पिवळी कण्हेर ही सदाहरित वनस्पती ॲपोसायनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव थेवेशिया पेरुवियाना किंवा थेवेशिया नेरीफोलिया  आहे. ती मूळची मेक्सिको, मध्य अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथील आहे. भारतात ती रस्त्यांच्या कडेला, रस्ता दुभागण्यासाठी आणि शोभेची वनस्पती म्हणून बागांमध्ये मुद्दाम लावलेली आढळते. ‘बिट्टी’ या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे.

पिवळी कण्हेर २-३ मी. उंच वाढते. तिची पाने ७·५–१२·५ सेंमी. लांब, रेषाकार, गर्द हिरवी, वरच्या बाजूने चकचकीत आणि टोकाला निमुळती होत गेलेली असतात. ती केशहीन असून त्यांपासून दुधाळ विषारी चीक निघतो. फुले फांद्यांच्या टोकांना वल्लरीत येतात. फुले पिवळी व ५ सेंमी. व्यासाची असून ती घंटेसारखी दिसतात. फुलांचा देठ एखाद्या नलिकेसारखा असतो. फळ साधारण चौकोनी, लंबगोल व चपटे असून त्यात २–४ त्रिकोणी बिया असतात.

पिवळ्या कण्हेरीची साल कडू असून रेचक असते. या वनस्पतीत थिवेटीन हे विषारी ग्लुकोसाइड असते. बकऱ्या व गुरे ही झाडे खात नाहीत. म्हणून अनेक बागांभोवती पिवळी कण्हेर लावतात. बियांपासून पिवळ्या रंगाचे तेल मिळते. ते फार धूर न करता जळते.

कण्हेर : नेरियम ओलिअँडर या शास्त्रीय नावाने परिचित असलेली वनस्पती पिवळ्या कण्हेरीला जवळची आहे. ही वनस्पतीदेखील ॲपोसायनेसी कुलातील आहे. झुडूप किंवा लहान वृक्ष ह्या स्वरूपातील कण्हेर २–६ मी. उंच व सरळ वाढते. पूर्ण वाढल्यावर मात्र खोड झुकते. पाने तीनच्या गुच्छात येत असून ती चामड्यासारखी जाड, गडद हिरवी आणि भाल्यासारखी असतात. फुले प्रत्येक फांदीच्या टोकाला झुबक्यात येतात. फुलांचा रंग पांढरा, गुलाबी किंवा लाल असतो. फळ लांब व संपुटिकेप्रमाणे असून ते पिकल्यावर फुटून त्यातून बिया बाहेर पडतात. या काटक वनस्पतीचा उपयोग बागांमध्ये वा रस्ता दुभाजकावर लावण्यासाठी होतो. पिवळ्या कण्हेरीप्रमाणे ही कण्हेरदेखील विषारी आहे. कण्हेरीमध्ये असलेली ओलिअँड्रिन व ओलिअँड्रिजेनीन ही ग्लायकोसाइडे सूक्ष्म प्रमाणात हृदय उपचारावर वापरतात. कण्हेरीचा भाग चुकून पोटात गेल्यास सक्रियित कार्बनाच्या गोळ्या अथवा चूर्ण दिल्यास विषाचा परिणाम कमी होतो.

पिवळी कण्हेर (थेवेशिया नेरीफोलिया ): पाने, फुले आणि

फळे असलेली वनस्पती

प्रतिक्रिया व्यक्त करा