बॅप्टिस्टा, बॅरिस्टर जोसेफ ऊर्फ काका : (१७ मार्च १८६४—१८ सप्टेंबर १९३०). भारतीय राजनीतिज्ञ व भारतातील होमरूल लीग चळवळीचे नेते. काका बॅप्टिस्टा यांचे मूळ नाव जोसेफ. त्यांचा जन्म मुंबईतील माझगाव येथील म्हातारपाखाडी येथे एका महाराष्ट्रीय ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे आई वडील मूळचे भाईंदरजवळील उत्तन गावचे. बॅप्टिस्टा हे मुंबईत कॅथलिक समाजाचे पुढारी मानले जात. जोसेफ बॅप्टिस्टांची देशभक्ती, स्वातंत्र्यप्रेम आणि त्यांच्यामधील कामगार वर्गाच्या कल्याणाविषयी असलेली कळकळ यांमुळे त्यांना ‘मॅझिनी ऑफ म्हातारपाखाडी’ असे म्हटले जाई.
जोसेफ बॅप्टिस्टा यांचे शालेय शिक्षण मुंबईतील माझगाव येथील सेंट मेरीज हायस्कूलमध्ये झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील ‘कॉलेज ऑफ सायन्स’ या संस्थेत आपले नाव दाखल केले. तेथूनच त्यांनी १८८६ साली एल. सी. ई. पदवी मिळविली. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या वनखात्यात अभियंत्याचे काम मिळविले. परंतु तेथे त्यांचे मन रमेना. १८९४ साली आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी कायदा आणि राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास केला व १८९९ मध्ये ‘लॉट्रीपॉस’ मिळविला. त्याच वर्षी इंग्लंडमध्ये त्यांची आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रथम भेट झाली. एका प्रसंगी बॅप्टिस्टा यांनी आयर्लंडमधील होमरूल लीगच्या धर्तीवर भारतामध्येही होमरूल लीग स्थापन करावे, असे लोकमान्य टिळकांना सुचविले. त्या वेळी ‘कदाचित अतिघाई कार्य नाशाला कारणीभूत होईल’ असे टिळकांनी सांगितले. पुन्हा १९०६ साली काँग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांची व बॅप्टिस्टांची भेट झाली असता बॅप्टिस्टांनी पुन्हा एकदा ‘भारतीय होमरूल लीग’ची कल्पना मांडली. तेव्हाही टिळकांनी पुन्हा सबुरीचाच सल्ला दिला.
लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील गाजलेल्या राजद्रोहाच्या खटल्यापासून केवळ ब्रिटिशांचा रोष आपणावर ओढवू नये म्हणून नामवंत वकील दूर राहण्याचा प्रयत्न करीत होते; तेव्हा बॅरिस्टर बॅप्टिस्टांनी धडाडीने आणि नि:स्वार्थीपणे पुढे येऊन त्यांची वकीलपत्रे स्वीकारली. कायद्याचे सल्लागार म्हणून बॅरिस्टर बॅप्टिस्टांचे महत्त्व लोकमान्य टिळकांना फार वाटे. १९०७ साली लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली दुसरा खटला भरण्यात आला. त्या वेळी बॅरिस्टर बॅप्टिस्टांनी टिळकांचे वकीलपत्र घेतले. बॅरिस्टर बॅप्टिस्टांच्या युक्तिवादानंतर लोकमान्य टिळक निरपराध आहेत असेच मत ज्युरीमधील भारतीयांनी दिले. परंतु त्याचे मत विचारात न घेता न्यायमूर्ती दावर यांनी टिळकांना सहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात करण्यात आली. सुरत येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात फूट पडल्यावर टिळकांवर सर्व बाजूंनी टीकेचे काहूर उठले. त्या वेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी बॅरिस्टर बॅप्टिस्टा पुढे सरसावले. त्यांनी मुंबईच्या इंग्रजी वर्तमानपत्रांतून लेख लिहून हिरिरीने टिळकांची बाजू मांडली. लोकमान्य टिळकांनी बॅप्टिस्टांना ‘आपला’ मानले. अखेरपर्यंत दोघांनी एकमेकांना अंतर दिले नाही.
इ. स. १९१५ साली टिळक मंडालेहून परत आल्यावर पुण्यात भरलेल्या राजकीय परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बॅरिस्टर बॅप्टिस्टांनी ‘होमरूल’चा पुनरुच्चार केला. या वेळी मात्र टिळकांनी संमती दिली. १९१६ साली बेळगाव परिषदेत ‘होमरूल लीग’ची स्थापना करण्यात आली. बॅरिस्टर बॅप्टिस्टा यांनाच परिषदेने पहिले अध्यक्ष व केळकरांना सचिव म्हणून निवडले गेले. बॅप्टिस्टा हे इ. स. १९१६ ते १९२६ पर्यंत होमरूलचे अध्यक्ष होते. आयरिश विदुषी डॉ. ॲनी बेझंट यांनीही मद्रासमध्ये एक होमरूल लीग काढली होती. बॅप्टिस्टांनी स्थापन केलेली होमरूल लीग व ॲनी बेझंट यांनी स्थापन केलेली होमरूल लीग एकत्र करण्यास लोकमान्य टिळकांची तयारी नव्हती. उलटपक्षी राष्ट्रसभेचे कार्य करणारे हे संघ लवकरच एक होऊन राष्ट्रसभेखाली कार्य करू शकतील अशी टिळकांची कल्पना होती.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीला ब्रिटिश मजूर पक्षाचा पाठिंबा मिळविण्यासाठी बॅरिस्टर बॅप्टिस्टा यांनी १९१७ साली लंडनला प्रयाण केले. तेथे मजूर पक्षाच्या निरनिराळ्या कार्यकारी मंडळांकडून त्यांना व्याख्याने देण्यासाठी आमंत्रणे येत. स्वराज्य संघातर्फे त्या वर्षी बॅप्टिस्टा एकटेच अशाप्रकारचे कार्य करीत होते. त्यांचे श्रम सार्थकी लागले. मजूर पक्षाचा स्वराज्य संघाला पाठिंबा मिळत होता.
होमरूल चळवळीप्रमाणे कामगार चळवळ हाही बॅरिस्टर बॅप्टिस्टा यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. इ. स. १९१७ साली त्यांनी पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांचा पहिला संप घडवून आणला. परंतु पोस्टातील कारकूनांनी लोकांचे काम करण्याचे पत्करल्याने तो लवकरच मोडला. मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाचे नेतृत्वही बॅप्टिस्टा यांनी केले होते. त्यांच्या या कामगिरीमुळेच गिरणगावातील कामगारांनी त्यांना ‘काका’ ही उपाधी बहाल केली. कामगार संघटनांत ‘काका’ शक्य तेवढ्या नियमबद्ध धोरणांचा पुरस्कार करत आणि कामगारांशी फार प्रेमाने वागत. १९२० साली लाला लजपत राय, बॅरिस्टर बॅप्टिस्टा व दिवाण चिमणलाल या तिघांनी मिळून ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक) ची स्थापना केली. या संघटनेत ५४ कामगार-संघटनांनी व सु. १,४०,८५४ कामगारांनी आपली नावे नोंदविली. शिवाय ४३ संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. इ. स. १९२१ मध्ये झारिया येथील दुसऱ्या ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्षपद बॅप्टिस्टांनीच भूषविले होते. या सभेस ८,००० सभासद उपस्थित होते.
बॅरिस्टर बॅप्टिस्टा यांनी इ. स. १९२५-२६ साली मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्षस्थानही भूषविले होते. त्यांच्या त्या सेवेतील महत्त्वाचे कार्य म्हणजे मुंबईतील भाडेकरूंना महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क प्राप्त करून देणे, हे होते. महानगरपालिकेचे लोकशाही तत्त्वांप्रमाणे रूपांतर करावे, असे त्यांनी ठरवले व त्याप्रमाणे केलेही. महापालिकेचे अध्यक्ष असताना त्यांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे सर्व मुलांना विनामूल्य व सक्तीचे शिक्षण देणे, हे होय. याशिवाय मुंबई शहरातील स्वच्छता, उत्तम घरे, पाण्याची मुबलक सोय, चांगले रस्ते व उत्तम प्रकाशयोजना यांबद्दलचा अहवाल बॅप्टिस्टांनीच सादर केला होता.
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने जी गुणी, त्यागी व कर्तबगार माणसे त्यांच्याकडे आकर्षिली गेली, त्यांत बॅप्टिस्टा एक प्रमुख होते. ‘होमरूल लीग’च्या स्थापनेपासून त्यांचा लोकमान्यांशी जो स्नेह जडला, तो लोकमान्यांच्या मृत्यूपर्यंत टिकला. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर भारताचे राजकारण बदलले. गांधीजींचा सत्याग्रह, असहकार आंदोलन बॅरिस्टर बॅप्टिस्टा यांना मान्य नव्हते. त्यामुळे ते पुढच्या काळात राष्ट्रीय राजकारणापासून अलग पडले; तथापि भारतातील होमरूल चळवळीचे जनक, टिळकांच्या जहाल पक्षाचा खंदा पुरस्कर्ता व कर्तबगार कामगार नेते म्हणून हिंदी स्वातंत्र्याच्या इतिहासात बॅप्टिस्टांचे नाव अजरामर राहील.
संदर्भ :
- Shirsat, K. R. Kaka Joseph Baptista : Father of Home Rule Movement in India, Bombay, 1974.
- फाटक, न. र. लोकमान्य, मुंबई, १९७२.
- https://www.thebetterindia.com/175279/kaka-baptista-unsung-hero-freedom-struggle-india/
- https://timesofindia.indiatimes.com/home/specials/assembly-elections-2014/maharashtra-news/a-forgotten-east-indian-leader-tilaks-aide-is-resurrected-this-election/articleshow/44375480.cms