प्रादेशिक भाषावाङ्मयांचा उदय : वेदग्रंथांचे परमोच्च स्थान व संस्कृत भाषेचे देववाणी म्हणून महत्त्व प्रतिपादन करून वैदिक-हिंदु परंपरेने जरी सुरुवातीला जैन-बौद्धांच्या प्राकृत भाषांच्या धर्मोपदेशातील वापराबद्दल ‘अपभ्रंश-अपशब्द’ अशी विशेषणे लावून अनुदारपणा दाखविला, तरी बहुजनांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषिक प्रयत्न वैदिक-हिंदु परंपरेतही सुरू झाले. महाभारतासारखा ग्रंथ सांगतो की वेदग्रंथ हे स्त्री आणि शूद्रांना ऐकण्याची बंदी असल्यामुळे (स्त्री-शूद्र-द्विज-बन्धूनां त्रयी न श्रुतिगोचरा) भगवान् विष्णूनेच स्वत: व्यासरूपाने अवतार घेऊन महाभारत हा पंचम वेद निर्माण केला. खुद्द भगवद् गीतेतच ब्राह्मण-क्षत्रियांचे श्रेष्ठत्व मान्य करूनही “स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्” असे म्हणून गीतेतले तत्त्वज्ञान स्त्री-वैश्य-शूद्र या सर्वांना उपलब्ध आहे असे विधान केले आहे. महाभारत, रामायण आणि पुराणे हे वाङ्मय अशा प्रकारे सर्व समाजापर्यंत पोहोचावे अशा उद्देशाने निर्माण झाले. अर्थात संस्कृत भाषेतले हे वाङ्मय या वर्गांपर्यंत साक्षात कधी व कसे पोहोचत असेल याचा विचार करायला लागल्यावर देवळात संस्कृत पुराण वाचून स्थानिक भाषेत त्याचे विवरण करणाऱ्या पौराणिक लक्षात येतो. अशा प्रकारे या वेदोत्तर धार्मिक कथा आणि भक्ती वाङ्मयाचा प्रसार प्रादेशिक भाषांतून फार प्राचीन काळीच होऊ लागला असावा.  अशा प्रकारे स्त्री-शूद्रांना वेदवाङ्मय प्रादेशिक भाषांमध्ये समजावून सांगण्याची परंपरा अस्तित्वात असल्याचा पुरावा मात्र उपलब्ध नाही. कोणत्या का रूपाने असेना, बहुजनांपर्यंत पोहोचणारा प्रादेशिक भाषांचा वापर जैन, बौद्ध आणि हिंदु या सर्व परंपरांनी शेवटी मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो. धार्मिक विधीमध्ये सुद्धा यजमान ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य असेल तर पुरोहित वैदिक मंत्र वापरून ते विधी करीत असत, आणि जर यजमान त्रैवर्णिक नसेल, तर हे विधी पौराणिक मंत्र वापरून केले जात. अशा प्रकारे वैदिक ग्रंथ आणि पौराणिक ग्रंथ यांच्या धार्मिक वापरात काही प्रमाणात फरक पडत गेलेला दिसतो. बहुजनांसाठी पौराणिक मंत्र म्हणण्यास आणि पौराणिक ग्रंथांचे विवरण प्रादेशिक भाषेत करण्यास मुभा होती असे दिसते. एकनाथांच्या भागवत पुराणाच्या मराठी अनुवादाला किंवा तुकारामांच्या अभंगांना कर्मठ ब्राह्मणांनी केलेला विरोध यासारख्या गोष्टी असा विरोध काही प्रमाणात होत राहिला असे दाखवितात. परंतु शेवटी या गोष्टींमध्ये भक्तीच्या शक्तीमुळे प्रादेशिक भाषांतल्या वाङ्मयाची श्रेष्ठता कशी सिद्ध झाली हे दर्शविले जाते. अशा प्रकारे संस्कृत व प्रादेशिक भाषा यांच्यामध्ये संघर्ष होत राहिले, परंतु प्रादेशिक भाषांची वाङ्मयीन प्रगतीही होत राहिली.

