बहुमत : बहुमत ही एक राजकीय प्रक्रिया आणि सिद्धांताशी संबंधित संकल्पना आहे. सर्वाधिक मते, निर्विवाद बहुमत आणि विशेष बहुमत अशा संकल्पना या संदर्भात वापरल्या जातात. शब्दशः अर्थ निम्म्याहून अधिक असा होतो. पण राजकारणातील विविध संदर्भामध्ये बहुमताचे वेगवेगळे प्रकार अथवा अर्थ प्रचलित आहेत. उदा. सार्वजनिक निवडणुकीत अनेक उमेदवारांपैकी सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार बहुमत मिळवून निवडून आला असे म्हटले जाते. कायदेमंडळाच्या संदर्भात ज्या पक्षाचे गटाचे निम्म्याहून अधिक सभासद असतील त्याला बहुमताचे किंवा निर्विवाद बहुमत असल्याचे मानले जाते. विशिष्ट संदर्भात मुख्यतः घटनादुरूस्ती विषयक प्रस्तावांच्या बाबतीत विशेष बहुमत आवश्यक असते. विशेष बहुमत म्हणजे दोन तृतीयांश किंवा तीन चतुर्थांश बहुमत. उदा. भारतात घटनादुरूस्तीसाठी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांच्या दोन-तृतीयांश बहुमत मिळावे लागते. म्हणजेच बहुमत या संकल्पनेला विविध अर्थ छटा आहेत.
संदर्भ :
- Rosen, Frederick, Classical Utilitarianism from Hume to Mill, Rutledge, New York, 2003.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.