कवडी, नरेश : ( ५ ऑगस्ट १९२२ – ४ एप्रिल २०००). भाषातज्ञ, कथाकार, मर्मज्ञ समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक. ज्ञानेश्वरीचा आशय काव्यसौंदर्यापुरता मर्यादित नाही; त्यातील तत्त्वज्ञान हा तिचा मूलकंद आहे अशी त्यांची धारणा होती, त्यामुळे तिच्यावरचे त्यांचे विवेचन मूलग्राही असायचे. ललित, समीक्षात्मक आणि वैचारिक वाङ्मयाचा व्यासंग हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होते आणि त्याला बहुश्रुततेची जोड मिळाली होती. वृत्तिगांभीर्याबरोबर नर्मविनोद हाही त्यांचा स्थायिभाव होता.

नरेश कवडी मूळचे सोलापूरचे होते. त्यांचे वडील भिकाजी कवडी हे करमाळा या गावी वकिली करायचे. १९५४ साली त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता. जगन्नाथराव जोशींबरोबर सत्याग्रहींची जी तुकडी होती, त्यात भिकाजी कवडी होते. पोर्तुगीजांनी त्यांना अमानुष मारहाण केली होती. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात कवडी यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. नव्याने स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठात शं. गो. तुळपुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘डांग जिल्ह्यातील बोली भाषांचा अभ्यास’ या विषयावर पीएच. डी प्राप्त केली. त्र्यं. वि. सरदेशमुख, भा. दि. फडके, य. दि. फडके तसेच पुण्याचे अरविंद मंगरूळकर आणि सदाशिव मंगरूळकर यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. काही काळ नरेश कवडी यांनी वृत्तनिवेदक म्हणून काम पाहिले. दिल्ली आकाशवाणीत ते मराठी वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते. अमेरिकेतील पेनसिल्विनिया विद्यापीठात त्यांनी काही काळ मराठीचे अध्यापन केले. त्यांनी स्पोकन मराठी  हा ग्रंथ  लिहिला. नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील कॉलेजमध्ये त्यांनी काही काळ मराठीचे अध्यापन केले. १९६९ मध्ये कवडी मडगांवच्या श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्या काळात कविवर्य पु. शि. रेगे प्राचार्य होते. १९७३ ते १९८२ या काळात कवडी यांनी मराठी विभागप्रमुख या नात्याने विभागाची धुरा वाहिली. चौगुले महाविद्यालयात अध्यापन करत असताना त्यांच्या वाङ्मयनिर्मितीस बहर आला.

‘नरेश’ या नावाने ते कथालेखन करत होते. त्यांचा बिअरची सहा कॅन्स  हा कथासंग्रह १९७८ साली प्रसिद्ध झाला. यात १९६८ ते १९७७ या काळातील चौदा कथा आहे. ‘चुळचुळ मुंगी पळी पळी कंटाळा’ हा मालिका कथांचा प्रयोग त्यांनी केला. मोरारजीभाई देसाई यांच्या मूळ आत्मचरित्रावरून त्यांनी त्यांचे मोरारजीभाई देसाई  हे चरित्र लिहिले आहे. त्यांच्या समीक्षालेखांचा संग्रह प्रतिक्रिया  या नावाने प्रसिद्ध आहे. समकालीन साहित्यिकांवरील आणि पुस्तकांवरील परखड आणि चिकित्सक वृत्तीने केलेले हे लेखन आहे. ज्ञानेश्वरी सप्तजन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचा श्रीज्ञानेश्वर: नवदर्शन  हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या आत्मकथा  या बृहद् स्वरूपाच्या आत्मचरित्राचा त्यांनी अनुवाद केला आहे. त्यां व्हॉल्टेरच्या कांदिद  या कांदबरीचा मराठी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. कोकणीतील कादंबरीकार दामोदर मावजो यांच्या कार्मेलिन  या कादंबरी मराठी अनुवाद त्यांनी केला आहे.

