‘प्रसव’ किंवा ‘सर्ग’ याचा अर्थ सृष्टी किंवा निर्मिती असा आहे. ‘प्रतिप्रसव’ म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टीचा क्रमश: मूळ कारणात लय होणे. प्रकृति म्हणजे सत्त्व, रजस्, तमस् या त्रिगुणांची साम्यावस्था होय. या अवस्थेतील प्रकृतीला मूल प्रकृति (प्रधान) म्हणतात. पुरुषाच्या सान्निध्यामुळे त्रिगुणांमध्ये विषमता उत्पन्न झाल्यावर मूल प्रकृतीपासून सृष्टी म्हणजे महत् इत्यादी २३ तत्त्वांची उत्पत्ती होते. या उत्पत्तीला ‘प्रसव’ म्हणतात. प्रकृतीचा प्रपंच पुरुषाच्या (आत्म्याच्या) उपभोगासाठी आणि त्याच्या अपवर्गासाठी असतो. पुरुषाला विवेकज्ञान झाल्यावर त्याला कैवल्यप्राप्ती होते. त्याला भोग आणि अपवर्ग प्रदान केल्यावर गुणांचे कार्य अर्थात प्रकृतीचे कार्य संपते, म्हणून त्रिगुणात्मक सृष्टीचा मूल प्रकृतीत (प्रधानात) लय होतो, यालाच ‘प्रतिसर्ग’ किंवा ‘प्रतिप्रसव’ म्हणतात. पतंजलींच्या सूत्रात “सत्त्वादि गुणांना पुरुषासाठी काही प्रयोजन न उरल्यामुळे त्यांचा जो आपापल्या कारणात लय (प्रतिप्रसव) होणे अथवा पुरुषाचे केवळ आपल्या स्वरूपाने राहणे याला कैवल्य म्हणतात,” अशी कैवल्याची व्याख्या आलेली आहे. यात प्रतिप्रसव ही संज्ञा आली आहे (पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसव: कैवल्यं, स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति| योगसूत्र ४.३४).
प्रतिप्रसवाच्या प्रक्रियेत प्रधान किंवा मूल प्रकृतीपासून उत्पन्न झालेली २३ तत्त्वे प्रतिलोम रूपाने म्हणजे ज्या क्रमाने त्यांची निर्मिती झाली आहे त्यापेक्षा उलट क्रमाने आपापल्या कारणांमध्ये लीन होऊन शेवटी प्रधानात किंवा मूल प्रकृतीत लय पावतात. सर्व भौतिक पदार्थ पाच महाभूतांत; पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ही महाभूते अनुक्रमे गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द या तन्मात्रात; तन्मात्र, इंद्रिये व मन अहंकारात; अहंकार बुद्धीत (महत्तत्त्वात) व बुद्धी प्रकृतीत विलीन होते. येथे प्रतिप्रसव अथवा प्रतिसर्गाची प्रक्रिया पूर्ण होते. गुणांचा क्षोभ (विषमावस्था) शमतो (योगसूत्र ४.३२). व प्रकृति साम्यावस्थेला पोहोचते. हा प्रतिप्रसव होय. याला प्राकृतिक लयही म्हणता येईल. हा प्रतिप्रसव ‘कृतार्थ’ म्हणजे कैवल्य प्राप्त झालेल्या पुरुषाच्या बाबतीत संभवतो. पुरुष असंख्य आहेत. ज्या ज्या पुरुषाला विवेकज्ञान झाले नाही तो तो पुरुष ‘अकृतार्थ’ आहे. त्याला कैवल्य प्राप्त होईपर्यंत त्याच्यासाठी प्रकृतीचा प्रवाहरूप सृष्टिप्रपंच चालूच राहतो. म्हणून पतंजलि असे म्हणतात की, दृश्य (महत् इत्यादी २३ तत्त्वरूपी सर्ग) कृतार्थ पुरुषाकरिता समाप्त झाले असले तरी ते अन्य बद्ध पुरुषांकरिता समाप्त झाले नाहीत (अनष्टम्), त्यांच्याकरिता ते विद्यमान आहेच (कृतार्थं प्रति नष्टम् अप्यनष्टं, तद् अन्यसाधारणत्वात् | योगसूत्र २.२२). उपरोक्त लय, प्रलय किंवा प्रतिप्रसव हे सांख्य व योग दर्शनाचे अंतिम लक्ष्य आहे. ब्रह्माण्डसंहार या अर्थी प्रलयाची संकल्पना सांख्ययोग दर्शनात आढळत नाही. उत्पत्तीच्या जोडीने प्रलयाचा उल्लेखही सांख्यकारिकेत (६९) नाममात्र आहे.
समीक्षक : मधुसूदन पेन्ना