सर्वोदय : सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे. रस्किनच्या अन टू धिस लास्ट  या पुस्तकाचा गांधीजींनी गुजराती भाषेत अनुवाद करुन त्याला सर्वोदय नाव दिले होते. विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांनी या विचाराचा विकास घडविला. सर्वोदयाचे मूळ गांधींच्या विचारसरणीत शोधावे लागते. आधुनिक समाजासमोरील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी गांधी विचारसरणीचा अवलंब करणे म्हणजे सर्वोदय होय. सर्वोदय हा समाजातील सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार करणारा विचार आहे. व्यक्तीची सहाय्यता महत्त्वाची मानणारा, आर्थिक व सामाजिक समतेवर आधारलेल्या शासनमुक्त समाजाचा आग्रह धरणारा हा विचार आहे. सत्य व अहिंसेवर आधारित स्पर्धा, विषमता, संघर्ष आणि शोषणाला मुळीच स्थान नसलेली व समाजाच्या अगदी कनिष्ठ पातळीवरील व्यक्तीलाही विकासाची समान संधी उपलब्ध करून देणारी समाजरचना म्हणजे सर्वोदय होय. या विचारात समाज कल्याण साधण्यासाठी भौतिक, आर्थिक व आध्यात्मिक साधनांवर भर देण्यात आला आहे. ज्या समाजात सर्व व्यक्ती व गटांना सूख लाभू शकेल असा समाज सर्वोदय-विचार निर्माण करू इच्छितो.

आचार्य विनोबा भावे यांनी सर्वोदयी समाजाची तीन वैशिष्टये निश्चित केली आहे. पहिले म्हणजे समाजात कोणत्याही एका सत्तेचे वर्चस्व असू नये. केवळ चांगल्या विचारांचे अनुशासन असावे. दुसरे वैशिष्टय म्हणजे व्यक्तीच्या अंगी असलेल्या सर्व गुणांचा उपयोग समाजाला कसा होईल आणि व्यक्तीबरोबर समाजाची वाढ आणि विकास कसा साधेल हे पाहिले पाहिजे. सर्वोदय समाजाचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक आणि आर्थिक मूल्यांचे रक्षण व संवर्धन अत्यंत प्रामाणिकपणे झाले पाहिजे.अधिकाधिकांचे अधिकाधिक सुख या तत्त्वापेक्षा सर्वोदयाचे ध्येय व्यापक आहे. कारण यात प्रत्येकाचा अभ्युदय लक्षात घेतला आहे. जगा व जगू द्या विचारापेक्षा इतरांसाठी जगा या विचारांचा व्यवहारात अवलंब करणे सर्वोदयाला अपेक्षित आहे.

प्रत्येक व्यक्ती स्वभावत: चांगली, सद्ववर्तनी, त्यागी व सद्गुणी आहे, यावर सर्वोदयाचा विश्वास आहे. मात्र सामाजिक परिस्थितीमुळे हे गुण लुप्त होतात. ही परिस्थिती बदलली तर मानवाच्या आमचे अंगचे सद्गुण पुन:श्च प्रत्यक्षात येतील असा या तत्त्वज्ञानाचा विश्वास आहे. सत्य, अहिंसा, स्वार्थत्याग, आत्मसंयमन इत्यादींचे संस्कार ग्रहण करण्याची क्षमता मानवमात्रात आहे. तपस्या आणि आवाहने यांच्या माध्यमातून हे संस्कार घडविले जाऊ शकतात. शासनाने लादलेल्या बंधनांऐवजी व्यक्ती स्वतःहून नैतिक बंधने स्वीकारतील असे सर्वोदयाला वाटते. व्यक्तीने नैतिक बदलातून, आत्मिक विकासातून सर्वोदयी समाज साकारायचा आहे. राज्यसंस्था, कायदे, वर्तमान लोकशाही शासनप्रकार, निवडणुका, राजकीय पक्ष इत्यादी संस्थांबद्दलचा अविश्वास सर्वोदयात व्यक्त झाला आहे. या संस्था आज कितीही लोकमान्य झाल्या असल्या व भारतीय समाजजीवनात रूढ झाल्यासारख्या दिसत असल्या तरी त्या भारताचे सर्व तऱ्हेचे प्रश्न समाधानकारकपणे सोडवू शकतील असे सर्वोदयाच्या प्रवर्तकांना वाटत नाही. उलटपक्षी समाजातील अनिष्टांना दृढमूल करण्यातच त्या कारणीभूत ठरतील अशी भीती ते व्यक्त करतात. अतिकेंद्रित राज्यव्यवस्था, प्रचंड प्रमाणावर औद्योगीकरण व यांत्रिकीकरण, राष्ट्रीय नियोजनाला प्राधान्य, अतिसंघटित पक्षरचना इत्यादींवर अत्यंत प्रखर टीका सर्वोदयवाद्यांनी केली आहे. जेव्हा प्रत्येक खेडे आपापला कारभार कार्यक्षमपणे व स्वावलंबनपूर्वक पार पाडू शकेल तेव्हा केंद्रवर्ती शासनाची आवश्यकताच राहणार नाही असा अराज्यवादी दृष्टिकोण गांधींनी मांडला होता. समाजात विषमता राहणार नाही, धनिक लोक आपल्या मालमत्तेकडे विश्वस्ताच्या भूमिकेतून पाहातील, सर्वांच्या किमान गरजा भागलेल्या असतील, भवितव्याची चिंता कुणालाच असणार नाही.

समाज व्यक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य व स्वायत्तता देईल; म्हणून तो शासनमुक्त समाज असेल. शासन संपुष्टात आणण्याच्या संक्रमण काळात काही एक व्यवस्था निर्माण करावी लागेल. ती विश्वस्त मंडळ सारखी असून, सर्वोदयवाद्यांचा लोकशाहीतील बहुमत किंवा अल्पमतावर विश्वास नाही. बहुमत हे एक फसवे तत्त्व असून, बहुमताला निश्चित काही कळते असे होत नाही. त्यामुळे सर्वोदय समाज हा स्वयंनियंत्रित, स्वव्यवस्थापनीय आणि लहान लहान समुदायांमध्ये विभागला असला तरी, समान मूल्य आणि तत्त्वांवर चालणारा न्याय आणि समताधिष्ठित असा समाज असला पाहिजे. अशा परिस्थितीत संघर्षाचे बीजच राहणार नाही. त्यामुळे पाशवी दंडशक्तीच्या बळाची गरज त्या समाजाला राहणार नाही. केंद्रीय राज्ययंत्रणा अशा प्रकारे अनावश्यक ठरली की, राजकीय पक्षांनाही वाव उरणार नाही व परिणामी पक्षपद्धतीतून उद्भवणारी अनिष्टेही अस्तंगत होतील, असे सर्वोदयाचे तर्कशास्त्र आहे. पक्षाधिष्ठित लोकशाहीत भ्रष्टाचार वाढतो, विषमता, अनैतिकता, उथळपणा व स्वार्थी वृत्ती बळावते. वैयक्तिक हेवेदावे निर्माण होतात. संपूर्ण लक्ष निवडणुका जिंकण्यावर केंद्रित होऊन नीती आणि अनीती यांचे तारतम्य राहत नाही. निवडणुकीनंतर एखादा पक्ष सत्ताधारी बनला म्हणजे राष्ट्रहितापेक्षा त्याचे लक्ष पक्षहितावरच राहते. हे सर्व टाळायचे असेल तर पक्षविरहित लोकशाही प्रस्थापित होणे आवश्यक आहे.

सर्वोदयातील समाजरचनेचे चित्र मांडताना विनोबांनी आर्थिक व राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण, स्वयंपूर्ण स्वावलंबी गावांची निर्मिती, सर्व संमतीने चालणारी निर्णय प्रकिया, विश्वस्त वृत्तीने संपत्तीचा सांभाळ व संपूर्ण समानता इत्यादी तत्त्वांवर भर दिला आहे. सर्वोदयी समाजात सत्ता आणि अधिकारांचे विभाजन आणि विकेंद्रीकरण होऊन प्रत्येक व्यक्तीला स्वराज्याच्या कारभारात सहभाग घेता येईल. सर्वोदयात सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा विचार राजकीय व आर्थिक अशा दोन्ही कारणांनी आवश्यक मानला आहे. प्रत्येक गावात सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. प्रत्येक गावात ग्राम राज्याची स्थापना झाली पाहिजे. प्रत्येक खेडे हे एक गणराज्य असेल. आत्मसंरक्षणसुद्धा ते स्वबळावर करतील. गावचा कारभार तेथील जेष्ठांच्या हाती असेल. विधीविषयक, कार्यकारी व न्यायविषयक सत्ता ज्येष्ठांचे हाती राहतील. सर्व निर्णय हे एकमताने घेतले जातील, बहुमताने नव्हे. सर्वोदयी समाजात अंतिम सत्ता ही लोकांच्या हाती असेल. तिचा निकष नैतिक अधिकार हा असेल. लोकांची इच्छा-आकांक्षा हा राज्याच्या कार्याचा आधार असेल. सर्वोदयाच्या विचारसरणीनुसार ग्रामजीवन हा भारताचा आत्मा असल्यामुळे या देशाचा कोणताही सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार खेडे हा केंद्रबिंदू मानूनच झाला पाहिजे. ‘खेड्यांचे राष्ट्रकुल’ असे स्वतंत्र भारताबद्दलचे चित्र गांधींनी रेखाटले होते. या व्यवस्थेत प्रत्येक खेडे हे आपल्या प्रशासनासाठी व गरजांच्या पूर्तीसाठी एक स्वायत्त एकक असेल असे गृहीत धरण्यात आले होते.

गाव स्वायत्त, स्वयंपूर्ण व स्वावलंबी असावे. ग्रामोद्योगामार्फत गरजेइतकेच उत्पादन केले जावे. समाजातील सर्वांचा आणि प्रत्येकाचा अभ्युदय व्हावा, गावातील निर्णय हे बहुमताने न घेता सर्वसंमतीने घ्यावे. राज्याचे हेतू राज्यकारभार करण्यापेक्षा जनतेची सेवा करणे असेल, परंतु त्यासाठी राज्याला जनतेकडून अगदी थोडी आणि वाजवी सत्ता प्राप्त होईल. सर्वोदयात आर्थिक व सामाजिक समता हे महत्त्वाची मानलेली आहे. त्यासाठी विश्वस्त कल्पनेच्या विचाराचा आधार घेतला आहे. भूदान, ग्रामदान ही तत्त्वे याच विचारांचा भाग आहेत. ग्रामदान हा भूदानाचा शेवटचा टप्पा असून गावातील लोकांनी कुटुंबाप्रमाणे मिळून-मिसळून वागावे. गावची संपूर्ण जमीन सर्वांची व्हावी आणि सर्वांनी वाटून खावे असे विनोबा म्हणतात. सर्वोदयात नैतिक सहाय्यता महत्त्वाची आहे व आत्मिक विकासाचा आग्रह हा सर्वोदयात धरला जातो. संपत्तीचे एकत्रीकरण करून तिचे समान वाटप करायचे ही समाजवादी कल्पना सर्वोदय तत्त्वज्ञानाला मान्य नाही. अशा योजनांमुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडतो व त्यामुळे त्याला हिंसेला पोषक परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच आर्थिक विकेंद्रीकरण आवश्यक आहे, असे हा विचार मानतो. गावकऱ्यांच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या सर्व प्राथमिक व बऱ्याचशा दुय्यम गरजा गावातच भागविल्या गेल्या पाहिजेत व शेतीला पूरक अशा ग्रामोद्योगांचे जाळे निर्माण झाले पाहिजे म्हणजे खेडी स्वावलंबी बनू शकतील.

विनोबा प्रणित सर्वोदय विचारांनुसार ग्रामसंघटनेपेक्षा श्रेष्ठतर अशी कोणतीच सत्ता राहणार नाही. प्रांतिक सत्ता फक्त ग्रामांची संघटना घडवून आणील आणि राष्ट्रीय सत्ता प्रांताची सत्ता घडवून आणणारी निमित्तमात्र संघटना असेल अशा स्वायत्त राष्ट्रांचे परस्पर सहकार्य घडून आणणारी अखिल मानवसत्ता देखील निमित्तमात्र असेल. ग्राम संघटना व जागतिक संघटना यांच्या दरम्यान प्रशासनाची उतरंड असणार नाही. जनता स्वावलंबी व सहकारी झाल्यावरच अशी राजकीय व्यवस्था निर्माण होऊ शकेल. स्वतंत्र जनशक्ती निर्माण करण्यासाठी विचार-शासन व कर्तृत्व-विभाजन असे दोन मार्ग सर्वोदयात सांगितले आहेत. सर्वोदयी समाजातील संघटना मूकपणे आज्ञापालन करणाऱ्यांची संघटना नाही, तर आपली इच्छा दुसऱ्यावर न लादता केवळ विचार समजावून देणे असे या संघटनेचे स्वरूप राहील. या समाजात राष्ट्रीय नियोजनाऐवजी ग्राम-नियोजनाला प्राधान्य असेल व त्याला आवश्यक ती मदत देणे एवढेच केंद्रीय सत्तेचे कार्य राहील. आधुनिक जगातील साम्यवादी देशांमध्ये तर एकपक्षीय प्राबल्य आहेच. पण तथाकथित लोकशाही देशातील राजकीय क्षेत्रात पक्षीय राजकारण आणि त्यांच्या काही नेत्यांचे स्वार्थी डावपेच हेच प्रभावी बनत चालले आहे. अशा स्थितीत सर्वोदय तत्त्वज्ञानानेच खऱ्याखुऱ्या लोकशाहीचे महत्त्व पटवून देऊन त्यावर होणाऱ्या आघातांपासून समाजाला सावध केले आहे. नजीकच्या भविष्यकाळात कदाचित हा विचार प्रत्यक्षात उतरू शकणार नाही. पण त्यात ज्या आदर्श मानवी समाजाची कल्पना आहे ते निश्चितच तर्कसंगत व आकर्षक आहे.

गांधींच्या हयातीत त्यांचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही. त्यांचे हे अपूर्ण कार्य त्यांच्या निधनानंतर त्यांचे मानसपुत्र आचार्य विनोबा यांनी हाती घेतले. गांधींचे कार्य हे अत्यंत क्रांतिगर्भ आहे अशा जाणिवेतून विनोबांनी त्यास हात घातला आणि आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी त्या कार्यासाठी वाहून घेतले. पुढे जयप्रकाश नारायण या जीवनदानी कार्यकर्त्यानेही या यज्ञात उडी घेतली आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर सर्वोदयाच्या तत्त्वज्ञानात मोलाची भर घातली आहे.

संदर्भ :   

  • गर्गे, स.मा.(संपा), भारतीय समाजविज्ञान कोश (खंड-४,अभ्यंकर, र.सी. यांचा लेख ), पुणे, मेहता पब्लिशिंग हाऊस, २००७.
  • जोशी, बी. आर., सामाजिक शास्त्रातील संज्ञा सिद्धांतांचा कोश-राज्यशास्त्र, पुणे, डायमंड पब्लिकेशन्स, २००७.
  • देव, वि., राज्यजिज्ञासा, पुणे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, २०१६.
  • भोळे, भा.ल., आधुनिक भारतातील राजकीय विचार, नागपूर, पिंपळापुरे ॲण्ड कं. पब्लिशर्स, २००३.
  • व्होरा, रा.; पळशीकर, सु., राज्यशास्त्र कोश, पुणे, दास्ताने रामचंद्र आणि कं., १९८७.