बिअरची सहा कॅन्समधील नरेश यांची कथा मराठी कथाविश्वातील वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. भाषाशैलीतील धारदारपणा आणि तिरकस वृत्ती हे त्यांच्या अभिव्यक्तीचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्यांच्या कथेचे वळण नवकथेचे आहे. जीवनाच्या आभासात्मकतेला जीवनसर्वस्व मानणार्‍या रूढ समाजमानसाच्या वृत्ती-प्रवृत्तींना नरेश छेद देतात. पाश्चात्त्य आणि पौर्वात्य सांस्कृतिक विकासक्रमातील मूलतम प्रेरणांचा ते वेध घेतात. उपहास आणि उपरोध या आयुधांचा मार्मिकपणे त्यांनी आपल्या कथांतून उपयोग केला आहे. ‘बिअरची सहा कॅन्स’ आणि ‘चोर’ या दोन कथांमधून नरेश यांनी लहान मुलांच्या निरागस मनाचे प्रत्ययकारी चित्रण केले आहे. वास्तव जीवनातील कोंडमार्‍यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या संवेदनशील मनाची ससेहोलपट ‘एका हाताची टाळी’आणि ‘रिव्हॉल्वर’या कथांतून आढळते. ‘एका हाताची टाळी’ मधील नायकाने दिवसा लाचारीची जी हजार मरणे अनुभवलेली असतात ती अंधारात त्याला कमी दिसायला लागतात. म्हणून त्याला अंधार आवडायला लागतो. त्याच्या संवेदनक्षम वयातील काव्यात्म वृत्ती अशा वेळी जागी होते. त्याच्या मोहवश व पश्चातापदग्ध भावस्थितीचे मनोविश्लेषणात्मक चित्र नरेश यांनी समर्थपणे रंगविले आहे. ‘रिव्हॉल्वर’ या कथेत सातपुते मास्तरांचे दिवास्वप्नांचे जग आढळते. अपेक्षित स्वप्नसृष्टी आणि समोर ठाकलेले दाहक वास्तव यांमधील विसंगतीवर केलेले कलात्म भाष्य या कथेत आढळते. ‘हो तर जंक्शन काम झालं की गा’ ही शहरी संस्कृतीचे विडंबन करणारी कथा आहे. हिच्यातील निखळ विनोद हास्यनिर्मिती करणारा तसाच वास्तव जीवनातील व्यंग दर्शविणारा आहे.

समाजजीवनाला ग्रासणार्‍या अध्यात्मक्षेत्रातील विसंगतींवर प्रकाश टाकणार्‍या कथांमधून नरेश यांच्या उपहासगर्भ शैलीला वेगळी धार चढते. ‘वटोबा आणि राधामावशी’, ‘अवतार राधामाई’, ‘आपुला ठावो न सांडिता’ आणि  ‘सोडविले अपार जीवजंतू’ या कथांतून समाजातील भोंदूगिरीचे विदारक दर्शन नरेश यांनी घडविले आहे. ‘आपुला ठावो न सांडिता’ या कथेतील महाराजांनी प्रपंचाला रामराम ठोकून अध्यात्माचा नवा प्रपंच मांडलेला आहे. ‘सोडविले अपार जीवजंतू’ या कथेत ज्ञानेश्वरकालीन समाजस्थितीवर बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनातून त्यांनी भाष्य केले. शिवाय यातील तत्त्वचिंतनाला भावरूप प्राप्त झाले आहे. ‘नाटक आणि पैलवान’ या कथेत रंगभूमीवरील प्रवृत्तींचे विडंबन आहे. ‘संभवामि युगे युगे’ या कथेतील कुंभ हे मानवी देहाचे प्रतीक आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील या संकल्पनेचा नरेश यांनी कलात्मक उपयोग करून घेतलेला आहे. एकुण त्यांच्या कथेतील आशयसूत्रांतून जीवनानुभवांची पृथगात्मकता व्यक्त झाली आहे.

नरेश कवडी हे मराठीचे नामवंत प्राध्यापक होते. तर्कशुद्ध विवेचनपद्धती आणि अस्खलित वाणी हा त्यांचा विशेष होता. भाषाशुद्धीकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. मुंबई विद्यापीठाच्या पणजी येथील पदव्युत्तर केंद्रात अभ्यागत व्याख्याते म्हणूनही त्यांनी काम केले. कोकणीतील कार्मेलिन  या कादंबरीच्या अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

४ एप्रिल २००० रोजी नरेश कवडी यांचे ७८ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन