आधुनिक काळाचे पुरातत्त्व या शाखेची संशोधन पद्धत सर्वसाधारणपणे ऐतिहासिक व मध्ययुगीन काळाच्या पुरातत्त्वासारखी आहे. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट आधुनिक काळातील लोकजीवन आणि संस्कृती यांचा भौतिक अवशेषांच्या आधारे मागोवा घेणे हे असले तरी या शाखेत काही विशिष्ट घडामोडींकडे लक्ष केंद्रित केले जाते. त्यानुसार आधुनिक काळाच्या पुरातत्त्वाच्या काही उपशाखाही तयार झाल्या आहेत.

चौदाव्या व पंधराव्या शतकांमध्ये यूरोपात नवजागरणाच्या काळानंतर विद्येचे पुनरुज्जीवन होऊन मध्ययुगाचा अंत झाला आणि जग आधुनिक काळात आले असे मानले जाते. अर्थात आधुनिक काळ सुरू होण्याची व्याख्या जगभर सारखी नाही, तर ती वेगवेगळी आहे. सर्वसाधारणपणे सोळाव्या शतकाच्या प्रारंभापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या काळाच्या पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून केलेल्या अभ्यासाचा समावेश आधुनिक काळाच्या पुरातत्त्वात केला जातो. तर विसावे शतक आणि एकविसाव्या शतकाची सुरुवात यांचा पुरातत्त्वीय अभ्यास सोईसाठी समकालीन पुरातत्त्व (Contemporary Archaeology) या शाखेत केला जातो.

पंधराव्या शतकात यूरोपीय सत्तांना त्यांच्या दृष्टीने नव्या जगाचा ’शोध’ लागल्यानंतर त्यांनी अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडांत व्यापार आणि नंतर वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. याच काळात एक भरपूर नफा देणारा धंदा म्हणून गुलामांच्या व्यापाराचा जागतिक विस्तार झाला. या गुलामांच्या व्यापाराशी निगडित स्थळांचा आणि गुलामांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या जीवनाचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व (Archaeology of Slavery) ही उपशाखा निर्माण झाली. सर्वसाधारणपणे पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत विविध देशांनी (पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड, ब्रिटन, रशिया, चीन आणि जपान) आपल्या देशातील गुन्हेगारांना जगभरात अनेक ठिकाणी कारागृहे, बंदिछावण्या व गुन्हेगारांच्या विशिष्ट वसाहती (Penal Settlements) यांच्यामध्ये डांबून ठेवले होते. गुन्हेगारांच्या वसाहतींचा पुरातत्त्वीय  दृष्टीकोनातून विशेष अभ्यास करणे हे गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व (Archaeology of Penal Settlements) या उपशाखेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

यूरोपमध्ये अठराव्या शतकात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि त्यानंतर जगात इतरत्र ती पसरली. या क्रांतीमुळे कृषी उद्योगाचे प्राबल्य असलेल्या अर्थव्यवस्थांचे व्यापारउदीम व औद्योगिक उत्पादनांवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेत रूपांतर झाले. औद्योगिक क्रांतीमुळे नवीन संसाधने (लोखंड व पोलाद) व उर्जास्रोत (कोळसा व वाफ) वापरात आले; निरनिराळ्या यंत्रांचा शोध लागल्याने उत्पादन प्रक्रिया वेगवान झाल्या; विविध कारखाने, गिरण्या, वखारी आणि औद्योगिक वसाहती तयार झाल्या; दळणवळणाची नवी साधने निर्माण झाली आणि समाजरचनेतही लक्षणीय बदल झाले. औद्योगिक क्रांतीमुळे आधुनिक जगात झालेल्या या बदलांचा मागोवा औद्योगिक पुरातत्त्वात (Industrial Archaeology) घेतला जातो. तसेच नवीन भांडवलशाही सामाजिक-आर्थिक रचनेत शोषक आणि शोषित यांच्यात झालेल्या संघर्षांचा पुरातत्त्वीय साधनांवरून मागोवा, वर्गलढ्याचे पुरातत्त्व (Class Struggle Archaeology) या शाखेत घेतला जातो. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात अनेक ठिकाणी नागरीकरणाला चालना मिळून जुनी शहरे वाढली आणि अनेक नवीन शहरे उदयास आली. या नागरीकरणाचा विशेष अभ्यास नागरी पुरातत्त्वात (Urban Archaeology) केला जातो.

वसाहतवादाच्या काळात जगात तेव्हा प्रबळ असलेली राष्ट्रे राजकीय प्रभुत्वासाठी यूरोपात आणि जगाच्या इतर भागांमध्ये एकमेकांशी झगडत होती. त्यांच्यात जमिनीवर आणि सागरांमध्ये अनेक लढाया झाल्या. सोळाव्या शतकाच्या प्रारंभापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस वसाहतवाद उतरणीस लागेपर्यंतच्या लढायांचा अभ्यास रणभूमी पुरातत्त्व (Battlefield Archaeology) या शाखेत केला जातो. याच कालखंडात अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियनच्या काळातील युद्धे, इटली व जर्मनीचे एकीकरण, अमेरिकेतील यादवी युद्ध आणि रेल्वे मार्गांच्या जाळ्याचा विस्तार अशा अनेक घटना घडून आल्या. या सर्वांकडे १९५० पासून पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून बघितले जात आहे.

संदर्भ :

  • Gonzalez-Ruibal, Alfredo,  An Archaeology of the Contemporary Era, Routledge, 2018.
  • Lawrence, Susan, ‘Artifacts of the Modern World’, Archaeology in Practice : A Student Guide to Archaeological Analyses (Jane Balme and Alistair Paterson Eds.), pp. 362-385, Oxford : Blackwell, 2006.
  • Shaw, Ian & Robert, Jameson, Eds., A dictionary of archaeology, Oxford, 1999.
  • Smith, Monica L. Cities : The First 6,000 Years, Viking, 2019.
  • Trigger, Bruce, A History of Archaeological Thought, Cambridge, 1996.

                                                                                                                                            समीक्षक : सुषमा देव