कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलेची उपवर्गातील प्ल्युरोट्रिमॅटा गणातील माशांना ‘शार्क’ म्हणतात. अंटार्क्टिका वगळता जगातील सर्व समुद्रात शार्क आढळतात. उष्ण प्रदेशांतील समुद्रात मोठ्या प्रमाणात शार्क असतात. त्यांच्या सु. ५०० जाती आहेत. त्यांपैकी सु. ३० जाती हिंस्र असून मानवाच्या दृष्टीने त्या धोकादायक आहेत.

शार्कचे शरीर चपटे असून आकार लांबट, दोन्ही टोकांस निमुळता व प्रवाहरेखित असतो. त्यांच्या शरीराच्या लांबीत विविधता आढळते. एट्‌मोप्टेरस पेरी  ही शार्कची सर्वांत लहान जाती सु. १७ सेंमी. लांब, तर व्हेल शार्क ही सर्वांत मोठी जाती सु. १२ मी. लांब असते. ते समुद्रात साधारणपणे ४५–५५ मी. खोलीवर आढळतात. काही शार्क (ग्रीनलँड शार्क) समुद्रात सु. २,००० मी. खोलीपर्यंत आढळतात, तर काही (डॉग जातीचे शार्क) किनाऱ्यालगत आढळतात. शार्कचा सांगाडा कास्थी आणि संयोजी ऊती यांनी बनलेला असतो. सांगाड्यात अस्थी (हाडे) नसल्यामुळे त्यांचे वजन कमी  असते.

शार्कच्या शरीराचे डोके, धड व शेपटी असे तीन भाग असतात. शरीराच्या बऱ्याचशा भागावर दंताभ प्रकारचे सूक्ष्म खवले असतात. डोके त्रिकोणी असून पुढच्या टोकदार भागाला मुस्कट म्हणतात. मुख अधर बाजूस असून ते अर्धचंद्राकृती असते. डोक्यापासून सुरू होणाऱ्या धडाच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंना कल्ल्यांच्या पाच जोड्या असून कल्ल्यांवर आवरण नसते. धड जाड व फुगीर असून शेपटीकडे ते निमुळते होत गेलेले असते. धडावर दोन एकल अथवा अजोड पृष्ठपर असून वक्षपर आणि श्रोणिपर यांची जोडी असते. धडाच्या खालच्या बाजूस एक जोडविरहीत अधरपर असतो. शेपटीला मोठा पुच्छपर असतो आणि त्याचा वरचा अर्धा भाग खालच्या भागापेक्षा मोठा असतो. सर्व पर शरीराच्या पाठीमागच्या बाजूकडे वळलेले असतात. शेपटी आणि पुच्छपर यांचा उपयोग पोहण्यासाठी होतो. पुच्छपर सुकाणूचे काम करतो, तर इतर सर्व परांचा उपयोग तोल सांभाळण्यासाठी होतो. शार्कच्या जातींनुसार त्यांच्या शेपटीच्या आकारात बदल दिसून येतात. शार्क ताशी ८ किमी. अशा सरासरी वेगाने पोहतात. शेपटीच्या आकारानुसार पोहण्याचा वेग बदलतो आणि तो शेपटीने तडाखेही मारतो. शार्कच्या रंगात विविधता आढळते. ते पांढऱ्या, करड्या, तपकिरी, पिवळ्या, निळ्या रंगाचे असून शरीरावर पट्टे, ठिपके किंवा ठराविक आकाराची नक्षी असते. ते समूहाने वावरतात आणि त्यांच्या समूहात एका वेळी शंभराहून अधिक शार्क असतात.

शार्क आक्रमक आणि क्रूर असतात. ते मांसाहारी असून समूहाने भक्ष्याचा शोध घेतात. कोळंबी, शेवंडा, ऑक्टोपस, लहान शार्क, बांगडे, समुद्र कासवे, सील, वॉलरस यांसारखे प्राणी हे त्यांचे भक्ष्य असते. भक्ष्याचा शोध घेताना ते बऱ्याचदा पाठीवर पोहतात. त्यांच्या खालच्या आणि वरच्या जबड्यात दातांच्या अनेक ओळी असतात. हे दात म्हणजे रूपांतरित दंताभ खवले असतात. दात कट्यारीच्या आकाराचे असून ते आतील बाजूस वळलेले असतात. सर्वांत पुढच्या ओळीतील दात मोठे व आतल्या ओळीतील दात लहान असतात. पुढचे दात झिजले की त्यांची जागा मागचे दात घेतात. भक्ष्य पकडताना काही शार्क भक्ष्याच्या अगदी जवळ जातात आणि भक्ष्याच्या शरीराच्या खालच्या भागाला स्पर्श ‍करून लगेच दूर होतात. अशा प्रकारे ते भक्ष्याच्या प्रतिकारशक्तीचा अंदाज घेतात. त्यानंतर समूहातला एखादा शार्क भक्ष्यावर हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात करतो. नंतर इतर शार्क लचके तोडतात आणि भक्ष्याचा फडशा पाडतात. शार्क भक्ष्याच्या मांसाचे तुकडे चर्वण न करता गिळून टाकतात. त्यांच्या दातांच्या रांगांची हालचाल दातेरी सरकपट्ट्यांप्रमाणे पुढेमागे होत असल्याने गिळणे सोपे होते. कवचधारी प्राणी खाणाऱ्या शार्कचे दात जवळजवळ व बोथट असतात. त्यामुळे भक्ष्य दाबून ठेवले जाते. मासे खाणाऱ्या शार्कचे दात अणकुचीदार असतात, तर सस्तन प्राणी खाणाऱ्या शार्कचे वरचे दात करवतीप्रमाणे धारदार आणि खालचे टोकदार असतात. त्यामुळे तोंडातून भक्ष्य निसटून बाहेर पडत नाही. त्यांची गंधसंवेदना तीव्र असून त्याद्वारे ते भक्ष्याचा मागोवा घेतात.

शार्कमध्ये श्वसनासाठी कल्ल्यांच्या पाच जोड्या असतात. मुखात घेतलेले पाणी कल्ल्यांवरून वाहत जाऊन मागील बाजूने बाहेर पडते. या वेळी पाण्यातील ऑक्सिजन कल्ल्यांच्या केशवाहिन्यांतील रक्तात शोषला जातो व रक्तातील कार्बन डायऑक्साइड पाण्यात सोडला जातो. शार्कमध्ये अस्थिमत्स्यांप्रमाणे वाताशय आणि फुप्फुस नसते. शार्कचे हृदय अलिंद व निलय अशा दोन कप्प्यांचे असून धमनी शंकू व नीलगुहिका असे दोन जादा कप्पे असतात. शरीरातील अशुद्ध रक्त हृदयात येते. ते कल्ल्यांकडे पाठविले जाते व त्यांच्याद्वारे शुद्ध होते. शेवटी  धमन्यांद्वारे रक्त शरीराकडे पाठविले जाते.

शार्कच्या धडाच्या पोकळीत निरनिराळी आंतरांगे असतात. या आंतरांगांनी पचनसंस्था, उत्सर्जन संस्था, अंत:स्रावी ग्रंथी संस्था, प्रजनन संस्था बनलेल्या असतात. शार्कचे जठर फुगीर असून आतडे कमी लांबीचे असते. जठरात गिळलेले अन्न न चावता येते. आतड्याच्या आतील बाजूला सर्पिल झडप असते. या झडपेमुळे अन्न शोषून घेणारा पृष्ठभाग वाढतो, तसेच अन्न शोषून घेण्यासाठी जास्त वेळ मिळतो. उत्सर्जनासाठी दोन वृक्के असतात. प्रजनन संस्था पूर्ण विकसित असते. नरामध्ये श्रोणिपरांच्या आतील बाजूस आलिंगकांची एक जोडी असते. आलिंगकांचा उपयोग शुक्रपेशी मादीच्या शरीरात सोडण्यासाठी होतो. मिलनानंतर अंडनलिकेत अंड्याचे फलन होते. मादी सुरक्षित जागी पिलांना जन्म देते. ती एका वेळी ४–६ पिलांना जन्म देते. बहुतांशी शार्क जरायुज असतात. अंत:स्रावी ग्रंथी संस्था ही पीयूषिका ग्रंथी, अधिवृक्क, अंडाशय, वृषण यांनी बनलेली असते. चेतासंस्था पूर्णपणे विकसित असून मेंदूतून मस्तिष्क चेतांच्या १० जोड्या बाहेर पडतात. शार्कमध्ये डोळे, घ्राणेंद्रिये, श्रवणेंद्रिये, त्वचा, पार्श्विक रेखा ज्ञानेंद्रिये, लोरेंझिनी कुंभिका आणि पुटिका इ. ज्ञानेंद्रिये असतात. डोळ्यांतील दृष्टिपटलाच्या मागे असलेल्या चकास (चकाकणाऱ्या) स्तरामुळे (टपेटम) दृष्टीपटलाच्या प्रकाशसंवेदी पेशीमधून प्रकाश परावर्तित होतो व पेशींची प्रकाश ग्रहणशक्ती वाढते. त्यामुळे अंधुक प्रकाशात त्यांना दिसू शकते. शार्कना फक्त अंतर्कर्ण असून त्याचा उपयोग ध्वनिग्रहण आणि तोल सांभाळण्यासाठी होतो. सर्व शरीरावर त्वचेखाली चेतातंतू असतात. ते स्पर्शाची जाणीव करून देतात. पार्श्विक रेखा ज्ञानेंद्रिये म्हणजे संवेदी चेतातंतूची रांग असते. या रेखांमध्ये संवेदनक्षम छिद्रे असतात. त्याद्वारे शार्कला प्रवाहाची, पाण्यातील दाबाची जाणीव होते. डोक्याच्या बाजूस दोन व खालच्या बाजूस एक असे लोरेंझिनी कुंभिकांचे तीन समूह असतात. एका कुंभिकेत ६–८ लांब नळ्या असून त्या रंध्रांद्वारे त्वचेवर उघडतात. नळ्यांना खालच्या बाजूस संवेदी चेता असतात. कुंभिकाद्वारे प्रदूषके, तापमान, पाण्याचे प्रवाह, विद्युतचुंबकीय प्रवाह यांची जाणीव होते. सर्व प्राण्यांमध्ये शार्कना विद्युत संवेदना सर्वाधिक असते. शार्कच्या शरीराच्या त्वचेत वरील व खालील बाजूस अनेक पुटिका असतात. या पुटिका प्रवाहातील बदल व लाटांची हालचाल ओळखतात. शार्कचा आयु:काल २०–३० वर्षे असतो. व्हेल शार्क सु. १०० वर्षे जगतात.

शार्क माशांचे मांस खाल्ले जाते. परांचा उपयोग सूप करण्यासाठी होतो. कातडीपासून पादत्राणे, पाकिटे, पट्टे बनवितात. कातड्यावर खवले असल्यामुळे ते खरखरीत असते. ते पॉलिश पेपरप्रमाणे हस्तिदंताच्या वस्तूंना पॉलिश ‍करताना वापरतात. शार्कचे यकृत मोठे असते. शार्कच्या यकृतापासून व शरीरापासून तेल मिळते. यकृत तेलात आणि जीवनसत्त्वे असून ते पूरक अन्न म्हणून वापरतात. शरीरापासून मिळणारे तेल खाण्यासाठी व साबण तयार करण्यासाठी वापरतात. शार्कचे तुकडे मासे पकडताना गळाला आमिष म्हणून लावतात. शार्कच्या पीयूषिका ग्रंथीपासून पीयूषिका संप्रेरके मिळवितात. शार्क पकडण्यासाठी गळ, विविध प्रकारची जाळी वापरतात. त्यांना हातांनी व यांत्रिक बोटी वापरूनही पकडतात. जगात सापडणारे काही शार्क पुढीलप्रमाणे आहेत :

टायगर शार्क (गॅलिओसेर्डो क्युव्हिअर)

टायगर शार्क : याचे शास्त्रीय नाव गॅलिओसेर्डो क्युव्हिअर आहे. त्यांची लांबी ३.६ ते ४.२ मी. असते. याच्या शरीरावर वाघाच्या पट्ट्यांप्रमाणे पट्टे असतात. हे शार्क समुद्रस्नान करणाऱ्या व्यक्तींवर हल्ला करतात. त्यांची प्रजननक्षमता जास्त असून मादी एका वेळी १० ते ८० पिलांना जन्म देते. मुंबई किनाऱ्यावर आढळणाऱ्या एका जातीस वाघवीर किंवा वाघबीर म्हणतात.

ग्रेट ब्लू शार्क : याचे शास्त्रीय नाव प्रिऑनिस ग्लॉका असून ते जगात अनेक ठिकाणी आढळतात. त्यांची लांबी ३ ते ३.६ मी. असते. त्यांची प्रजननक्षमता जास्त असते. मादी एकावेळी २८ ते ५४ पिलांना जन्म देते. तो दिसायला आकर्षक दिसतो. म्हणून याला प्रिन्स ग्लॉका म्हणतात.

हॅमरहेडेड शार्क (स्फायर्ना झायगीना)

हॅमरहेडेड शार्क : याचे शास्त्रीय नाव स्फायर्ना झायगीना आहे. डोक्याच्या सुरुवातीचा भाग हातोडीसारखा पसरट असतो. डोळे हातोडीच्या दोन्ही टोकांस असतात, म्हणून याला ‘हातोडी शार्क’ म्हणतात. हा चपळ आणि खादाड असतो. हा मासेमारीमध्ये ‘स्पोर्ट फिश’ म्हणून प्रसिद्ध आहे.

मॅको शार्क : याचे शास्त्रीय नाव आयस्यूरस ऑक्सिरिंकस आहे. त्यांची लांबी १.८ ते ३.६ मी. असते. पुच्छपराचे दोन्ही भाग सारखे असतात.

ग्रेट व्हाइट शार्क : याचे शास्त्रीय नाव कॅरकॅरोडॉन कॅरकॅरिअस आहे. या जातीतील सर्वांत मोठ्या शार्कची लांबी ११.२ मी. आढळली आहे. हा चपळ आणि आक्रमक असून त्याला समुद्रातील लांडगा म्हणतात.

डॉग फिश : याचे शास्त्रीय नाव कॅरकॅरिनस लॅटिकॉडस आहे. याला ‘मुशी’ म्हणतात. मुंबई, कोकण किनाऱ्यावर आढळणाऱ्या स्कॉलिओडॉन सोरॅकोव्हाय यालाही मुशी म्हणतात.

सेव्हन गील्ड शार्क : याचे शास्त्रीय नाव नोटोरिंकस सेपेडियनस  आहे. त्यांची लांबी २ मी. असते. याला कल्ल्यांच्या सात जोड्या असतात. याला फणिदंत शार्क म्हणतात.

व्हेल शार्क (ऱ्हिंकोडॉन टायपस)

व्हेल शार्क : याचे शास्त्रीय नाव ऱ्हिंकोडॉन टायपस आहे. याची लांबी सु. २० मी., तर वजन सु. ३०,००० किग्रॅ. पर्यंत असते. तो व्हेल या सस्तन प्राण्याप्रमाणे महाकाय असतो, म्हणून त्याला व्हेल शार्क म्हणतात.

बास्किंग शार्क : याचे शास्त्रीय नाव सीटोऱ्हीनस मॅक्सिकस आहे. त्यांची लांबी सु. ७.६ मी. असते. आक्रमक नसल्यामुळे याला निरुपद्रवी शार्क म्हणतात. महाराष्ट्र, गुजरात किनाऱ्यावर तो आढळतो. व्हेल शार्क व बास्किंग शार्क प्लवक खाणारे आहेत.

यांशिवाय शार्क माशांच्या ग्रे शार्क, कॅट शार्क, ग्रे डॉग शार्क, यलो डॉग शार्क अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जाती आढळतात. बहुतांशी शार्क खाऱ्या पाण्यात वावरतात. मात्र भारतातील अनेक नद्यांमध्ये विशेषेकरून गंगा नदीत आढळतो. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या शार्कचे शास्त्रीय नाव कॅरकॅरिनस गँगेटिकस आहे. तो खादाड असून माणसांवर हल्ला करतो. महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील शार्क माशांच्या जातीला वाघशीर म्हणतात. अनिर्बंध मासेमारीमुळे शार्कच्या काही जातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जगभर कास्थिमत्स्य आता संरक्षित केले आहेत.