स्ट्रीप, मेरी लुईस : (२२ जून १९४९). अमेरिकन चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारासाठी २१ वेळा आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी ३३ वेळा आणि सर्वांत जास्त नामांकने मिळवणारी एकमेव अभिनेत्री.

चित्रकार-कला संपादक मेरी विल्किन्सन आणि हॅरी विल्यम स्ट्रीप यांच्या मेरी लुईस या ज्येष्ठ कन्या. चित्रपटसृष्टीत त्या मेरिल स्ट्रीप या नावाने विख्यात आहेत. त्यांनी शालेय शिक्षण घेत असताना गायिका, संगीतकार आणि आवाज जोपासना प्रशिक्षक (व्हॉइस कोच) एस्तेल लीब्लिंग यांच्याकडे चार वर्षे संगीतिका (ऑपेरा) गायनाचे शिक्षण घेतले. मेरिल यांनी न्यूयॉर्कच्या वॅसर कॉलेज या खास मुलींसाठी असलेल्या संस्थेतून नाटक आणि ड्रेस डिझायनिंग या विषयांतून पदवी घेतली (१९७१). पुढे येल युनिव्हर्सिटी ऑफ ड्रामामधून अभिनयातील ‘मास्टर ऑफ फाइन आर्ट्स’ (१९७५) ही पदवी संपादन केली.

मेरिल यांनी व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द सुरू करण्यासाठी आपले शिक्षण पूर्ण होताच न्यूयॉर्क शहर गाठले. ट्रेलोनी ऑफ द वेल्स  हे त्यांचे ब्रॉडवेवरचे पहिले नाटक. न्यूयॉर्कमधील पहिल्या वर्षात त्या हेन्री द फिफ्थ, द टेमिंग ऑफ द श्रू, मेजर फॉर मेजर या नाटकांमधून चमकल्या. काही वर्षे त्यांनी टेनेसी विल्यमच्या ट्वेन्टी सेवन वॅगन्स फुल ऑफ कॉटन, आर्थर मिलरच्या मेमरी ऑफ टू मंडेज, तसेच सिक्रेट सर्व्हिस, चेकॉव्हच्या द चेरी ट्री आणि ब्रेख्तच्या हॅपी एन्ड यांसारख्या काही ब्रॉडवे आणि ब्रॉडवे बाह्य नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. दरम्यान मेरिल यांनी दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. ज्यूलिया (१९७७) या चित्रपटातील एक लहान भूमिकेद्वारा त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. द चेरी ऑर्चर्ड या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून अभिनेते रॉबर्ट डी निरो यांनी द डियर हंटर (१९७८) या चित्रपटात मेरिलना संधी दिली. या चित्रपटातील त्यांची भूमिका लहान असली तरी त्यांच्या अभिनयातली सहजता आणि ताजेपणा दर्शक-समीक्षकांच्या नजरेस भावला आणि त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीसाठी ऑस्करचे नामांकन मिळाले. क्रेमर वर्सेस क्रेमर (१९७९) या चित्रपटात त्यांनी विवाहबंधनात घुसमटणाऱ्या आणि स्वत्व शोधणाऱ्या जोआनाची स्वतःची कारकीर्द घडवण्याची धडपड, घटस्फोट आणि लहानगा मुलगा यांच्यामध्ये होणारी घालमेल सहजतेने दर्शवली. या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचे पहिले ऑस्कर तसेच गोल्डन ग्लोब आणि इतर पुरस्कार मिळाले. रंगमंचावर साकारलेल्या ऍलिस इन् द पॅलेस (१९८१) मधील मुख्य भूमिकेसाठी त्या ऑबी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. येथून पुढे या अभिनेत्रीच्या यशाची कमान चढती राहिली आणि त्यांच्या अभिनयाचा कस लावणाऱ्या भूमिका त्यांनी साकारल्या.

