भारत सरकारने स्थापन केलेली एक वैज्ञानिक सर्वेक्षण संस्था. भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था भारतातील विविध प्राण्यांचे संकलन, माहिती, संशोधन, समन्वेषण आणि सर्वेक्षण करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेची स्थापना १ जुलै १९१६ रोजी कोलकाता येथे झाली. एशिॲटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेच्या निसर्गवैज्ञानिकांनी सुरू केलेला प्राणिविज्ञानाचा अभ्यास भारतीय वस्तुसंग्रहालयातील निसर्गेतिहास विभागातील संशोधकांनी तसाच पुढे चालू ठेवला आणि त्यातूनच ‘भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था’ जन्माला आली.

भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : (१) भारतात आढळणारे प्राणी, परिसंस्था आणि आरक्षित क्षेत्र इत्यादींचा शोध घेणे, सर्वेक्षण करणे, गणना करणे, त्यांची देखभाल करणे; (२) गोळा केलेल्या प्राण्यांच्या अवशेषांचा वर्गीकरणशास्त्रानुसार अभ्यास करणे; (३) संकटग्रस्त आणि प्रदेशनिहाय प्राण्यांच्या जातींचा सद्यस्थितीचा आढावा घेणे; (४) भारतातील तसेच राज्यांतील संकटग्रस्त प्राण्यांच्या जातींची यादी करणे; (५) महत्त्वाच्या जातींवर जैव-पारिस्थितिकीय घटकांचा होणारा परिणाम अभ्यासणे; (६) भारतातील नोंदल्या गेलेल्या जातींची माहिती संकलित करणे; (७) राष्ट्रीय प्राणी संग्रहालयांची देखभाल आणि विकास करणे; (८) या क्षेत्रासाठी मनुष्यबळाचा विकास, क्षमताविकास आणि प्रशिक्षण करणे; (९) प्राणिओळख करणे, मार्गदर्शन करणे आणि ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देणे आणि (१०) देशाच्या वेगवेगळ्या भागांतील आणि देशांच्या संवर्धित क्षेत्रातील प्राण्यांची स्थिती प्रकाशित करणे.

भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय सुरुवातीपासून कोलकाता येथे असून देशात या संस्थेची सोळा प्रादेशिक केंद्रे आहेत : (१) उत्तर प्रादेशिक केंद्र, डेहराडून; (२) पूर्व प्रादेशिक केंद्र, शिलाँग; (३) पश्‍चिम प्रादेशिक केंद्र, पुणे; (४) मध्य प्रादेशिक केंद्र, जबलपूर; (५) वाळवंटी प्रादेशिक केंद्र, जोधपूर; (६) दक्षिण प्रादेशिक केंद्र, चेन्नई; (७) गंगाखोरे प्रादेशिक केंद्र, पाटणा; (८) उच्च उंचीवरील प्राणिवैज्ञानिक क्षेत्रीय केंद्र, सोलन (हिमाचल प्रदेश); (९) सागरी जीववैज्ञानिक क्षेत्र, चेन्नई; (१०) अंदमान-निकोबार प्रादेशिक केंद्र, पोर्ट ब्लेअर; (११) गोडे पाणी जीववैज्ञानिक केंद्र, हैदराबाद; (१२) सुंदरबन क्षेत्रीय संशोधन केंद्र, काकद्वीप (पश्चिम बंगाल); (१३) नदीमुखीय जीववैज्ञानिक केंद्र, बेहरामपूर; (१४) पश्‍चिम घाट क्षेत्रीय संशोधन केंद्र, कोझिकोडे (कालिकत); (१५) सागरी मत्स्यालय आणि संशोधन केंद्र, दिघा (पश्चिम बंगाल) आणि (१६) अरुणाचल प्रदेश प्रादेशिक केंद्र, इटानगर.

या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांमध्ये जवळपास ४० लाख प्राण्यांचे नमुने आहेत. यांत सूक्ष्म आदिजीवांपासून ते हत्ती, व्हेल यांसारखे आकारमानाने मोठे प्राणी आहेत. आशियात आढळणारा टिफ्लोपेरिपॅटस हा एकमेव संधिपाद प्राणी आणि आसामात आढळणारे सोनेरी लंगूर (माकड) हे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी संस्थेच्या संग्रहालयात आहेत.

ही संस्था पुढील नियतकालिके प्रसिद्ध करते: (१) रेकॉर्ड्‌स ऑफ द झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (पूर्वीचे नाव रेकॉर्ड्‌स ऑफ द इंडियन म्युझियम ); (२) मेम्वार्स ऑफ द झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (पूर्वीचे नाव मेम्वार्स ऑफ द इंडियन म्युझियम ); (३) ऑकेजनल पेपर्स ऑफ द रेकॉर्ड्‌स ऑफ द झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया; (४) फॉना ऑफ इंडिया (पूर्वीचे नाव फॉना ऑफ ब्रिटिश इंडिया ); (५) टेक्निकल मोनोग्राफ्स; (६) बुलेटिन ऑफ झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया; ˝(७) हँडबुक सीरीज. यांखेरीज बिब्लिओग्राफ्री ऑफ इंडियन झूलॉजी, ॲन्युएल रिपोर्ट ऑफ द झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, स्टेट फॉना सीरीज, इकोसिस्टीम सीरीज, झेडएसआय न्यूज  यांसारखे अहवाल, तसेच सामान्य वाचकांसाठी अर्ध-तांत्रिक स्वरूपाच्या भाषेतील लेखांचा समावेश असलेले ‘झूलॉजियाना’ इंग्रजीतून तसेच ‘प्राणीजगत’ हिंदीतून प्रकाशित केली जातात.

