विजडम, जॉन : (१९०४−१९९३). विश्लेषणवादी ब्रिटिश तत्त्वज्ञ. मूर, ब्रॉड, मॅक्टॅगार्ट यांच्या व्याख्यानांना नियमित हजेरी लावून ते १९२४ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून बी. ए. उत्तीर्ण झाले. पुढील पाच वर्षे त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल सायकॉलॉजीत नोकरी केली. त्यानंतर १९३४ साली एम. ए. ही पदवी त्यांनी प्राप्त केली. दोन दशाकांहून अधिक काळ व्याख्याता असलेल्या विजडम यांची १९५२ साली तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून क्रेंब्रिज विद्यापीठात नेमणूक झाली. विख्यात तत्त्वज्ञ लूटव्हिख व्हिट्गेन्श्टाइन ह्यांच्यानंतर केंब्रिज विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या अध्यासनीही विजडम ह्यांना नियुक्त करण्यात आले.

१९२९ साली विजडम मॉली इव्हर्सन या दक्षिण आफ्रिकी गायिकेशी विवाहबद्ध झाले. तिच्यापासून त्यांना थॉमस झाला. त्यानंतर त्यांनी १९५० मध्ये पामेला स्टेननामक महिलेशी विवाह केला. ती चित्रकार होती.

विजडम ह्यांचे इंटरप्रिटेशन अँड ॲनॅलिसिस हे पहिले पुस्तक १९३१ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्या लेखनांपैकी बरेचसे, सुट्या सुट्या निबंधाच्या स्वरूपात तत्त्वज्ञानाच्या नियतकालिकांतून आधी प्रसिद्ध झाले आणि नंतर त्यांना ग्रंथरूप लाभले. त्यांच्या महत्त्वाच्या लेखनात ‘लॉजिकल कन्स्ट्रक्शन्स’ ह्या शीर्षकाने माइंड ह्या त्रैमासिकात प्रसिद्ध झालेले पाच निबंध (१९३१−३३), प्रॉब्लेम्‌स ऑफ माइंड अँड मॅटर (१९३४) तसेच अदर माइंड्‌स (१९५२), फिलॉसॉफी अँड सायकोॲनॅलिसिस (१९५३) आणि पॅरॅडॉक्स अँड डिस्कव्हरी (१९६५) ह्या निबंधसंग्रहांचा समावेश होतो.

विजडम यांच्यावर व्हिट्‌गेन्श्टाइन ह्यांचा मोठा प्रभाव होता. व्हिट्‌गेन्श्टाइन ह्यांच्या तत्त्वज्ञानात्मक कारकिर्दीचे दोन स्पष्ट खंड पडतात : पहिला, ट्रॅक्टेटस लॉजिको-फिलॉसॉफिकस (१९२२, म. शी. तर्कतत्त्वज्ञानविषयक प्रबंध) मधील तत्त्वज्ञानाचा आणि दुसरा १९२९ पासून हळूहळू आकार घेत शेवटी फिलॉसॉफिकल इन्‌व्हेस्टिगेशन्स (१९५३) मध्ये व्यक्त झालेल्या तत्त्वज्ञानाचा. या दोन्ही तत्त्वज्ञानांचे प्रतिबिंब विजडम यांच्या विचारात पडले आहे. त्यांच्याही लिखाणाचे १९३४ पूर्वीचे आणि १९३४ नंतरचे असे दोन खंड पडतात. पहिल्या खंडातील तत्त्वज्ञान बर्ट्रंड रसेल व व्हिट्‌गेन्श्टाइन यांनी प्रतिपादिलेल्या तार्किक परमाणुवादाचा पुरस्कार करणारे आहे, तर त्यानंतरचे निबंध व्हिट्‌गेन्श्टाइन ह्यांच्या उत्तरकालीन मतांशी संबद्ध आहेत.

तार्किक परमाणुवादानुसार विश्वाचे घटक आणि त्यांची रचना यांचे स्वरूप आदर्श भाषेच्या साह्याने निश्चित करता येते. प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (३ खंड, १९१०−१३, म. शी. गणिताची तत्त्वे) मध्ये रसेल ह्यांनी विकसित केलेली भाषा पारमाण्विक (Atomic) विधाने आणि त्यांचे सत्यताफलनात्मक समास (Truth-Functional Compound) यांची बनलेली होती आणि म्हणून विश्वही पारमाण्विक वास्तवे (Atomic Facts) व त्यांचे विविध समास यांचे बनलेले आहे, असे त्यांचे मत होते. सामान्य, लौकिक, दैनंदिन भाषेत व्यक्त केल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी तर्कशास्त्राच्या आदर्श भाषेत व्यक्त केल्या जाऊ शकतील तेवढ्याच गोष्टी अस्सल आणि सत्, बाकीच्या भ्रामक, असे यातून निष्पन्न होते.

या तत्त्वज्ञानाच्या उभारणीत रसेल यांच्या ‘लॉजिकल कन्स्ट्रक्शन्स’ (तार्किकीय रचना) नावाच्या क्लृप्तीला फार महत्त्व आहे. तार्किकीय रचनेचे स्वरूप असे सांगता येईल : तत्त्वज्ञानाच्या इतिहासात आपण व्यवहारत ज्या गोष्टी सत् आहेत असे मानतो, त्या गोष्टी सत् नाहीत, भ्रामक आहेत, असे मत वारंवार व्यक्त केले गेले आहे. उदा., काल आणि अवकाश सत् नाहीत किंवा भौतिक वस्तू सत् नाहीत, अशी मते वारंवार प्रतिपादिली गेली आहेत. उदा., प्रसिद्ध चिद्वादी तत्त्ववेत्ते जॉर्ज बर्क्ली ह्यांचे मत असे होते की, जगात फक्त आत्मे व त्यांच्या कल्पना (संवेदने आणि प्रतिमा) एवढ्याच गोष्टी खरोखर आहेत. या बाबतीत रसेल ह्यांचे मत असे होते की, भौतिक वस्तूंविषयीच्या विधानांचा अनुवाद आपण निःशेषपणे वेदनदत्तविषयक (Sensum) अशा विधानांत करू शकतो की, जी मूळ विधानाशी सममूल्यी (Equivalent) असतील. असा अनुवाद करणे म्हणजे भौतिक वस्तुविषयक विधाने वेदनदत्तविषयक विधानांत विलोपित करता येतात असे दाखविणे. हे दाखविले, म्हणजे भौतिक वस्तू वेदनदत्तांच्या तार्किकीय रचना असल्याचे दाखविले असे होते. असे केल्याने भौतिक वस्तूंचे अस्तित्व न मानताही ते मानण्याचे सर्व फायदे प्राप्त करता येतात, असे रसेल ह्यांचे मत होते.

विजडम यांच्या ‘लॉजिकल कन्स्ट्रक्शन्स’ या निबंधमालेत या विषयाचे पहिले तपशीलवार आणि विस्तृत विवेचन आले आहे. या विवेचनात विजडम ह्यांनी व्हिट्‌गेन्श्टाइन ह्यांची वाक्यार्थाची चित्रवादी उपपत्ती वापरली आहे. वाक्य हे त्याने व्यक्त केलेल्या वास्तवाचे चित्र असते, अशी ही कल्पना आहे.

व्हिट्‌गेन्श्टाइन ह्यांच्या मनात तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाविषयी काही नवीन कल्पना १९२९ च्या सुमारास उद्भवू लागल्या होत्या. या कल्पना ते आपल्या व्याख्यानांतून व्यक्त करीत; परंतु त्यांचे या विषयावरील लिखाण त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाले नाही. ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. विजडम ह्यांच्या तात्त्वज्ञानिक कारकिर्दीच्या दुसऱ्या खंडातील निबंध व्हिट्‌गेन्श्टाइन ह्यांच्या या नवीन विचारांनी प्रभावित झाले आहेत. असे असले, तरी त्यांची मांडणी आणि विकास विजडम यांचा स्वतःचा होता आणि आपली मांडणी व्हिट्‌गेन्श्टाइन ह्यांना मान्य होईलच असे नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विजडम ह्यांच्या या कालखंडातील बहुतेक लेख तत्त्वज्ञानाविषयीच्या द्वितीय स्तरीय विचाराला वाहिलेले आहेत. तत्त्वज्ञानाचे विषय म्हणजे अवकाश व काल, भौतिक वस्तू आणि मने इ. ह्यांच्या विषयीची विधाने प्रथमस्तरीय विधाने. पण तत्त्वज्ञानात्मक जो बौद्धिक व्यापार आहे त्याचे स्वरूप, कार्य व पद्धती यांच्याविषयीची विचार द्वितीय स्तरीय विचार झाला. तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील तत्त्वज्ञांचा तत्त्वज्ञानात्मक व्यापार समजून घेणे हे तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट आहे, असे विजडम यांचे मत आहे.

तात्त्वज्ञानिक उपपत्ती भाषिक गोंधळातून निर्माण होतात, असे व्हिट्‌गेन्श्टाइन ह्यांचे मत होते. हे मत विजडम यांना मान्य आहे. त्या उपपत्ती केवळ भ्रामक नसून त्यांच्यात भाषिक अंतर्वेधीपणाचा गुणही असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

दोन तत्त्वज्ञ परस्परविरोधी मत मांडत असतील, तर दोघांचे म्हणणे रास्त मानून परमतसहिष्णुता आवश्यक असल्याचे प्रतिपादन विजडम ह्यांनी आपल्या फिलॉसॉफिकल पर्प्लेक्सिटीत म्हटले आहे. ‘तत्त्वज्ञान’ म्हणजे काय ह्या आपल्या प्रमुख लेखात ते म्हणतात की, विविध तत्त्वज्ञांनी मांडलेल्या मतामतांच्या गलबल्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सर्व मतांची सविस्तर, सुस्पष्ट मांडणी; मगच त्यांच्यात सुधारण व समन्वय घडवून आणता येतो. माझ्या अस्तित्वाचे प्रयोजन कोणते, हा प्रश्न दोन महायुद्धानंतर ऐरणीवर आला. त्याच वेळी काही तत्त्वज्ञांना अशा प्रश्नांचे साहित्यिक मूल्य मान्य असले, तरी तत्त्वज्ञानात असे प्रश्न अस्थानी वाटत होते. अशा वेळी विजडम ह्यांचा १९६५ साली लिहिलेला ‘द मिनिंग ऑफ द क्वेश्चन्स ऑफ लाइफ’ हा लेख महत्त्वाचा ठरतो. तो जीवनविषयक प्रश्नांच्या अर्थाची फोड करतो. लहानसहान गोष्टींवरून आपण मोठ्या गोष्टींविषयी तर्क लढवतो. विशिष्ट कृती कशासाठी हा प्रश्न निराळा आणि एकूणच कृतिमयता कशासाठी, हा प्रश्न निराळा. त्याप्रमाणे एकेका कृतीचा अर्थ विचारणे वेगळे नि सबंध जीवनाचा अर्थ विचारणे वेगळे. इतिहासकार, शास्त्रज्ञ, प्रेषित, नाटककार, कवी जीवनाचा अर्थ आपापल्या रीतीने व्यक्त करतात. एकंदरीत, विश्लेषणांती, दोन प्रकारच्या प्रश्नांच्या स्वरूपातील भेद लक्षात आला की, विश्लेषक व अस्तित्ववादी तत्त्वज्ञानातील अंतर कमी होते.

तत्त्वज्ञानात समस्या असतात; सिद्धता नसतात, हे विजडम ह्यांचे म्हणणे महत्त्वाचे आहे. सिद्धता गणितात असतात. तत्त्वज्ञानात विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. संशय हे तत्त्वज्ञानात जरी उपस्थित केले गेले, तरी त्यांचे स्वरूप चिंताग्रस्त मनोवृत्तीमुळे उद्भविणाऱ्या (Neurotic) संशयाहून वेगळे असते. नवनवी माहिती, तथ्ये मिळविण्यापेक्षा आहे त्या तथ्यांची रचना अंतिमत: कशी आहे, हे जाणून घेण्यात तत्त्वज्ञाला रस असतो. ‘ईश्वराचे असणे’, ‘आत्म्याचे अमर असणे’, ‘मित्रांच्या मनात असणे’ आणि ‘दोन अधिक दोन सात असणे’ ह्या वाक्यांमधील ‘असणे’मध्ये असणारा फरक इतका सूक्ष्म आहे की, त्याची बोळवण ‘निरर्थक’ ह्या एकाच शब्दाने करता येणार नाही. निरर्थकतेचे किंवा कोणत्याही रचनेचे निरनिराळे पदर स्पष्ट करणे म्हणजे तत्त्वज्ञान होय. तत्त्वज्ञानातील वाक्ये दिशाभूल करणारी (Misleading) व प्रकाशक (Illuminating) असतात, असा त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ आहे. मुळात त्यांचे स्वरूप निसरडे असते; परंतु विश्लेषण केल्यास अर्थच्छटा स्पष्ट होतात, म्हणून तीच विधाने मग प्रकाशदायी ठरतात.

केंब्रिज येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Barker, S. F. Ed. Proof and Explanation, Maryland, 1991.
  • Gasking, D. A. T. ‘The Philosophy of John Wisdom, I and It’, Australasian Journal of Philosophy, 1954.
  • Pass-more, John, A Hundred Years of Philosophy, London, 1957.
  • Urmson, J. O. Philosophical Analysis, Oxford, 1956.
  • https://iep.utm.edu/wisdom/

                                                                                                                                                                   समीक्षक : शर्मिला वीरकर