नैयायिक आणि वैशेषिक यांचा भाषाविचार : जैन-बौद्धांना विरोध करताना आणि वेदप्रामाण्याची सिद्धी करताना नैयायिक आणि वैशेषिक यांनी वेगळा मार्ग स्वीकारलेला दिसतो. त्यांच्या मते वेद हे प्रमाणभूत आहेत, कारण ते ‘आप्त’ असलेल्या ईश्वराची वचने आहेत. आप्त म्हणजे यथार्थ सांगणारी किंवा खरे बोलणारी व्यक्ती. कुठलाही माणूस सर्वज्ञ किंवा पूर्णत: दोषमुक्त असू शकत नाही यावर त्यांचे मीमांसकांशी एकमत आहे. परंतु वेद हे अपौरुषेय नसून ईश्वराने बोललेली वचने आहेत असे मत मांडताना ईश्वरकल्पनेवर जैन-बौद्धांनी घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्याची जबाबदारी या हिंदु तार्किकांनी उचललेली दिसते. जैन-बौद्धांनी केलेल्या ईश्वर-निराकरणाला उत्तर म्हणून ईश्वरसिद्धीसाठी अनुमाने नैयायिक-वैशेषिकांनी दिली आहेत. ईश्वरच सर्वज्ञ असतो आणि सर्वदोषविनिर्मुक्त असतो. तसेच ईश्वराला त्यानेच निर्माण केलेल्या जगाविषयी करुणा आहे. त्यामुळे ईश्वराच्या शब्दांवर विश्वास ठेवायला हरकत नाही. ईश्वराचे शब्द असलेले वेद ऋषींना दर्शनरूपाने प्राप्त झाले आणि त्यांनी ते मौखिक परंपरेने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवले. ऋषी हे वेदांचे कर्ते नसून केवळ द्रष्टेच आहेत. अशा रीतीने नैयायिक व वैशेषिकांनी जैन-बौद्धांच्या वेदविरोधाचा प्रतिवाद केला आहे. त्यांच्या मतात देखील संस्कृत भाषेचा ईश्वरी संबंध आहे, तसे प्राकृत भाषांचा नाही.  संस्कृतभाषेतल्या प्रत्येक शब्दाचा हा अर्थ असे ईश्वरेच्छेनेच ठरविले आहे (अस्मात् पदाद् अयमर्थो बोद्धव्य इति ईश्वरेच्छा सङ्केत:). अशी ईश्वरेच्छा फक्त संस्कृत शब्दांची अर्थवत्ता सिद्ध करते. तशी मूलभूत अर्थवत्ता अपभ्रंश-प्राकृत शब्दांना नाही. अशा भाषा वापरून ज्या धर्माचा उपदेश मानवी गुरूंनी केला त्यावर विश्वास कसा ठेवावा. अशा प्रकारे प्राकृतभाषी जैन-बौद्धांची विश्वसनीयता हिंदु तार्किकांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

संदर्भ :

  • Deshpande, Madhav M., Sanskrit & Prakrit Sociolinguistic Issues, Motilal Banarsidass, Delhi, 1993.

Key Words: #हिंदु तार्किक, #नैयायिक, #वैशेषिक, #वेदांचे ईश्वरप्रणीतत्व