योग्यता : भाषेच्या स्वरूपाची तात्त्विक चर्चा अनेक प्राचीन संस्कृत शास्त्रीय ग्रंथात केली आहे. त्यांच्यामध्ये अर्थप्रक्रियेच्या संदर्भाने आकांक्षा, योग्यता आणि सन्निधि किंवा आसत्ति या संकल्पनांचा सखोल विचार केलेला आहे. शब्दापासून अर्थाचे ज्ञान होत असताना काही मुख्य कारणे आणि काही सहकारी कारणे असतात. आकांक्षा, योग्यता आणि सन्निधि किंवा आसत्ति ही अर्थज्ञानाची सहकारी कारणे मानली आहेत. वाक्यामधे पदांचा परस्पर संबंध लावताना या तीनही कारणांची मदत होते.

वाक्यामध्ये अनेक अर्थपूर्ण शब्द असतात. त्या पदांचा परस्पर संबंधही अर्थपूर्ण असायला लागतो. पदापासून कळून आलेल्या अर्थांची अन्वयपात्रता म्हणजे योग्यता. म्हणजेच, पदांचा परस्पर संबंध जोडताना अर्थाला बाध न येणे. योग्यता म्हणजे एक शब्द व त्याचा अर्थ यातील नैसर्गिक संबंध. आधुनिक भाषाशास्त्रानुसार तो अनियंत्रित असतो ; परंतु पारंपरिक दृष्टिकोणानुसार तो तसाच कायम अस्तित्वात असतो. तो सबंध अविभाज्य असतो. ‘विस्तवाने सडा घालतो’ या वाक्यात पदांचा अर्थबोध होतो. पदांचे व्याकरणही बरोबर आहे. पण तरीही वाक्याचा एकंदर कळून येणारा अर्थ वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे समजून येते. कारण सडा घालणे हे पाण्याने केले जाते. विस्तवासारखा गरम पदार्थ हातातच धरणे शक्य नसते तर तो सडा घालायला कसा उपयोगी होईल? या अर्थाने योग्यता म्हणजे केवळ वाक्यार्थाला सहकारी कारण नसून वाक्याच्या प्रामाण्याचे एककारण म्हणून समजणे अधिक योग्य ठरते.म्हणून वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर असले तरीही त्यात योग्यता असेलच असे नाही. असे असल्याने योग्यता या कारणाचा विचार करणे अर्थाज्ञानामध्ये उपयोगी ठरते.

संदर्भ :

  • भागवत,वा. बा.(संपा), परमलघुमंजूषा (नागेश भट्ट लिखित ग्रंथ), भाग दुसरा, परामर्श प्रकाशनमाला, तत्त्वज्ञान विभाग,पुणे विद्यापीठ,१९९२.
  • Abhyankar,K.V. and Shukla, J. M., A Dictionary of Sanskrit Grammar – Fourth Edition, Oriental Institute, Vadodara, 2012.

•  Keywords :  #Ākāṅkşā,#Yogyatā, #Sannidhi, #Sahakārī Kāraņa, #Prāmāņya, #Vākyārtha