सन्निधि : भाषेच्या स्वरूपाची तात्त्विक चर्चा अनेक प्राचीन संस्कृत शास्त्रीय ग्रंथात केली आहे. त्यांच्यामध्ये अर्थप्रक्रियेच्या संदर्भाने आकांक्षा, योग्यता आणि सन्निधि किंवा आसत्ति या संकल्पनांचा सखोल विचार केलेला आहे. शब्दापासून अर्थाचे ज्ञान होत असताना काही मुख्य कारणे आणि काही सहकारी कारणे असतात. आकांक्षा,योग्यता आणि सन्निधि किंवा आसत्ति ही अर्थज्ञानाची सहकारी कारणे मानली आहेत. वाक्यामधे पदांचा परस्पर संबंध लावताना या तीनही कारणांची मदत होते.

अर्थबोधाच्या अनेक कारणांपैकी सन्निधि किंवा आसत्ति हे एक कारण. आसत्ति म्हणजे उच्चारण करतेवेळी पदातील वर्णांची किंवा वाक्यातील पदांची योग्य जवळीक. ती जर नसेल तर त्या पदाचा किंवा वाक्याचा अर्थ समजून येण्यात अडचण येते. रा हे अक्षर आज उच्चारले आणि उद्या जर म हे अक्षर उच्चारले तर राम हे पद अर्थबोधक होत नाही. त्यामुळे सन्निधि किंवा आसत्ति म्हणजे पदातील वर्णांचे न थांबता झालेले सलग उच्चारण त्यांची योग्य जवळीक होय. पदातील वर्ण जवळ असणे असाही अर्थ अपेक्षित आहे. काही वेळा संस्कृत श्लोकांमध्ये पदांची आसत्ति नसली तरीही त्यांचा परस्पर संबंध अन्वयाने लक्षात येतो. तरी पण अशा अन्वित पदांचेही उच्चारण सलगच असावे लागते. आज एक पद व उद्या दुसरे पद उच्चारले तर ते अर्थबोधक होत नाही. पद्य रचनेमध्ये पदे मागे पुढे असतील तरी पण विभक्तींच्या योग्य ज्ञानाने त्यांच्यातील आसत्ती लक्षात येते.

उदाहरणार्थ, भुक्त्वा तृणानि शुष्काणि पीत्वा तोयं जलाशयात् | दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः ||. या श्लोकामधे “लोकमातरः धेनवः” ही दोन्ही पदे कर्तृवाचक आहेत. ती जरी वृत्ताच्या सोयीसाठी श्लोकरचनेत शेवटी आली असली तरीपण अर्थ करताना ती आधी घ्यावी लागतात. आणि मग पदांची सन्निधि लक्षात घेऊन अन्वय लावावा लागतो. तो असा – लोकमातरः धेनवःशुष्काणितृणानि भुक्त्वा जलाशयात्तोयंपीत्वालोकेभ्यः दुग्धं यच्छन्ति|. तेव्हा पदांच्या आसत्तीचा विचार करत असताना संदर्भ खूप महत्त्वाचा असतो.

संदर्भ :

  • भागवत ,वा. बा.(संपा), परमलघुमंजूषा – (नागेश भट्ट लिखित ग्रंथ) भाग दुसरा –  परामर्श प्रकाशनमाला, तत्त्वज्ञान विभाग , पुणे विद्यापीठ , १९९२,
  • Abhyankar,K. V. and  Shukla, J. M., A Dictionary of Sanskrit Grammar,   Fourth Edition, Oriental Institute,Vadodara,2012 .

Keywords –  #Ākāṅkşā,#Yogyatā,#Sannidhi, #SahakārīKāraņa, #Sandarbha, #Vākyārtha