शेंगदाण्यांसाठी वाढविले जाणारे क्षुप. भुईमूग ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲरॅचिस हायपोजिया आहे. ती मूळची दक्षिण अमेरिकेतील असून सु. २००० वर्षांपूर्वीपासून तिची लागवड करीत असल्याचा उल्लेख आहे. सोळाव्या शतकात दक्षिण अमेरिकेत गेलेल्या पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांनी जगात सर्वत्र भुईमुगाचा प्रसार केला. मात्र, एकोणिसावे शतक संपेपर्यंत व्यापारी स्तरावर तिची लागवड होत नव्हती. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या अमेरिकन वैज्ञानिकाने भुईमुगाचा अभ्यास केला आणि तिचे सु.३०० उपयोग असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर १९३० सालापासून तिची लागवड व्यापारी स्तरावर जगात सर्वत्र होऊ लागली. भुईमूग हे खाद्यतेलाचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक समजले जाते.

भुईमूग ही वर्षायू वनस्पती असून ती गुच्छाने उभी वाढते किंवा जमिनीवर पसरते. ती सु. ७५ सेंमी.पर्यंत उंच वाढते आणि ९०–१२० सेंमी. पसरते. पाने संयुक्त व एकाआड एक असून पर्णिका पिसांसारख्या असतात. पानांमध्ये पर्णिकांच्या दोन जोड्या असून अंत्यपर्णिका नसते. फुलोरा पानांच्या बगलेत येतो. फुले लहान, पिवळी व पतंगाच्या आकारासारखी असून ती एकेकटी किंवा तीनच्या झुबक्यात येतात. फुलांत पुंकेसरांचा संच असतो. परागणानंतर अंडाशयाच्या तळाशी असलेला देठ म्हणजे जायांगधर लांब वाढतो व तो अंडाशयाला हळूहळू जमिनीत पुढे ढकलतो. अंडाशय जमिनीच्या दिशेने वाढते व जमिनीत शिरल्यावर त्याचे रूपांतर भुईमुगाच्या शेंगेत होते. शेंग फुगीर, लांबट, जाड टरफलाची आणि वाळल्यावर न तडकणारी असते. बहुधा एका शेंगेत दोन-चार बिया म्हणजे शेंगदाणे असतात. परंतु काही शेंगांमध्ये एक किंवा पाच शेंगदाणे असू शकतात. शेंगदाण्याचे बाह्यावरण गुलाबी, लाल किंवा पांढरे असते.
शेंगदाणे प्रथिनांचा उत्तम स्रोत असून १०० ग्रॅ. दाण्यांमध्ये ४% जलांश, २५% प्रथिने, ४८% मेद, २१% कर्बोदके, ३% तंतू आणि पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम इ. खनिजे असतात. तसेच ई जीवनसत्त्व आणि थायमीन, रिबोफ्लाविन, फॉलिक आम्ल व निकोटिनिक आम्ल ही ब-समूह जीवनसत्त्वे असतात. इतर कोणत्याही कवचफळांपेक्षा जास्त प्रथिने शेंगदाण्यामध्ये असतात. मात्र शेंगदाण्यात सोडियम आणि पारमेद (ट्रान्सफॅट) नसतात.
शेंगदाणे जगात सर्वत्र खाल्ले जातात आणि ते कच्चे, भाजून किंवा उकडून खातात. शेंगदाण्याचे लहानलहान तुकडे चिक्की, आइसक्रीम व बिस्किटे यांत मिसळतात. मुख्यत: शेंगदाण्यापासून मिळणाऱ्या खाद्यतेलासाठी भुईमुगाची लागवड केली जाते. दैनंदिन आहारातील वेगवेगळे खाद्यपदार्थ शेंगदाण्याच्या तेलात शिजविले जातात. या तेलात असे घटक असतात की, ज्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. वनस्पती तूप व मार्गारीन तयार करण्यासाठी शेंगदाणा तेल वापरतात. पीनट बटर नावाचा पदार्थ शेंगदाण्यापासून तयार करतात. हलक्या प्रतीच्या शेंगदाणा तेलापासून साबण तयार करतात. वेगवेगळी सौंदर्यप्रसाधने, दाढीचा साबण, कोल्ड क्रीम इत्यादींच्या निर्मितीसाठी तसेच चामड्याला लावण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. लिंबाचा रस, शेंगदाणा तेल व मध यांचे मिश्रण दम्यावर गुणकारी असते. प्लायवुडचे थर चिकटविण्यासाठी पेंडीतील प्रथिनांपासून तयार केलेला गोंद वापरतात. भुईमुगाचा पाला व पेंड जनावरांना खाऊ घालतात. ही पेंड पौष्टिक असते. टरफलांचा वापर जळणासाठी व भातशेतीत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी करतात. मात्र ती लवकर कुजत नसल्यामुळे खत म्हणून वापरत नाहीत. भुईमुगाचे सर्वाधिक उत्पादन (सु. ९०%) मुख्यत: आफ्रिका आणि आशिया खंडांत घेतले जाते. चीन, भारत, नायजेरिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इंडोनेशिया आणि म्यानमार हे देश भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.