वेळा विरोध पत्करूनही चर्चमन यांनी आयुष्यभर धरला.
त्यांनी १५ पुस्तके लिहिली आणि अन्य १० पुस्तकांचे संपादन केले. १९५७ साली त्यांनी आर. एल. एकॉफ आणि इ. एल. अर्नोफ (E. L. Arnoff) यांच्यासोबत Introduction to Operations Research हे पुस्तक प्रसिद्ध केले. ते प्रवर्तन संशोधन या विषयातील पहिले पाठ्यपुस्तक होते आणि आजही ते वापरले जाते.
अमेरिकन फिलोसोफी ऑफ सायन्स असोसिएशनचे ते १९४६-५४ दरम्यान कार्यवाह होते. ऑपरेशन्स रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिका तसेच द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट सायन्सेस (टीआयएमएस) या जगप्रसिद्ध संस्थांच्या स्थापनेत त्यांचा मोठा हात होता. ते टीआयएमएसचे अध्यक्ष तसेच द इंटरनॅशनल सोसायटी फॉर द सिस्टिम्स सायन्स या संस्थेचेही अध्यक्ष होते.
फिलॉसॉफी ऑफ सायन्स या जर्नलचे ते दहा वर्षे संपादक होते तर मॅनेजमेण्ट सायन्स या जर्नलला जागतिक दर्जावर नेण्याचे अतुलनीय काम त्याचे प्रथम प्रमुख संपादक या नात्याने त्यांनी केवळ सहा वर्षात केले.
चर्चमन यांना बहुविध मान-सन्मान प्राप्त झाले. उदा., अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनचे फेलो, चॅलेंज टू रिझन या व्यवस्थापन विषयावर सर्वोत्तम पुस्तक म्हणून अकॅडेमी ऑफ मॅनेजमेण्टचे पारितोषिक, द सिस्टिम्स ॲप्रोच या पुस्तकासाठी मेकिंसे (McKinsey) पारितोषिक, अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून मानद पदव्या, माहिती प्रणाली या विषयात उल्लेखनीय योगदानाबद्दल एलइओ हा जीवनगौरव पुरस्कार, आयएनएफओआरएमएसचे (INFORMS) फेलो आणि द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑपरेशनल रिसर्च सोसायटीजच्या हॉल ऑफ फेम या यादीत समावेश.
प्रश्नाचा विचार स्थानिक पातळीवर करावाच, परंतु त्याचा व्यापक व्यवस्थेवर (whole system) होणाऱ्या परिणामाचा विचारही सोबत केला जावा, ही त्यांची भूमिका होती. त्यांच्या मते तत्त्वज्ञानाचा अभ्यास केवळ शैक्षणिक न राहाता त्याचा वापर व्यावहारिक जगात केला गेला पाहिजे आणि म्हणूनच व्यावसायिक सल्ला देतानाही ते नैतिक बाजू उचलून धरत. प्रवर्तन संशोधन या विषयाला गणिती तसेच तत्त्वज्ञानाची बैठक देऊन त्याची उपयुक्तता आणि समर्पकता उच्च पातळीवर नेण्याचे महत्त्वपूर्ण काम चर्चमन यांनी केले.
संदर्भ :
- Assad, Arjang A., “C. West Churchman”.Profiles in Operations Research. International Series in Operations Research & Management Science. 147,Springer,2011, 171–200. doi:10.1007/978-1-4419-6281-2_11
- Mason, R. O. IFORS’ Operational Research Hall of Fame, C. West Churchman. International Transactions in Operational Research, 11(5) 2004, 585-588.
- Ulrich, W., “Obituary: C West Churchman, 1913-2004”, The Journal of the Operational Research Society, Vol. 51, No.11, 2004, pp. 1123-1129.http://www.jstor.org/stable/4101883
समीक्षक : विवेक पाटकर