महाराष्ट्रातील एक मोठा भुईकोट किल्ला. तुळजापूरपासून ३२ किमी., तर सोलापूरपासून सु. ४६ किमी. अंतरावर बोरी नदीकाठी हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्याशेजारी ‘रणमंडळ’ नावाचा जोडकिल्ला आहे.
नळदुर्ग सर्वप्रथम कोणी व कधी बांधला, याविषयी ठोस माहिती मिळत नाही. स्थानिक दंतकथेनुसार या किल्ल्याचा संबंध थेट पौराणिक काळातील नळ-दमयंतीशी जोडला जातो. बदामी चालुक्यांच्या काळात नळदुर्ग हे ‘नलवाडी विषय’ म्हणून ओळखले जात असे. हा किल्ला राजा ‘नळ’ याने बांधला, असा उल्लेख तारीख-इ-फिरिश्ता (१६०६) या ग्रंथात आहे. त्यावरून ‘नळदुर्ग’ हे नाव रूढ झाले असावे. आदिलशाही राजवटीत यास ‘शाहदुर्ग’ असे नाव ठेवण्यात आले होते. परंतु हे नाव प्रचलित होऊ शकले नाही. हा किल्ला वेळोवेळी बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मोगल, निजाम, मराठे, इंग्रज इ. राजसत्तांच्या आधिपत्याखाली होता.
नळदुर्ग किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजवंशाच्या ताब्यात असल्याचे म्हटले जाते. मुहम्मद बिन तुघलकाच्या काळात या किल्ल्याचा उल्लेख मिळत नाही. किल्ल्याचे सुरुवातीचे बांधकाम चौदाव्या शतकात बहमनी सुलतानांच्या काळात केले गेले. बहमनी काळात मातीच्या भिंतींऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले. अलाउद्दीन बहमनी द्वितीय (कार. १४३५—५८) याच्या काळात या किल्ल्याचा उल्लेख मिळतो. नंतरच्या काळात मुहम्मदशाह बहमनी तृतीय (कार. १४६३—८२) याच्या काळात महमूद गावानने साम्राज्याचे आठ प्रांत पाडल्यानंतर, हा किल्ला दस्तूर दिनारकडे सोपविण्यात आला. हा किल्ला निजामशाही व आदिलशाहीच्या सीमेवर असल्याने अली आदिलशाह (१५५८-६०) याने या किल्ल्याला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी अतिरिक्त बांधकामे केली. १५८७ साली या किल्ल्यावर आदिलशाही व कुतुबशाहीमधील शांतता प्रक्रियेचा एक भाग म्हणून इब्राहिम आदिलशाह व गोवळकोंड्याच्या मुहम्मद कुली कुतुबशाहाची सुंदर बहीण मलिका जहान यांचा भव्य विवाहसोहळा संपन्न झाला होता. १५५९ पासून १६७६ पर्यंत विजापूरच्या आदिलशाहीने नळदुर्गवर राज्य केले. १६७६ साली मोगलांनी हा किल्ला जिंकला. नळदुर्गचा किल्ला हा दक्षिणेतील उत्कृष्ट किल्ल्यांपैकी एक असल्याचे औरंगजेबाचे उद्गार आहेत. मीर कमरुद्दीन उर्फ ‘निजाम-उल्-मुल्क आसफजाह’ याने १७२४ मध्ये मोगलांशी फारकत घेऊन दक्षिणेत स्वतंत्र सत्ता स्थापित केल्यानंतर नळदुर्ग निजामांच्या ताब्यात आला. १७५८ मध्ये पेशव्यांनी हा किल्ला शिंदखेडच्या तहात जिंकला होता.
ईस्ट इंडिया कंपनीच्या कवायती फौजेच्या कर्जापोटी १८५३ मध्ये निजामाने एका तहान्वये वऱ्हाड, नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे इंग्रजांना तोडून दिले. १८५७ च्या उठावाच्या वेळी निजामाने इंग्रजांना साहाय्य केले. त्याचे बक्षीस म्हणून नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे निजामास परत देण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलिस कारवाई करून नळदुर्गसह मराठवाडा भारतात समाविष्ट करून घेतला.
नळदुर्ग किल्ला मध्ययुगीन दुर्गस्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सध्याच्या किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळात झालेली आहे. दुर्गाच्या तिन्ही बाजूंनी बोरी नदीचे नैसर्गिक कवच व एका बाजूने किल्ल्याच्या संरक्षणासाठी खंदक खोदलेले आहे. या किल्ल्यात विशिष्ट अशा वास्तू पाहायला मिळतात. त्यामध्ये पाणी महाल, नौबुरूज (नऊ), उपळी बुरूज, जामा मशीद, बारादरी, अंबरखाना, रंग महाल, हमामखाना, हुलमुख दरवाजा इ. प्रमुख आहेत.
किल्ल्यात प्रवेश करतेवेळी सर्वप्रथम दोन उंच बुरुजांच्या मधून जावे लागते. आत गेल्यानंतर काहीसे मोठे प्रवेशद्वार लागते. पुढे नागमोडी वळणानंतर किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. याच्या दोन्ही बाजूंस दोन भक्कम संरक्षक बुरूज आहेत. यास लाकडी दरवाजा असून त्यावर लोखंडी खिळे बसविलेले दिसतात.
नळदुर्ग किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून त्यात अनेक बुरूज आहेत. तटबंदीवर फांजी व चर्या आहेत, तसेच वरती जाण्यास ठिकठिकाणी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या बुरुजांना जंग्या असून, बुरुजांवर व इतरत्र अनेक तोफा दिसतात. दक्षिण तटबंदीतील ‘नौबुरूज’ हा स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. या दोन मजली बुरुजास नऊ छोटे-छोटे कंगोरे आहेत, म्हणून यास ‘नौबुरूज’ म्हणून ओळखले जाते. हा बुरूज १०८ फूट उंच असून त्याचा व्यास सु. ४० फूट आहे. नौबुरुजाजवळ पाणी अडवून एक छोटा बंधारा बांधला आहे.
या किल्ल्यात मुख्यप्रवेशद्वार ओलांडून पुढे गेल्यास सु. ७६ मीटर अंतरावर उजव्या बाजूस ‘अंबरखाना’ आहे. ही वास्तू उत्तराभिमुख असून ती आयताकृती आहे. यानंतर पुढे गेल्यास उजव्या बाजूस ‘निजाम कोर्ट’ किंवा ‘मुन्सिफ कोर्ट’ आहे. ही वास्तू १९३२ साली बांधण्यात आली. यात निजाम काळात न्यायालयाचे कामकाज चालत असे. ही इमारत चौरसाकृती असून, यात अनेक दालने आहेत. नंतरच्या काळात यातील काही खोल्यांचे तुरुंगात रूपांतर करण्यात आले होते.
मुन्सिफ कोर्टाच्यासमोर पश्चिमाभिमुख ‘जामा मशीद’ आहे. याचे बांधकाम १५६० मध्ये अली आदिलशहाने केले होते. ही मशीद दगडी चौथऱ्यावर बांधलेली असून समोरील दर्शनी बाजूस तीन कमानी आहेत.
जामा मशिदीच्या समोर डावीकडे उत्तरेकडील तटबंदीलगत भग्न दक्षिणाभिमुख ‘राणीमहाल’ आहे. येथून जवळच असणाऱ्या ‘बारादरी’ या वास्तुची उंची १५ फूट आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासक कर्नल मेडोज टेलर याने १८५३ ते १८५७ या काळात यात वास्तव्य केले होते. या वास्तूमधून बोरी नदीचे विहंगम दृश्य दिसते.
बारादरीच्या समोर तसेच जामा मशिदीच्या समोरील भागात किल्लेदाराचे निवासस्थान दिसते. बारादारीच्या पूर्वेस हमामखान्याची वास्तू आहे. याचा उपयोग राजघराण्यातील व्यक्तींच्या स्नानासाठी करण्यात येत असे. यापुढे ‘दरबार महाल’ आहे. या ठिकाणी राजदरबार भरत असे. याशिवाय सरदार व कर्मचारी यांच्या खोल्या किल्ल्यावर दिसतात.
‘उपळ्या’ किंवा ‘उपळी’ बुरूज हे किल्ल्यावरील सर्वांत उंच ठिकाण असून याची उंची सु. १५० फूट व व्यास ६४ फूट आहे. हा बुरूज किल्ल्याच्या तटबंदीत नसून किल्यातील मध्यभागात जमिनीवर स्वतंत्रपणे बांधण्यात आलेला आहे. बुरुजावर तीन तोफा ठेवण्याची व्यवस्था आहे. या बुरुजावर जाण्यासाठी एकूण ७७ पायऱ्यांची योजना केलेली आहे. बुरुजावरून नळदुर्ग किल्ल्याच्या चारही बाजूंच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. या बुरुजाच्या पाठीमागील बाजूस एक हौद आहे.
उपळ्या बुरुजाच्या पूर्वेस ५० फूट अंतरावर ‘बारुदखाना’ आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीलागत ‘रंगमहाल’ आहे. या रंगमहालातही अनेक दालनांचा समावेश आहे. या ठिकाणी संगीत व नृत्य कार्यक्रम होत असत. किल्ल्यात सर्वत्र खापरी पाइपचा वापर करून पाणी पोहोचविले आहे.
‘पाणी महाल’ हे किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे. हा महाल मध्ययुगीन दुर्गस्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. बोरी नदीवरील ही भव्य वास्तू जमिनीपासून सु. ९० फूट उंच आहे. इब्राहीम आदिलशाह (दुसरा) याच्या काळात मीर मुहंमद इमादीन या वास्तुशास्त्रज्ञाने या वास्तूचा आराखडा तयार केला. त्यासाठी त्याने बोरी नदीचे पाणी वळवून एक बंधारा बांधला. यात पाणी महाल ही वास्तू १६१३ मध्ये तयार केली. बंधाऱ्यावरून महालात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. महालाला गवाक्षांची व्यवस्था केलेली आहे. पावसाळ्यात बोरी नदीचा जलस्तर वाढल्यावर धरणाच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या सांडव्यातून पाणी वाहते. हे दोन कृत्रिम धबधबे ‘नर’ व ‘मादी’ या नावाने ओळखले जातात. नळदुर्ग व रणमंडळ किल्ले पाणी महालाने जोडलेले आहेत. सदर पाणी महाल हा कायम थंडगार असतो. या महालात एक फार्सी शिलालेख आहे. रणमंडळ किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गंडभेरुड व माशांची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. याशिवाय नळदुर्ग किल्ल्यात कैदखाना, पागा या वास्तू आणि काही तोफा आहेत.
संदर्भ :
- Maharashtra State Gazetteers, Osmanabad District, Bombay, 1972.
- Michell, George, Ed., Indian Islamic Architecture by John Burton-Paget, BRILL, Leiden, 2008.
- Yazdani, G. Ed., Epigraphia Indo-Moslemica (1917-18), Calcutta, 1921.
- कठारे, अनिल, ‘नळदुर्गचा भुईकोट किल्ला’, भारतीय इतिहास आणि संस्कृती (त्रैमासिक), मुंबई, २००१.
- पवार, शि. सो. मराठवाड्यातील किल्ले-एक अभ्यास, पीएच.डी. प्रबंध (अप्रकाशित), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, २००८.
- महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, लातूर जिल्हा, भाग-२, मुंबई, २००८.
समीक्षक : जयकुमार पाठक