भोळे, ज्योत्स्ना केशव : (११ मे १९१४ – १ ऑगस्ट २००१). शास्त्रीय व उपशास्त्रीय गीतप्रकार आणि भावगीत गायिका व मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री. ज्योत्स्नाबाईंचा जन्म गोव्यातील बांदिवडे या गावात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव दुर्गा केळेकर होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडलांचे नाव वामन विष्णू केळेकर होय. या दांपत्याच्या दहा मुलांपैकी ज्योत्स्नाबाई एक. त्यांना लहानपणापासून गाण्याची विशेष आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या गावातच म्हणजे बांदिवड्यात दुसरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या ज्येष्ठ गायिका भगिनी गिरिजाबाई यांच्यासह त्या मुंबईत आल्या. मुंबई येथील लॅमिंग्टन रोडवर त्या राहात. तेथील महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. या शाळेतूनही गाण्याच्या विविध स्पर्धांत भाग घ्यायला त्यांना पाठवीत असत. त्यामुळेही त्यांना प्रोत्साहन मिळाले. पुढे मुंबईत शालेय, आंतरशालेय गायन स्पर्धांमध्ये नेहमीच पहिला नंबर पटकावून त्यांचे नाव झाले. या शाळेत त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले; पण त्यांचा कल गाण्याकडे अधिक होता. त्यामुळे मग पूर्णवेळ गाण्याचेच शिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला बहीण गिरिजाबाई आणि नंतर आग्रा घराण्याचे खादिम हुसेन खाँ यांची तालीम त्यांना सुरू झाली.

ज्योत्स्नाबाईंनी मदतनिधीसाठीच्या एका कार्यक्रमात गाणी गायली. तेथील चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ‘बाँबे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या तत्कालीन खाजगी आकाशवाणी केंद्रावर गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर या आकाशवाणीवर ज्योत्स्नाबाई महिन्यातून पाचसहा वेळा तरी गात असत. त्यामुळे बालगायिका म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. पुढे विविध आकाशवाणी केंद्रांवरून त्यांना गाण्यासाठी आमंत्रणे येत राहिली. आकाशवाणीवरील गायनामुळे वक्तशीरपणा आणि मैफल थोडक्या वेळात कशी रंगवावी हे गुण त्यांच्या अंगी मुरले. लहानपणी त्या नृत्य शिकल्या होत्या आणि दिलरुबा व पेटीचेही वादन करत असत. वयाच्या  १४-१५ व्या वर्षी त्या रागदारी संगीतात पारंगत झाल्या. याच काळात मुंबईमध्ये भावगीत हा गीतप्रकार खूपच प्रचलित होऊ लागला होता. त्यावेळी केशवराव भोळे हे सुप्रसिद्ध भावगीत गायक त्यांनी गायलेल्या नाट्यपदांमुळे विशेष प्रसिद्ध झाले होते. केशवराव ‘एकलव्य’ आणि ‘शुद्धसारंग’ या टोपणनावाने संगीत विषयांवर समीक्षालेखनही करीत होते. ज्योत्स्नाबाईंचे बंधू रामराय हे केशवरावांचे मित्र होते. त्यांच्या विनंतीवरून केशवरावांनी ज्योत्स्नाबाईंना भावगीत शिकविण्यास सुरुवात केली. बशीर खाँ, धम्मन खाँ या उस्तादांकडून ज्योत्स्नाबाईंनी ठुमरी व दादरा याची तालीम घेतली. तानरस घराण्याचे खाँसाहेब इनायत हुसेन यांच्याकडूनही त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले.

वयाच्या अठराव्या वर्षी ज्योत्स्नाबाईंचा विवाह केशवराव भोळे यांच्याशी झाला (२२ जानेवारी १९३२). त्यानंतर काही कालावधीतच त्यांनी ‘कृष्ण सिनेटोन’ या कंपनीच्या संत सखू या चित्रपटात सखूबाईंची भूमिका केली. या चित्रपटाचे संगीतदिग्दर्शन केशवरावांनी केले होते. या चित्रपटात काम करतेवेळी त्यांचे दुर्गा हे नाव बदलून ज्योत्स्ना हे नाव त्यांना देण्यात आले. त्यांच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरुवात येथून झाली. त्यानंतर ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा  या नाटकातील ‘बिंबा’ ही ज्योत्स्नाबाईंची रंगमंचावरील पहिलीच भूमिका खूप गाजली. प्रसिद्ध नॉर्वेजियन नाटककार बर्न्स्टेअर्ने ब्यर्नसॉन (Bjørnstjerne Bjørnson) यांच्या गॉट्लेट (A Gauntlet) या नाटकाचे हे मराठी भाषांतर होय. या नाटकाचे दिग्दर्शन केशवराव दाते यांनी आणि संगीतदिग्दर्शन केशवराव भोळे यांनी केले होते. रंगभूमीवर नाटकाला पार्श्वसंगीत देण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. या नाटकाचा पहिला प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. या नाटकातील ज्योत्स्नाबाईंनी गायलेले ‘एकलेपणाची आग लागली हृदया’ हे गाणे गाजले. त्यानंतर आलेल्या या संस्थेच्या लपंडाव या नाटकात त्यांनी उषेची भूमिका केली. यानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकरांच्या सुवर्णमंदिर या चित्रपटातही काम केले. ‘यंग इंडिया’ या ध्वनिमुद्रिका कंपनीने त्यांनी गायलेल्या ‘पहा गोकुळी रंगल्या गोपबाला’, ‘आणीन भूवरी नंदनवन’, ‘आला खुशीत समिंदर’, ‘दीप मावळला’ इत्यादी गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. ही गाणी त्यावेळी खूप लोकप्रिय झाली.

१९४१ मध्ये ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेची स्थापना लेखक-दिग्दर्शक मो. ग. रांगणेकरांनी केली. या संस्थेचे पहिले नाटक आशीर्वाद मधून ज्योत्स्नाबाईंना सुमित्रेची भूमिका केली. त्यानंतर आलेल्या पुढच्या कुलवधू  या सामाजिक नाटकातील त्यांनी केलेली भानुमतीची भूमिका खूपच गाजली. या नाटकात त्या पंचवीस वर्षे मुख्य नायिकेचे काम करत होत्या. या नाटकातील ‘भाग्यवती मी त्रिभुवनी झाले’, ‘कुबेर माझा धनी’, ‘बोला अमृत बोला’ ही त्यांनी गायलेली गाणी खूप गाजली. या गाण्यांना मास्तर कृष्णराव यांनी संगीत दिले होते. एक होता म्हातारा (१९४८) या नाटकामध्ये त्यांनी उमा ही व्यक्तिरेखा साकारली होती. ज्या मुलावर उमाचे प्रेम असते, त्याच्या वडलांशीच तिचे लग्न लावून देण्यात येते आणि प्रियकरच तिचा मुलगा म्हणून समोर उभा राहतो. ही भूमिका अतिशय कौशल्याने त्यांनी साकारली. याशिवाय त्यांची गाजलेली काही प्रमुख नाटके व त्यामधील भूमिका पुढीलप्रमाणे – राधाबाई (राधा), भूमिकन्या सीता (सीता), कोणे एके काळी (कल्याणी), अलंकार (वत्सला), आराधना (देवकी), धाकटी आई (वीणा), भाग्योदय (भानुमती), रंभा (सुगंधा), विद्याहरण (देवयानी) ही नाटके व भूमिका विशेष गाजल्या.

ज्योत्स्नाबाईंनी गोरखकल्याण, भीम, मधमादसारंग, शुद्धभटियार, जलधरकेदार असे अनेक राग गायले आणि त्यांनी गायलेले हे राग लोकप्रिय झाले. भेंडीबाजार घराण्याचे मोहम्मद हुसेन खाँ यांनी तयार केलेला ‘शिवकंस’ हा राग ज्योत्स्नाबाईंनी आपल्या शैलीने गाऊन लोकप्रिय केला. त्यांनी अनेक नाट्यपदे, भावगीते तसेच विविध शास्त्रीय व उपशास्त्रीय गीतप्रकार गायले. एक होता म्हातारा  या नाटकामधील ‘छंद तुझा मजला’, ‘ये झनी ये रे माघारी’; राधाबाई  या नाटकामधील ‘खेळेल का देव माझिया अंगणी’; भूमिकन्या सीता  या नाटकामधील ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन’, ‘मानसी राजहंस पोहतो’; कोणी एके काळी या नाटकातील ‘का रे ऐसी माया’ ही भैरवी आणि याबरोबरच ‘सुखद ह्या सौख्याहूनि वनवास’, ‘झाली पहाट दिले उडवोनी डोळे’, ‘माझिया माहेरा जा’, मन तळमळशी, लावली थंड उटी वाल्याची ही त्यांनी गायलेली गीते खूप गाजली.

ज्योत्स्नाबाईंच्या निसर्गदत्त आवाजात गोडवा आणि कारुण्याची छटा आहे. त्यांच्या आवाजात असलेला उपजत दर्द त्यांच्या गायनाला एका उंचीवर नेऊन ठेवतो. काणेकर, काळे, अनिल, माधव ज्यूलियन, बोरकर, संजीवनी मराठे, पाडगांवकर, माडगूळकर इत्यादी नामवंत कवींची भावगीते त्यांनी गायली. भावगीत हा संगीतप्रकार लोकप्रिय करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यांनी आराधना हे नाटक लिहिले. या नाटकाची पद्यरचना, संगीतदिग्दर्शन व दिग्दर्शन त्यांनीच केले होते. याशिवाय अडला हरि ही विनोदी श्रुतिका, घराण्याचा पीळ ही संगीतप्रधान नाटिका त्यांनी आकाशवाणीकरिता लिहिली.

इंडिया पीस कौन्सिलतर्फे भारतातील प्रमुख कलावंत चीनमध्ये गेलेले होते (१९५३). त्यांनी तेथील चौदा प्रमुख शहरांत कार्यक्रम केले. या कलावंतांमध्ये ज्योत्स्नाबाईंचा समावेश होता. ज्योत्स्नाबाईंनी नेपाळ, चीन, कोरिया, लंडन येथे भारतीय शिष्टमंडळासोबत दौरा केला. त्यानंतर त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीमध्येही गायनाचे कार्यक्रम केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापना दिनादिवशी (१ मे १९६०) उपस्थित जनसमुदायासमोर ज्योत्स्नाबाईंना ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा…’ हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलेले व शंकरराव व्यास यांनी संगीत दिलेले ‘महाराष्ट्र गीत’ गाण्याचा बहुमान मिळाला.

ज्योत्स्नाबाईंना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचा बालगंधर्व पुरस्कार (१९६९), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९७६), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९७७), विष्णुदास भावे पुरस्कार (१९८०), गोमंतक मराठी अकादमी, गोवा यांचा लता मंगेशकर पुरस्कार (१९९५), महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार (१९९९) यांचा समावेश आहे. १९८१ मध्ये सेऊल, कोरिया येथील ‘जागतिक नाट्य परिषदेमध्ये’ महाराष्ट्र नाट्य संघाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. तसेच गोव्यातील ६४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या (१९८४).

ज्योत्स्नाबाईंनी अनेकविध लेखनही केले. त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या तुमची ज्योत्स्ना भोळे (१९९८) या पुस्तकात आत्मगान, जिव्हाळा आणि तुम्ही दिले ते या तीन विभागात त्यांचे कारकीर्दीतील अनुभव,  रसिकांची आणि त्यांची पत्रोत्तरे यांचा समावेश आहे. त्यांचे स्वरवंदना हे पुस्तक शैलजा राजे यांनी संपादित केलेले असून यामध्ये ज्योत्स्नाबाईंचे सुरुवातीपासूनचे आयुष्य, त्यांच्या सांसारिक व व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना यांचा ऊहापोह आहे. तर त्यांचे अंतरीच्या खुणा हे पत्ररूपी पुस्तक आहे.

ज्योत्स्ना आणि केशवराव भोळे यांना किशोर, अनिल, सुहास व वंदना ही चार मुले. पैकी वंदनाताईंनी त्यांच्या आईवडिलांचा गाण्याचा वारसा पुढे चालविला आहे.

ज्योत्स्नाबाईंचे वयाच्या ८६ व्या वर्षी कर्करोगाने पुणे येथे निधन झाले. ११ मे २०१३ रोजी दीनानाथ कला मंदिर, पणजी, गोवा येथे ज्योत्स्ना भोळे यांचा जन्मशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील सृजन फाउंडेशन ही संस्था २००९ पासून ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करते.

संदर्भ : 

  • भोळे, ज्योत्स्ना, तुमची ज्योत्स्ना भोळे, पुणे, १९९८.

समीक्षक : सुधीर पोटे