ज्वालामुखी खडक प्रकारातील लाव्हा थरांनी बनलेला बेसाल्ट खालोखाल विपुल आढळणारा खडक. प्लॅजिओक्लेज खनिज याचा मुख्य घटक असून हॉर्नब्लेंड व कृष्णाभ्रकसुद्धा यात असते. या तिन्ही खनिजांचे बृहत्स्फट (मोठे स्फटिक) आणि घट्ट विणीचा (वयनाचा) आधारक मिळून हा खडक बनलेला असतो. मुख्यतः प्लॅजिओक्लेजचे सूक्ष्म स्फटिक व काच मिळून आधारक बनलेला असतो. त्यामुळे हे खडक पृषयुक्त संरचना दर्शवितात. प्लॅजिओक्लेज हे सामान्यत: अँडेसिन व क्वचित अल्पसिकत ऑलिगोक्लेज प्रकारातील असते. यामध्ये ऑजाइट व हायपर्स्थीन क्वचित असते. काही वेळा प्लॅजिओक्लेजचे बृहत्स्फट मंडलन (Zoning) दर्शवितात.

डायोराइट हा पातालिक खडक अँडेसाइटच्या समतुल्य आहे. परंतु अँडेसाइटमधे डायोराइटपेक्षा हायपर्स्थीन व एन्स्टेटाइट ही लोहमॅग्नेशियन (फेरोमॅग्नेशियन) खनिजे विपुल असतात. संपूर्णत: काच असलेला (ग्लासी) हायपर्स्थीन अभावानेच आढळतो. कालांतराने यातील काचेवर विकाचन प्रक्रिया होऊन क्रीस्टलाइट्स व ग्लोब्युलाइट्समध्ये रूपांतर होते. अँडेसाइटमध्ये मुक्त सिलिका आढळल्यास याचे रूपांतर डेसाइट या खडकात होते.

अँडेसाइटचे लाव्हा थर भूखंडावरील खडकांशी संलग्नीत असतात. हे थर सागरीय बेसाल्ट थरांची सीमारेषा दर्शवितात. दोन्हीही खडक काळ्या रंगाचे असून अँडेसाइट फिक्कट रंगाचे; तर बेसाल्ट गडद रंगाचे असतात. काही काचयुक्त खडक उदा., पिचस्टोन अँडेसाइटसारख्या घटकाशी साधर्म्य दर्शवितात. काही ठिकाणी हे गुरूस्फटी रूपातही आढळतात. वली पर्वताशी संलग्न असणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून हा खडक बनतो. अँडिज पर्वताच्या दक्षिण भागातील खडकात आढळल्यावरून अँडेसाइट हे नाव दिले गेले. परंतु या पर्वत रांगांतील इतर प्रकारातील विपुल खडकांमुळे या ठिकाणी अँडेसाइट दुर्लक्षितच राहिले.

स्कॉटलंड येथील ‘ओल्ड रेड सॅंडस्टोन’ मधील ओचिली हिल्स, चेव्हीऑट्स हिल्स येथे अँडेसाइट मोठ्या प्रमाणावर विस्तारीत आहे. याशिवाय अल्पाइन-हिमालय पर्वतांच्या साखळीत हंगेरी, जपान, फिलिपीन्स, इंडोनेशिया, कॅरेबियन, न्यूझीलंड इ. ठिकाणी अँडेसाइट आढळतो. भारतात बिहार राज्यातील राजमहाल ट्रॅपबरोबरच पूर्व घाटात अनेक ठिकाणी विंध्य पर्वतरांगेमध्ये चित्तोडगढच्या दक्षिणेस खैरमाला येथे अँडेसाइट आढळतो. गुजरात येथील पावागडमध्ये डेक्कन ट्रॅपच्या प्रभाजन प्रक्रियेमुळे अँडेसाइट तयार झालेला पाहावयास मिळतो. इतर अग्निज खडकांप्रमाणेच बांधकाम क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात.

संदर्भ : संकेतस्थळ : Geological Survey of India – www.gsi.gov.in

समीक्षक :  पी. एस. कुलकर्णी