भारत सरकारचे प्राणिवैज्ञानिक सल्लागार आणि भारतीय वन्यप्राणी मंडळाचे सदस्य या नात्याने ही संस्था भारतीय प्राण्यांच्या संरक्षणाचे कार्य करते. भारत सरकारच्या प्राणिसंवर्धन प्रकल्पांत ही संस्था सहभागी झाली आहे. या प्रकल्पांत टोपीवाले माकड, सिंहपुच्छ माकड, निलगिरी लंगूर, ऱ्हीसस माकड, हनुमान माकड व हूलॉक माकड यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांचे व रूक्ष प्रदेशांतील दुर्मिळ व निर्वंश होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी यांची पारिस्थितिकी व त्यांची संख्या यांसंबंधी संशोधन चालू आहे. या संशोधनाच्या आधारे, दुर्मिळ व निर्वंश होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचे संवर्धन कसे करता येईल, हेही संस्था सुचविते.

या संस्थेत एम.एस्सी., तसेच पीएच. डी. अभ्यासक्रमांची सोय आहे. संस्था दरवर्षी एक सहा महिन्यांचा चर्मपूरण (टॅक्सिडर्मी) या विषयावरील प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करते. असा अभ्यासक्रम असणारे हे देशातील एकमेव स्थान असून भारतातील सर्व प्राणिवैज्ञानिकांना त्याचा उपयोग होतो.

संस्थेने प्राणिविज्ञानातील विविध शाखोपशाखांवर संशोधनात्मक निबंध व व्याप्तिलेख प्रसिद्ध केले आहेत. सुरुवातीच्या काळात संस्थेत झालेले संशोधन केवळ प्राणी आणि त्यांचे वर्गीकरण यांवर आधारलेले होते. कवचधारी, चपटकृमी, मृदुकाय, कीटक वर्ग, मत्स्य अधिवर्ग, पक्षी वर्ग आणि स्तनी वर्ग या निरनिराळ्या संघांतील व वर्गांतील प्राण्यांचा अभ्यास संस्थेच्या प्रकाशनांमध्ये उपलब्ध आहे. संस्थेने केलेल्या दर्जेदार संशोधनामुळे तिला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. www.zsi.gov.in  या संकेतस्थळावर १९०७ सालापासून प्रकाशित केलेले काम सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. हे संशोधन कृषिविज्ञान, वनविद्या, मत्स्योद्योग व वैद्यक यांसारख्या शास्त्रांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे.

भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या वतीने अनेक प्रकल्प राबविले आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाचे प्रकल्प पुढीलप्रमाणे : सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप व उभयचर  प्राणी यांच्या समृद्धतेवर किंवा दुर्मिळतेवर मनुष्यनिर्मित प्रकल्पांचे होणारे परिणाम; दक्षिण भारतातील माकडांची संख्या व पारिस्थितिकी; रुक्ष प्रदेशांतील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले काही सस्तन प्राणी व पक्षी यांचा अभ्यास; जमिनीच्या सुपीकतेचा व काही सूक्ष्मजीवांचा संबंध इत्यादी. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, उत्तर प्रदेश व भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांच्या सहकार्यानेही काही प्रकल्प चालू आहेत. यापुढेही भारतातील प्राण्यांच्या अस्तित्वात असलेल्या व नवीन सापडलेल्या जाती निर्देशित करुन फॉना ऑफ इंडियाचे  खंड प्रसिद्ध करण्याचे काम संस्थेतर्फे चालू आहे.

भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या वैज्ञानिकांनी १९८९ पासून अंटार्क्टिका मोहिमेत नियमितपणे सहभागी होऊन मोलाचे काम केले आहे. १९९६ च्या पंधराव्या मोहिमेत त्यांनी अंटार्क्टिकाच्या पूर्व भागातील २९ अपृष्ठवंशी प्राण्यांच्या जातींची नोंद केली. १९९८ च्या सतराव्या मोहिमेत त्यांनी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या आदिजीव, संधिपाद व सूत्रकृमी संघातील जातींचा अभ्यास केला आणि त्यांचे वर्गीकरण केले. मुख्यत: तेथील प्राण्यांचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट असले तरी संस्थेच्या वैज्ञानिकांनी अंटार्क्टिकाच्या परिसंस्थेतील जैव-भौगोलिक संबंध शोधून काढले. २००४ मध्ये त्यांनी तेथील सस्तन प्राण्यांच्या केसांचा अभ्यास केला असून स्नो पेट्रेल, पेंग्विन आणि स्कुआ या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांच्या पिसांमधील मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा