जोशी, प्रतिमा  : ( २३ डिसेंबर १९५९ ) कथालेखिका तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रतिमा जोशी यांची ओळख आहे. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. विद्यार्थीदशेपासून त्या समाजवादी चळवळीत सक्रिय सहभागी झाल्या. महाविद्यालयात असताना त्यांनी राष्ट्र सेवा दलात काम केले. त्यानंतर युवक क्रांती दल, एस. एफ. आय., संघर्ष वाहिनी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळींमध्ये त्या सहभागी झाल्या. नामांतराच्या लढ्यातील सहभागामुळे त्यांना पंधरा दिवसांचा तुरुंगवासही झाला. मुंबईच्या कामाठीपुर भागात त्यांनी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्य केले. कामाठीपुरा परिसरातील स्त्रिया, लहान मुले यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य, कायदेविषयक अशा कामात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. १९९० पासून त्या महाराष्‍ट्र टाइम्‍समध्‍ये प्रिन्सिपल करस्‍पॉन्‍डट पदावर कार्यरत आहेत.

प्रतिमा जोशी यांचे जहन्नम (२००९) आणि दण्डकारण्य (२०१५) हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शोध बाई माणसाच्या जिण्‍याचा (२००४), कॉ. जी. एल. नि. कॉ. तारा रेड्डी (धगधगती आग नि रसरसता निखारा)  हे वैचारिक स्वरूपाचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अज्ञाताचा प्रवासी (Destination Unknown,१९९४), इराण जागा होतोय (२००७) हे त्यांचे अनुवादित ग्रंथ होत. जहन्नम या कथासंग्रहात प्रतिमा जोशी यांच्‍या निवडक कथांचा समावेश आहे. पुष्पा भावे यांनी या कथासंग्रहाचे संपादन केले आहे. महानगरातील जीवनविश्व या कथांच्या केंद्रस्थानी आहे. विविध तऱ्हेच्या स्त्रियांचे भावविश्व त्यामध्ये आहे. सामान्य कष्टकरी स्त्रियांपासून वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचे जग त्यांच्या कथेत आहे. स्त्रियांचे दैहिक-मानसिक अवस्थांचे चित्रण त्यांच्या कथेत आहे. महानगरातील स्त्रियांच्या दुःखानुभवाचे विविध पदर त्यांच्या कथादृष्टीत आहेत. सामाजिक, जातीय, आर्थिक परिमाणांतून निर्माण झालेल्या स्त्रीदुःखाच्या कहाण्या त्यांनी रेखाटल्या आहेत. त्यांच्या कथाचित्रणाचा पैस हा  त्यांच्या सामाजिक कार्यातूनच लाभलेला आहे. दण्डकारण्य हा त्‍यांचा दुसरा कथासंग्रह. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, जातीय स्तरावरचे लढे तसेच मानवी संघर्षाची अनेक रूपे त्यांच्या कथाचित्रणात आहेत. या जीवनसंघर्षातील माणसांच्या हताशपणाच्या, संघर्षाच्या आणि जगण्याच्या चिवटपणाच्या कथा त्यांनी रेखाटल्या. त्यांच्या कथाचित्रणातील समाजदृष्टी महत्त्वाची ठरते. वैशिष्ट्यपूर्ण कथालेखनाबरोबरच प्रतिमा जोशी यांनी वैचारिक स्वरूपाचेही लेखन केले आहे. शोध बाई माणसाच्या जिण्‍याचा (२००४) या पुस्‍तकातून महाराष्‍ट्रातील स्‍त्री जीवनाला एका वेगळ्या दृष्टिकोणातून मांडले आहे. या ग्रंथात स्‍त्रीच्या सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक संदर्भाची मांडणी आहे. सामाजिक चळवळीत  काम करताना येणाऱ्या अनुभवाची जोड त्यास आहे. कॉ. जी. एल. नि कॉ. तारा रेड्डी (धगधगती आग नि रसरसता निखारा) या ग्रंथात त्यांनी रेड्डी दाम्‍पत्‍याच्या योगदानाचा परिचय करून दिला आहे. कम्युनिस्ट चळवळीतील कॉ. जी. एल. आणि कॉ. तारा रेड्डी या दाम्पत्याच्या राजकीय व सामाजिक जीवनकार्याचा परिचय या ग्रंथात आहे. दामोदर टिळक यांनी गतिमंद मुलीवर लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद अज्ञाताचा प्रवासी  या नावाने त्‍यांनी केला आहे. २००३ च्या नोबेल पुरस्कार विजेत्या शिरीन इबादी यांच्या Iran awakening  या आत्मचरित्राचा अनुवाद इराण जागा होतोय या नावाने प्रसिद्ध आहे. शिरीन इबादी यांच्‍या जीवनकार्य अनुवादरूपाने मराठी वाचकांना उपलब्ध झाले आहे.

प्रतिमा जोशी यांना त्यांच्या कार्य व लेखनाबदद्ल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. संबोधी प्रतिष्ठान सातारा यांचेकडून मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (२००९), वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार (२०१०), केशवराव कोठावळे पुरस्कार (२०१०), सामाजिक कृतज्ञता निधी तर्फे राम आपटे पुरस्कार, एकता कल्चरल अकादमीचा एकता गौरव पुरस्कार (२०१५), दूरदर्शन सह्याद्री वाहिनी तर्फे हिरकणी पुरस्कार, पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार (२०१५) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. २०१३ मध्ये चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील कष्टकरी स्त्रियांच्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २२ फेब्रुवारी २००५ रोजी घाटकोपर-मुंबई येथील विभागीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. बाबा आढाव यांच्‍या नेतृत्‍वाखालील महात्‍मा जोतीराव फुले समता प्रतिष्‍ठान ही संघटना,अंधश्रद्धा निर्मूलन, दलित अत्‍याचार, असंघटित कामगार, सफाई कामगार व एकल महिलांच्‍या प्रश्‍नांवर काम करणाऱ्या विविध संघटनांशी त्‍या संबंधित आहेत. सत्‍यशोधक मनोहर कदम प्रागतिक संधोधन केंद्र या संस्‍थेच्‍या त्‍या सांप्रत अध्‍यक्ष आहेत.

संदर्भ :

  • भावे, पुष्‍पा (संपा.), जहन्‍नम निवडक प्रतिमा जोशीमुंबई, २००९.