अग्निज कुळ वर्गीकरणाच्या तालिकेतील पातालिक (Plutonic), अल्पसिलिक (Basic), भरडकणी (Coarse grained) या गट प्रकारातील गॅब्रो हा महत्त्वाचा प्रातिनिधिक अग्निज खडक. हा खडक ग्रॅनाइटइतका विपुल नाही, परंतु मध्य महासागर कटकांच्या परिसरात (Mid oceanic ridge regions) प्रामुख्याने याच खडकांचे बेसाल्टसह समुद्री भूकवच (Oceanic crust) आढळते. हा खडक मॅग्नेशियम आणि लोहाने संपन्न असलेल्या (मॅग्मा) शिलारसापासून खोल भूगर्भात, अतिसावकाशरित्या थंड होत असल्याने पूर्ण स्फटिकी (Holocrystalline) मॅफिक खनिजांसह घनीभूत होतो. गॅब्रो हा बहुधा गडद काळसर किंवा करड्या हिरवट रंगात आणि विविध अंतर्वेशी रूपातच (Intrusive forms) भूपृष्ठाखाली आढळतो.

फेल्स्पार खनिज गटातील प्लॅजिओक्लेज व एकनताक्ष पायरोक्सीन गटातील ऑजाइट ही गॅब्रोमधील आवश्यक खनिजे आहेत. प्लॅजिओक्लेज प्रकारामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असणारे लॅब्रॅडोराइट – ॲनॉर्थाइट यात आढळतात. याचबरोबर ॲपेटाइट, मॅग्नेटाइट, कृष्णाभ्रक (Biotite), हॉर्नब्लेंड, इल्मेनाइट, क्रोमाइट किंवा स्पिनेल ही गौण खनिजे (Minor minerals) असतात. यामध्ये सिलिकाचे प्रमाण ४५ – ५५ टक्के असून कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची ऑक्सॉइड बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतात. यांचे रासायनिक संघटन बेसाल्ट किंवा डोलेराइटप्रमाणे असते. कारण गॅब्रोचाच शिलारस भूपृष्ठावर येऊन थंड झाल्यास बेसाल्टचे थर तयार होतात. गॅब्रोचे वयन (पोत) ग्रॅनाइटप्रमाणे समकणी असते. कधीकधी समावृत्त वयनसुद्धा दर्शविते.

सूक्ष्मदर्शकीय अवलोकनात एका खनिजाचे लहान स्फटिक दुसऱ्या मोठ्या स्फटिकात अनियमितपणे विखुरलेले दिसतात. जर पात्यासारखे प्लॅजिओक्लेज स्फटिक सापेक्षत: मोठ्या पायरोक्सीन स्फटिकात पूर्णपणे सामावलेले असले तर त्यांना सर्पचित्र म्हणतात. कडांना समांतर किवा गुरुत्वाकर्षणीय पट्टही गॅब्रोत आढळतात. याशिवाय कधीकधी यांच्या विक्रियेने निर्माण होणाऱ्या धारा, गोलीय रचना, मंडलिका रचना अशा सूक्ष्मदर्शीय संरचना आढळतात. सामान्यपणे गॅब्रोमध्ये प्लॅजिओक्लेज व पायरोक्सीन खनिजांचे प्रमाण जवळजवळ सारखे असते.

निर्मितीप्रक्रियेच्या काळातील भौतिक परिस्थिती आणि रासायनिक संघटन संरचनेच्या आधारे तयार झालेल्या खनिजांच्या धारणेनुसार गॅब्रोचे विविध प्रकार वर्गीकृत केलेले आहेत. (पाहा : तक्ता)

वातावरणीय क्रियांमुळे खनिजांमधील बदलांमुळे ऑजाइट (Pyroxene – Augite) चे रूपांतर हॉर्नब्लेंडमध्ये (Amphibole – Hornblende) होऊन गॅब्रोपासून मध्यसिलिक गटातील (Intermediate group) डायोराइट हा खडक बनतो. कृष्णाभ्रक, हॉर्नब्लेंड. इल्मेनाइट किंवा मॅग्नेटाइट ही गौण खनिजे विपुल झाल्यास त्यानुसार गॅब्रोचे प्रकार पडतात. गॅब्रोच्या चयाश्म अंतर्वेशनाजवळ (Cumulates intrusion) कधीकधी निकेल, क्रोमियम, प्लॅटिनम किंवा क्वचित लोह यांची धातुकेही आढळतात.

डोलेराइटप्रमाणेच गॅब्रोचीदेखील बांधकाम क्षेत्रात ब्लॅक ग्रॅनाइट या नावाने मोठ्या प्रमाणात मागणी असते. कठिण व टिकाऊ खनिजांमुळे पॉलिश केल्यावर ते दीर्घकाळ टिकते, तसेच यातील खनिजांची स्फटिके अधिक चमकदार होऊन या पॉलिश केलेल्या पृष्ठभागावर पदार्थांचे प्रतिबिंब दिसते, म्हणून बांधकाम क्षेत्रात गृहसजावटीमधे गॅब्रोचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मऊ या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून गॅब्रो हे नाव पडले आहे.

बुशवेल कॉम्प्लेक्स (दक्षिण आफ्रिका), स्टील वॉटर कॉम्प्लेक्स (मोंटाना) येथे गॅब्रो लॅकोलिथच्या रूपात आढळतो. तर स्केर गार्ड (ग्रीन लँड) येथील गॅब्रो थरांच्या रूपात आढळतो. भारतात गॅब्रो हा थर, भित्ति, वृत्तस्कंध (बॅथोलिथ – Boss) इत्यादि रूपात आढळतो. यात प्रामुख्याने प्रकासम (आंध्र प्रदेश), फेनाई माता (गुजरात), सिंघभूम (ओडिशा), उसगाव (गोवा) या ठिकाणी गॅब्रोबरोबर डोलेराइटचे विपुल साठे आढळतात.

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर