खोटे, दुर्गा : ( १४ जानेवारी १९०५ – २२ सप्टेंबर १९९१ ).
मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री. त्यांचा जन्म मुंबईत एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे वडील पांडुरंग लाड हे व्यवसायाने बॅरिस्टर होते. त्यांच्या आईचे नाव मंजुळाबाई. दुर्गाबाईंचे शालेय शिक्षण कॅथिड्रल हायस्कूलमध्ये झाले. त्यांना शालेय वयापासून अभिनयात रस होता. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. मात्र त्याचवेळी विवाह झाल्याने त्या ते शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व होते.
विवाहानंतर काही कालावधीत दुर्गाबाईंनी घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे चित्रपटांत काम करण्याचा निर्णय घेतला. मोहन भवनानींच्या फरेबी जाल या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा छोटीशी भूमिका मिळाली. या चित्रपटातील काही भाग बोलका होता. पण हा चित्रपट चालला नाही. त्यावेळी चित्रपटांमध्ये सहसा स्त्रिया काम करीत नसत. अशावेळी एका कुलीन घरातल्या स्त्रीने चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे त्यांना समाजातील काही लोकांची टीकाही सहन करावी लागली. पुढे प्रभात फिल्म कंपनीच्या व्ही. शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा (१९३१) या पहिल्याच बोलपटात त्यांना तारामतीची भूमिका मिळाली. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोनही भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटांतील गाणी त्यांनी स्वत: गायली होती. त्यांनी गायिलेली ‘बाळा का झोप येईना’, ‘आनंद दे अजि सुमन लीला’, ‘बाळ रवि गेला’ ही गाणी त्या वेळी अतिशय लोकप्रिय झाली. पुढच्या मायामच्छिंद्र या चित्रपटात त्यांनी एका योद्धा स्त्रीची भूमिका केली होती. हे दोनही चित्रपट खूप गाजले. या चित्रपटांमुळे दुर्गाबाईंना प्रसिद्धी मिळाली.
कोलकात्याच्या न्यू थिएटर्स या प्रख्यात संस्थेने दुर्गाबाईंना राजरानी मीरा (१९३३) या चित्रपटासाठी पाचारण केले. तेथे त्यांना देवकी बोससारख्या आणखी एक श्रेष्ठ दिग्दर्शिका लाभल्या. त्यानंतर त्या सीता (१९३४), अमरज्योती (१९३६), पृथ्वीवल्लभ (१९४३), लाखारानी (१९४५), हम एक हैं (१९४६) आदी विविध हिंदी चित्रपटांत चमकल्या. त्यांनी नटराज फिल्म ही निर्मिती संस्था काढली. या संस्थेकडून साथी (१९३७, मराठी चित्रपट- सवंगडी) या चित्रपटाची निर्मिती केली. पण हा चित्रपट चालला नाही. गीता, विदुर, जशास तसे, मोरूची मावशी, सीता स्वयंवर, मायाबाजार यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. अत्रे पिक्चर्सच्या चरणोंकी दासी (हिंदी), पायाची दासी (मराठी) या चित्रपटात खाष्ट सासूची भूमिका करून त्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळा पैलू दाखविला. दोनशेहून अधिक चित्रपटांत त्यांनी नायिकेच्या व चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका केल्या. जर्मन दिग्दर्शक पॉल झील (Paul Zils) यांच्याअवर इंडिया (१९५०) व इस्माईल मर्चंट यांच्या हाऊसहोल्डर या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. तसेच मुगल ए आझम, नरसीभगत, बावर्ची, खिलौना, बॉबी या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या चरित्र भूमिका खूप गाजल्या.
दुर्गाबाईंचा मराठी रंगभूमीशीही निकटचा संबंध होता. बेचाळीसचे आंदोलन, कीचकवध, भाऊबंदकी, शोभेचा पंखा, वैजयंती, खडाष्टक, पतंगाची दोरी, कौंतेय, संशयकल्लोळ इ. नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या; तर वैजयंती, कौंतेय, पतंगाची दोरी, द्रौपदी इ. नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. अखिल भारतीय नाट्यस्पर्धेत भाऊबंदकी हे नाटक सर्व भाषांतील नाटकांत सर्वोत्तम ठरले होते. दुर्गाबाईंनी त्यात आनंदीबाईंची प्रभावी भूमिका केली होती. मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांतून त्यांनी काम केले.
दुर्गाबाईंचा विवाह बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी झालेला होता. या दांपत्यास बकुल व हरीन ही दोन मुले. दुर्गाबाईंच्या पतीचे मुले लहान असतानाच निधन झाले. त्यामुळे त्यांनी एकटीने आर्थिक जबाबदारी सांभाळून त्यांच्या मुलांचे संगोपन केले. त्यांच्या एका हरीन या मुलाचे अकाली निधन झाले. याही धक्क्यातून सावरून त्यांनी पुढे मार्गक्रमण केले. ख्यातकीर्त रंगकर्मी विजया मेहता या त्यांच्या स्नुषा होत.
दुर्गाबाईंची चित्रपटातील व नाट्यसृष्टीतील कामगिरी लक्षात घेऊन संगीत नाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला. दिल्लीमध्ये भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते (१९६१). त्यांना पद्मश्रीचा बहुमानही लाभला आहे. (१९६८). मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक त्यांना देण्यात आले होते (१९७२). अलाहाबाद येथील महाराष्ट्र मित्र मंडळ व साहित्य संमेलन या मान्यवर संस्थांच्या विद्यमाने त्यांचा ३१ जानेवारी १९७० रोजी भव्य सत्कार झाला होता. दुर्गाबाईंच्या अभिनयकलेचा वाङ्मयीन सन्मान करण्याच्या उद्देशाने त्यांना एक गौरवग्रंथ त्यांना अर्पण करण्यात आला; त्याचे प्रकाशन भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. १९५२ साली भारतातर्फे रशियाला भेट दिलेल्या सांस्कृतिक मंडळाच्या त्या एक सदस्या होत्या. १९७४ च्या बिदाई चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना फिल्म फेअर पुरस्कार देण्यात आला. १९८३ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुर्गाबाईंनी १९८० मध्ये दुर्गा खोटे प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे त्यांनी लघुचित्रपट, जाहिरातपट, मालिका आणि चित्रपटांचीही निर्मिती केली. या संस्थेद्वारे निर्मिती केलेली वागळे की दुनिया ही मालिका खूप गाजली. दुर्गाबाईंनी त्यांचे जीवन आणि त्यांचा रूपेरी पडद्यावरचा प्रवास मी दुर्गा खोटे या आत्मचरित्रात शब्दबद्ध केलेला आहे. या आत्मचरित्राचा इंग्रजी भाषेमध्ये I Durga Khote या नावाने अनुवादही झालेला आहे.
वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे अलिबाग येथे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने त्यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकिटाचे अनावरण केले.