पक्षविरहित लोकशाही : भारतात मानवेंद्रनाथ रॉय आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाही ही संकल्पना मांडली. लोकशाहीच्या विशेषतः प्रातिनिधिक लोकशाहीच्या यशाच्या आड राजकीय पक्ष येतात. पक्षामुळे लोकशाही ही पक्षीय राजवटीचे स्वरूप धारण करते तसेच पक्षीय हुकूमशाही बनते. या कारणासाठी म्हणून पक्षविरहित लोकशाही असली पाहिजे असा विचार मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडला. त्यांनी संघटित लोकशाहीचा पुरस्कार केला. पक्षपद्धतीमुळे काही थोड्या व्यक्तींच्या हाती सर्व राजकीय सत्ता एकवटते. प्रतिनिधीवरही पक्षाचे नियंत्रण येते. उमेदवार हे जनतेचे उमेदवार न राहता फक्त राजकीय पक्षाचे प्रवक्ते बनतात. निवडणुकीत जनतेपुढे चांगले आणि पुरेशे पर्याय न राहता फक्त राजकीय पक्ष जे पर्याय देतील त्यातूनच निवड करावी लागते . विवेकापेक्षा भावनेला आणि पक्षाला महत्त्व प्राप्त होते. नैतिकतेला स्थान राहत नाही. इत्यादी दोष मानवेंद्रनाथ रॉय यांनी दाखविले आहेत. पक्षाच्या ऐवजी सत्ता हे साध्य न मानणाऱ्या चळवळी आणि लोकसमित्या यांच्यावर मानवेंद्रनाथ रॉय यांनी भर दिला. जयप्रकाश नारायण यांनीही पक्षावरील ही टीका बव्हंशी मान्य केली आहे. त्यांनी पक्षविरहित राजकारणाचे ध्येयच आदर्श मानले. पक्षविरहीत लोकशाहीच्या व्यवहार्यतेबद्दल शंका असून राजकीय पक्ष नसल्याने वरील सर्व दोष नाहीसे होतील काय या विषयीही शंका व्यक्त केली जाते.

संदर्भ :

  • व्होरा, राजेंद्र ; पळशीकर, सुहास, राज्यशास्त्र कोश, दास्ताने प्रकाशन, पुणे.