द फ्रेंच लेफ्टनंट्स वुमन (१९८१) या चित्रपटामधील सारा ही व्हिक्टोरियन स्त्री आणि ॲना ही साराची भूमिका करणारी ऐंशीच्या दशकातली अभिनेत्री अशा दोन अतिशय भिन्न भूमिका मेरिल यांनी पूर्णत्वाने निभावल्या. तर सोफीज चॉईस (१९८२) या चित्रपटासाठी नाझी छळछावणीमधून बचावलेल्या पोलिश स्थलांतरित स्त्रीच्या भूमिकेसाठी त्यांनी पोलिश आणि जर्मन भाषांचे प्रशिक्षण घेतले, त्यांच्या उच्चारातील सहजतेमुळे त्यांच्या अभिनयात जिवंतपणा आला. या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी स्टिल ऑफ द नाईट (१९८२), सिल्कवुड (१९८३), फॉलिंग इन् लव्ह (१९८४), प्लेन्टी (१९८५), आऊट ऑफ आफ्रिका (१९८५), हार्टबर्न (१९८८), आयर्नवीड (१९८८), अ क्राय इन् द डार्क (१९८८) इत्यादी चित्रपटांमधील एकाहून एक सरस गंभीर भूमिका साकार करून ८०च्या दशकावर आपली मोहोर उमटवली. सिडनी पोलॉक दिग्दर्शित आऊट ऑफ आफ्रिका या चित्रपटात त्यांनी केनियामधील दुर्गम प्रदेशातील कॉफीमळ्याच्या बॅरोनेस कॅरन या श्रीमंत मालकिणीची भूमिका केली. शेतीच्या प्रगतीसाठी, पर्यायाने स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या तिथल्या आदिम जनजातींमधील लोकांविषयी संवेदनशील असणाऱ्या या यूरोपियन मालकिणीच्या भूमिकेने मेरिल यांना प्रसिद्ध अभिनेत्रीचे जे वलय प्राप्त करून दिले, ते आजतागायत कायम आहे.

नव्वदच्या दशकात आपली गंभीर प्रतिमा जाणीवपूर्वक बदलून टाकत मेरिल यांनी पोस्टकार्ड्स फ्रॉम द एज (१९९०), डिफेंडिंग युअर लाइफ (१९९१), डेथ बिकम्स हर (१९९२) अशा विनोदी, काहीशा प्रणयरम्य चित्रपटांतील तशाच प्रकारच्या भूमिकाही साकारल्या. द रिव्हर वाइल्ड (१९९४) या साहसी चित्रपटामध्ये स्वतःच्या आणि दोन मुलांच्या रक्षणासाठी निसर्गाशी झगडणाऱ्या, गुंडांशी दोन हात करताना जीव पणाला लावणाऱ्या धाडसी आईची हृदयस्पर्शी भूमिका त्यांनी केली. ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी (१९९५) यात साध्यासुध्या, मध्यमवयीन नायिकेच्या तरल प्रेमकहाणीतून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोहित करत चित्रपटाला यश मिळवून दिले. २००० सालानंतर मेरिल यांनी पुन्हा एक नवा पायंडा पाडलेला दिसतो. दीर्घकाळ चित्रपटसृष्टीत रमल्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर त्यांनी द  सीगल (२००२) या नाटकाद्वारे ब्रॉडवेवर पुनरागमन केले आणि त्याच वर्षी त्यांचे ऍडॉप्शन आणि द हॉर्स हे चित्रपटही आले. या आणि द डेव्हिल वेअर्स प्रादा (२००६) या चित्रपटांमधील भूमिकांमधून त्यांनी अभिनयाची नवी क्षितिजे गाठली. द डेव्हिल वेअर्स प्रादा या चित्रपटातील त्यांची सर्वांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवणारी, अतिशय उद्दाम फॅशन एडिटर ‘मिरांडा’ ही खलवृत्तीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. एंजल्स इन् अमेरिका ही एचबीओ मालिका तसेच फ्रीडम : अ हिस्ट्री ऑफ यूएस (२००३) या माहितीपटात त्यांनी भूमिका बजावली. सारा जोन्स या अमेरिकन अभिनेत्रीच्या ब्रिज अँड टनल (२००४) या एकपात्री ब्रॉडवे नाट्यासाठी मेरिल यांनी निर्माती म्हणून जबाबदारी निभावली.

मामा मिया (२००८) या संगीतपटात पूर्वी मैत्रिणींसोबत बँडमध्ये गाणारी, पुढे एका ग्रीक बेटावर मोठ्या हिंमतीने उपाहारगृह चालवून मुलीला मोठे करणाऱ्या एकल आईची भूमिका मेरिल यांनी उत्स्फूर्तपणे निभावली. त्यासाठी त्यांनी पार्श्वगायन व नृत्य केले. हा त्यांचा तिकीटबारीवरील सर्वांत यशस्वी चित्रपट होय. ज्यूली अँड ज्यूलिया (२००८) या चित्रपटामध्ये ६० च्या दशकात फ्रेंच पाककौशल्यासाठी नावाजलेली शेफ आणि लेखिका ज्यूलिया चाइल्ड, इट्स कॉम्प्लिकेटेड (२००९) यामधील दोन प्रेमिकांमध्ये अडकलेली नायिका या व्यक्तिरेखांतून मेरिलच्या सर्जनशीलतेची विविध रूपे उलगडत गेली.

कर्तृत्वशाली माजी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यावर आधारित द आयर्न लेडी (२०११) या भूमिकेसाठी मेरिल स्ट्रीप यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा तिसरा ऑस्कर आणि आठवा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. मार्गारेट थॅचर यांचा पंतप्रधान बनण्याआधीचा वागण्याचा-बोलण्याचा लहेजा, वेग, उच्चार आणि पंतप्रधान झाल्यानंतर वागण्या-बोलण्यातील बदल मेरिल यांनी या चित्रपटात फार सुंदर रीत्या व्यक्त केले आहेत. होप स्प्रिंग्स (२०१२) मधील उतारवयातील प्रणयी नायिका, इन् टू द वूड्समधील जादूगारीण किंवा रिकी अँड फ्लॅश (२०१५) मधील अपयशी रॉक गायिका, सफ्राजेत (२०१५) मधील ‘राइट टू व्होट’ चळवळीतील ब्रिटीश राजकीय कार्यकर्ती एमेलीन पॅनखर्स्ट अशी तुलनेने छोटी भूमिका आणि द पोस्टमधील पहिली अमेरिकन वृत्तपत्र प्रकाशक कॅथरीन ग्रॅहॅमच्या दमदार भूमिकांमधून मेरिल प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राहिल्या. लॉन्ड्रोमॅट आणि लिटिल वुमन हे त्यांचे चित्रपट (२०१९) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले. बहुचर्चित बिग लिटल लाईज (२०१९) या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमधील प्रमुख भूमिकेद्वारा मेरिल यांनी दूरचित्रवाणीवर पुनरागमन केले आहे.

अनेक चित्रपटांना, माहितीपट, मालिकांना मेरिल यांनी आवाज दिला आहे. बऱ्याच दूरदर्शन मालिका, अनुबोधपट, चित्रपट आणि नोबेल पुरस्काराचे कार्यक्रम यांसाठी त्यांनी निवेदक म्हणून कामगिरी बजावली आहे.

मेजर फॉर मेजर या नाटकादरम्यान मेरिल यांची अभिनेते जॉन कॅझल यांच्याशी मैत्री झाली आणि ते लग्नबंधनात अडकले. कॅझल हे एक गुणी अभिनेते होते. गॉडफादर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात (१९७४) त्यांनी साकार केलेली डॉन कॉर्लिऑनच्या मधल्या मुलाची, फ्रीडो कॉर्लिऑनची भूमिका अतिशय गाजली. १९७८ साली जॉन कॅझल यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. यानंतर स्ट्रीप यांनी डॉन गमर या शिल्पकाराशी विवाह केला. त्यांच्या मुलांपैकी हेन्री हा मुलगा संगीतकार, मेरी विला आणि ग्रेस या मुली अभिनेत्री आणि लहानगी लुईसा मॉडेल आहे.

तीन ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या पाच अभिनेत्यांमध्ये मेरिल यांच्या नावाचा समावेश आहे. ३३ नामांकनांपैकी ९ गोल्डन ग्लोब पुरस्कार त्यांनी जिंकले आहेत. देशोदेशींचे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. फ्रान्स सरकारच्या ‘कमांडर इन् द ऑर्डर ऑफ आर्टस् अँड लेटर्स’ ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने (२००२) त्यांचा गौरव करण्यात आला. २०१० मध्ये त्या अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस् अँड लेटर्सच्या सन्माननीय सभासद म्हणून निवडल्या गेल्या. २०१७ मध्ये या प्रतिभाशाली अभिनेत्रीला ‘गोल्डन ग्लोब लाईफटाइम अचिव्हमेंट – सेसिल बी डी मिल’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. डार्टमथ कॉलेज (१९८१), येल (१९८३), प्रिन्स्टन (२००९) आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी (२०१०) अशा जागतिक स्तरावरील शिक्षणसंस्थांनी मेरिल यांना ‘ऑनररी डॉक्टर ऑफ आर्ट्स’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्या होलोकॉस्ट (१९७८) या दूरचित्रवाणी मालिकेमधील ‘इंगा’ या भूमिकेसाठी त्यांना एमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मेरिल नॅशनल वूमेन्स हिस्टरी म्युझिअमच्या (National Women’s History Museum) प्रवक्त्या आहेत. अनेक चळवळींना साहाय्य करणाऱ्या मेरिल यांनी स्त्री-सशक्तीकरणासाठी सातत्याने योगदान दिले आहे. आपण ‘फेमिनिस्ट’ ऐवजी ‘ह्यूमनिस्ट’ आहोत अशी भूमिका घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या चतुरस्त्र अभिनेत्री नाटक, संगीतिका, चित्रपट, दूरदर्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा दीर्घकाळ उमटवत राहिल्या आहेत. वय, भाषा, देश, संस्कृती, भूगोलाच्या मर्यादा ओलांडून व्यक्तिरेखेत समरस होणारी समर्थ अभिनेत्री म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली आहे.

                                                                   समीक्षक : यशोधरा काटकर