पाली व अर्धमागधी भाषांचा बौद्ध व जैन वाङ्मयातला वापर हा प्रादेशिक भाषांचा सर्वात जुना धार्मिक वापर आहे. त्यानंतर इसवीसनाच्या सुमारे पाचव्या शतकात जैन बौद्ध परंपरांना टक्कर देणारे शैव व वैष्णवांचे तामिळ वाङ्मय निर्माण होऊ लागले. या वाङ्मयात समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याची क्षमता होती, आणि सर्व स्तरांतील व्यक्तींनी हे वाङ्मय निर्माण करण्यात भाग घेतलेला दिसतो. वैष्णव आळवार आणि शैव नायनमार या संत परंपरांनी हे वाङ्मय निर्माण केलेले आहे. या भक्तिवाङ्मयात आंडाळसारख्या स्त्रियांच्या कृतींचाही अंतर्भाव केलेला दिसतो. काही प्रमाणात ब्राह्मणी परंपरेचे आणि संस्कृत भाषेचे वर्चस्व झुगारून या वाङ्मयात प्रादेशिक भाषांनी आपले स्थान बळकट केलेले दिसते. बहुजनांच्या प्रादेशिक भाषेतूनही ईश्वराचे आराधन करता येते, व यासाठी उच्चवर्णीय असण्याची किंवा संस्कृत भाषाच वापरण्याची गरज नाही अशी प्रवृत्ती या वाङ्मयात आहे. या आधीचे संगम या नावाने प्रसिद्ध असलेले काव्य वाङ्मयही तामिळ मध्ये प्रसिद्ध आहे. जैन आणि बौद्ध परंपरांनीही तामिळ भाषेत वाङ्मय निर्माण केले आहे. तोलकाप्पियम् सारख्या ग्रंथाने व्याकरणाच्या क्षेत्रातही तामिळ भाषेचा वापर केलेला आहे. वैष्णव आळवार संतांनी रचलेल्या रचनांचा संग्रह नाथमुनी या वैष्णव ब्राह्मण संताने नवव्या शतकात दिव्यप्रबन्ध  या ग्रंथात केला, आणि या ग्रंथाला तामिळवेद म्हणण्याची प्रथा सुरू झाली. तामिळनाडूमधल्या रामानुजाचार्यांनी प्रतिष्ठापित केलेल्या विशिष्टाद्वैती वैष्णव भक्तीपरंपरेत संस्कृत वेदांइतकेच महत्त्वाचे स्थान या तामिळ वेदाला दिले आहे.

कर्नाटकात प्रादेशिक भाषा जैन आणि हिंदु परंपरांनी वापरलेली दिसते. यात ब्राह्मणी परंपरेपासून थोडेसे दूर असलेली वीरशैवांची शैव परंपरा आहे. तसेच सोळाव्या शतकातले पुरंदरदास आणि कनकदास हे वैष्णव भक्त आहेत. मध्वाचार्यांच्या परंपरेतल्या आणि विजयनगरच्या राजांनी गुरु मानलेल्या व्यासतीर्थ (इ.स. १४४७-१५३९) या स्वामींनी एकाच वेळी संस्कृतविद्येचाही पुरस्कार केला आणि संस्कृतभाषेत दार्शनिक ग्रंथ लिहिले, आणि दासकूट नावाची संस्था उभी करून पुरंदरदास आणि कनकदास यांसारख्या कानडी भाषेत भक्तीकाव्य लिहिणाऱ्या संतांनाही मार्गदर्शन केले.

संदर्भ :

  • Deshpande, Madhav M., Sanskrit & Prakrit Sociolinguistic Issues, Motilal Banarsidass, Delhi, 1993.

Key Words: #संस्कृत-संस्कृतेतर भारतीय भाषांचे संबंध, #प्राकृत, #पाली, #अर्धमागधी