वेदवाङ्मयाच्या संरक्षणाचे वेदोत्तरकालीन प्रयत्न : उपनिषदांच्या नंतरच्या काळात आपण जसा प्रवेश करतो तसे आपल्याला वेदांचे संरक्षण कसे करायचे आणि त्यांचा विनियोग कसा करायचा याविषयीची बरीच मतमतांतरे दिसून येतात. वेदांचे सुरक्षित पठनपाठन आणि विनियोग कसा होणार याबद्दलची चिंता उत्पन्न होण्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे भाषेत काळाच्या ओघात होत जाणारा बदल. माौखिक परंपरेने शेकडो वर्षे जतन करून ठेवलेल्या वेदग्रंथांची भाषा आणि उत्तरकालीन संस्कृत भाषा यांच्यात खूप परिवर्तन झालेले आहे. वेदांमधली बरीच शब्दसंपत्ती पुढील संस्कृतभाषेत लुप्त झालेली दिसते. क्रियापदांची अनेक रूपे पुन्हा दिसत नाहीत. मूळ वैदिक संहितांमध्ये उदात्त, अनुदात्त, स्वरित असे तीन स्वर आहेत, तर शतपथब्राह्मणासारख्या उत्तरकालीन ग्रंथात दोन स्वर आहेत, आणि बरेचसे उत्तरकालीन वैदिकवाङ्मय स्वरहीन झाले आहे. वैदिक वाङ्मयाच्या शेवटच्या काळातच या सर्व भाषिक परिवर्तनांमुळे वेद टिकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू झालेले दिसतात. त्यातला सर्वात महत्त्वाचा पहिला प्रयत्न म्हणजे वैदिक संहितांचे पदपाठ तयार करणे. संहितांमधले मूळ वेदमंत्र दोन शब्दांच्या मध्ये न थांबता अखंड संधी करत म्हटले जातात. उदाहरणार्थ ऋग्वेदाच्या पहिल्या ऋचेची सुरुवात “अग्निमीळेपुरोहितंयज्ञस्यदेवमृत्विजम्” अशी संहिता पाठात आहे. या ओळीत शब्द काय आहेत हे समजण्यासाठी शाकल्यासारख्या प्राचीन विद्वानांनी शब्द तोडून दर दोन शब्दांच्या मध्ये थांबत थांबत पदपाठ तयार केला. उदाहरणार्थ शाकल्याने वरील ओळीचा पदपाठ “ अग्निम् । ईळे । पुर:ऽहितम् । यज्ञस्य । देवम् । ऋत्विजम् ।” असा  केला आहे.  या पदपाठात केवळ शब्दच तोडले आहेत असे नाही, तर ‘पुरोहितम्’ या समासाचीही ‘पुर:ऽहितम्’ अशी फोड केलेली दिसते. शाकल्याने जरी संधी तोडण्याचे किंवा समासांची फोड करण्याचे नियम स्पष्टपणे दिलेले नाहीत, तरी त्याने पदपाठात करून ठेवलेल्या विभाजनावरून आपल्याला शाकल्याला अभिप्रेत असलेल्या भाषाशास्त्रीय नियमांचा अंदाज करता येतो. पुढच्या काळात काही परंपरांमध्ये पदपाठ हाच मूळ पाठ धरून त्यातले शब्द संधीच्या नियमांनी जोडून संहितापाठ तयार होतो अशी कल्पना पुढे आली. पदपाठावर आधारित असे शब्दांची उलटसुलट रचना करून म्हणण्याचे अनेक प्रकार नंतर निर्माण झाले.  उदाहरणार्थ एका वेळेस दोन दोन शब्द “अग्निमीळे । ईळेपुरोहितं । पुरोहितं यज्ञस्य ।…” असा क्रमपाठ तयार झाला. दोन शब्द सुलट-उलट-सुलट “अग्निमीळईळेऽग्निमग्निमीळे” असा म्हणण्याचा जटापाठ तयार झाला.  “अग्निमीळईळेग्निमग्निमीळेपुरोहितंपुरोहितमीळेग्निमग्निमीळेपुरोहितं” हा झाला घनपाठ तयार झाला. संपूर्ण संहितेचे घनपाठापर्यंत पठन करणाऱ्या वेदपाठकाला आजतागायत घनपाठी ही पदवी दिली जाते. जेव्हा वैदिक ग्रंथांच्या रक्षणाची परंपरा पूर्णत: मौखिक होती तेव्हा एकाही शब्दाचा किंवा शब्दक्रमाचा बदल मूळ ग्रंथात होऊ नये यासाठी हे वेगवेगळे पाठ (विकृतिपाठ) निर्माण केले गेले. या विकृतिपाठांकडे पाहून गणिती पद्धतीने मूळ पाठ काय आहे हे चटकन शोधून काढता येते. नंतरच्या काळातील वेदपाठक जरी हे विकृतिपाठ केवळ कंठस्थ करून म्हणत असले, तरी मूळ हे पाठ तयार करणाऱ्या शाकल्य यांसारख्या विद्वानांच्या कार्याला भारतीय भाषाविज्ञानाची पहिली पाउले म्हणून म्हणायला हवे. शाकल्याचा उल्लेख पाणिनीच्या सूत्रांमध्ये पूर्वाचार्य म्हणून केला आहे.

संदर्भ :

  • Deshpande, Madhav M., Sanskrit & Prakrit Sociolinguistic Issues,    Motilal Banarsidass, Delhi, 1993.

Key Words: #वेदरक्षण, #वेदांचे पठन, #विकृतिपठन, #घनपाठ