भरती-ओहोटी ऊर्जेचे उपयुक्त ऊर्जेत विशेषेकरून विजेत केलेले रूपांतरण. जलविद्युत्‌ ऊर्जेचा हा एक प्रकार असून भरती ऊर्जा हा नूतनक्षम ऊर्जेचा स्रोत आहे. दर दिवशी ठराविक वेळी समुद्राचे पाणी समुद्रकिनाऱ्याला पुढे येते आणि ठराविक वेळाने समुद्रकिनाऱ्यापासून आत जाते. पाण्याच्या या प्रक्रियेला भरती-ओहोटी म्हणतात. समुद्रकिनाऱ्यालगत जेथे भरतीच्या लाटांचा जोर नेहमी जास्त असतो अशा ठिकाणी लाटांनी जनित्रे फिरवून किंवा भरतीच्या वेळी खाजणात जमा झालेल्या पाण्याने जनित्रे फिरवून विद्युत्‌निर्मिती करतात. या ऊर्जेला भरती ऊर्जा म्हणतात.

भरती ऊर्जा : पहिला प्रकार

समुद्राच्या प्रवाहात जनित्रे फिरवून किंवा समुद्रकिनारी धरणाप्रमाणे बंधारा बांधून व त्यात जमा झालेल्या पाण्याने जनित्रे फिरवून भरती ऊर्जा निर्माण करता येते. पहिल्या प्रकारात, विद्युत्‌ जनित्रांची रचना विशिष्ट प्रकारेकरतात. भरतीच्या वेळी बंधाऱ्‍याच्या आत येणाऱ्‍या पाण्याच्या व ओहोटीच्या वेळी बाहेर जाणाऱ्‍या पाण्याच्या प्रवाहाच्या दोन्ही दिशांचा वापर करून जनित्रे चालवून विद्युत्‌निर्मिती करतात. दुसऱ्‍या प्रकारात, खाडीच्या किंवा आखाताच्या मुखाजवळ बंधारा बांधतात. भरती-ओहोटीच्या पाण्याच्या पातळीतील फरक लक्षात घेऊन या बंधाऱ्‍याची उंची ठेवतात. जेव्हा भरती येते तेव्हा समुद्राचे पाणी बंधाऱ्‍यावरून आत जमा होते. भरती येऊन गेली की साचलेले पाणी वेगाने खाली सोडून या वाहत्या पाण्यावर जनित्रे चालवून विद्युत्‌निर्मिती करतात.

 

भरती ऊर्जा : दुसरा प्रकार

भरती ऊर्जेच्या निर्मितीसाठी पुढील बाबी आवश्यक असतात : लाटांची उंची किमान ८ मी. असावी लागते. समुद्रकिनारा दंतूर असावा लागतो, कारण अशा किनाऱ्‍याला लाटा वेगाने धडकत असतात. याचा विचार करता, आखाती प्रदेशातील समुद्रकिनारे भरती ऊर्जेसाठी अनुरूप आहेत. समुद्रकिनाऱ्‍यालगतचा भाग कठीण खडकांचा असणे आवश्यक असतो. कठीण खडकांचे क्षरण कमी होत असल्यामुळे भरती ऊर्जेच्या निर्मिती केंद्राला धोका पोहोचत नाही. किनारी भागातील तापमान वर्षभर उष्ण असावे लागते. मात्र वर्षातील काही महिने तापमान ०° से. खाली जात असेल तर पाणी गोठल्याने भरती ऊर्जा निर्माण करता येत नाही. तसेच समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त असल्यास ऊर्जानिर्मिती संयंत्रांवर, जनित्रांवर क्षार जमा होऊन त्यांची कार्यक्षमता घटते आणि अपेक्षित ऊर्जा प्राप्त होऊ शकत नाही.

भरती ऊर्जेवर चालणारे पहिले विद्युत्‌निर्मिती केंद्र इंग्लिश खाडीत फ्रान्सच्या किनाऱ्यावर १९६६ मध्ये राँस नदीच्या मुखावर बांधण्यात आले. २४ टरबाइन असलेले हे केंद्र वर्षाकाठी सु. ५,४४,००० मेगावॅट (मेवॅ) एवढी वीज निर्माण करू शकते. फ्रान्सशिवाय अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए), रशिया, जपान, चीन, कॅनडा व भारत या देशांमध्ये हे प्रयोग यशस्वी झाले असून काही ठिकाणी भरती ऊर्जा निर्माण केली जात आहे. भारतात कच्छ किनारा, खंबायतचे आखात आणि सुंदरबन तसेच गोव्याचा समुद्रकिनारा व लक्षद्वीपचा किनारा येथे भरती ऊर्जा निर्माण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. भारताची भरती ऊर्जाक्षमता सु. ९,००० मेवॅ. एवढी आहे.

भरती ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्‍या यंत्रसामग्रीचा आणि त्या परिसरात उभारण्यात येणाऱ्‍या इमारती किंवा इतर बांधकामाचा सागरी सजीवांवर परिणाम होऊ शकतो. त्यांचा दीर्घकाळ आवाज होत राहिल्यास त्या भागातील मासे इतर भागात स्थलांतर करतात. भरती ऊर्जा जनित्रांमुळे पाण्याची गतीही वाढते. त्याचाही परिणाम सजीवांवर होतो. भरती ऊर्जा उपकरणांमुळे स्थानिक परिसंस्था आणि त्यातील प्रक्रिया विस्कळित होतात. उपसागर किंवा खाड्यांमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी बांध घालावे लागतात. त्यामुळे जलप्रवाहात बदल होतो. पाण्याच्या क्षारतेत फरक पडतो. खाजणात यंत्राच्या पात्यांना मासे धडकल्याने ते मृत्युमुखी पडतात. मासे मरतात तेव्हा पक्ष्यांसाठी एक अन्नाचा स्रोत उपलब्ध होतो आणि वेगळी अन्नसाखळी बनते. यंत्रासाठी वापरण्यात येत असलेली वंगणे व इतर रासायनिक घटक पाण्यात मिसळल्यामुळेही सागरी जीवांना धोका निर्माण होतो. भरती ऊर्जेचे काही पर्यावरणीय दुष्परिणाम होत असले तरी अन्य ऊर्जांच्या तुलनेत भरती ऊर्जा कमी खर्चिक असते. भरती ऊर्जा शाश्‍वत ऊर्जा असल्याने पारंपरिक ऊर्जा स्रोतावरील ताण कमी होण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा