अस्थिमत्स्य वर्गाच्या सायनोडोंटिडी कुलातील एक मासा. भारतात तो बोंबील या नावाने ओळखतात. बोंबील माशाचे शास्त्रीय नाव हार्पोडॉन नेहेरियस आहे. ते सामान्यपणे उथळ समुद्रात राहतात. भारतापासून चीनपर्यंतच्या नदीमुखांत किंवा किनाऱ्याजवळील समुद्रांत ते आढळतात. मुंबई किनाऱ्याजवळील समुद्रात व बंगालच्या उपसागरात ते मुबलक प्रमाणात दिसून येतात. मुंबईलगत ते मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्यांना ‘बॉम्बे डक’ हे नाव पडले आहे.
बोंबिलाच्या शरीराची लांबी सामान्यपणे सु. २५ सेंमी.पर्यंत असते. पूर्ण वाढलेले बोंबील सु. ४० सेंमी. लांब असू शकतात. शरीर अर्धपारदर्शक असून दोन्ही बाजूंना चपटे असते. पोट रुपेरी पांढरे असते. लांबट व निमुळत्या शरीराच्या टोकाला त्रिशूळासारखा पुच्छपर असतो. डोके मोठे व डोळे बारीक असतात. जिवणी रुंद व खोल असून दोन्ही जबड्यांत बाकदार व असमान दात असतात. खालचा जबडा वरच्या जबड्यापेक्षा मोठा असतो. खालच्या जबड्यातील काही दात भाल्याप्रमाणे टोकदार असतात. पाठीवर किंचित बाक असून पहिला पृष्ठपर हा तोंड आणि शेपूट यांच्या मध्यावर असतो. अधरपर पृष्ठपराच्या खाली असतो.
बोंबील मासा खादाड आहे. प्रारंभीच्या अवस्थेत तो फक्त कोळंबीच खातो. जसजशी त्याची वाढ होत जाते, तसतसे त्याचे अन्न बदलते. प्रौढावस्थेमध्ये त्याच्या आहारात माशांचे प्रमाण वाढते. मांदेली, रावस, दाढा व ढोमा यांची पिले आणि कोळंबी इ. त्याचे भक्ष्य आहे. रुंद जिवणी आणि लांबट जबडा यांमुळे प्रौढ बोंबील मोठ्या आकाराचे भक्ष्य सहज गिळू शकतो. दोन्ही जबड्यांतील दात आत वळलेले, टोकदार आणि लांब असल्यामुळे त्याने पकडलेले भक्ष्य सहजासहजी निसटत नाही. त्याच्या जठरात एका वेळी बरेच अन्न साठलेले असते. अशा बोंबील माशांच्या जठरातील अन्न बाहेरून दिसते.
बोंबील माशामध्ये नर व मादी यांच्यातील फरक प्रथमदर्शनी ओळखता येत नाही. नराची लांबी सु.१७ सेंमी. झाल्यानंतर त्याचे वृषण स्पष्ट दिसू लागते. तसेच मादीची लांबी १२–१४ सेंमी. झाल्यानंतर तिच्या शरीरातील अंडाशय दिसू लागते. मादी सु. २० सेंमी. लांब वाढली की प्रजननक्षम होते. २३–३२ सेंमी. लांबीच्या मादीच्या अंडाशयात २४,००० ते १,४०,००० अंडी असतात. प्रजननकाळात ती दोनदा अंडी घालते.
बोंबील व्यापारीदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. तो ताजा तसेच खारवून-सुकवून खातात. त्यांच्या शरीरात ९०% पाणी असल्यामुळे त्याची कुजण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. कोकण किनाऱ्याला बांबूच्या खास मांडवावर हे मासे सुकविण्यासाठी टांगून ठेवतात. सुकविलेले व खारविलेले बोंबील साठविता येतात. तसेच ते दूरवर पाठविता येतात.