सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोड्या अलग झालेल्या एका डोंगरावर बांधलेला आहे. किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी दरी व ताशीव कडे असून फक्त पूर्वेककडील बाजू सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जोडलेली असल्याने तेथूनच गडामधे प्रवेश करता येतो.

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील कोयनानगर गावाजवळून सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेल्या भैरव मंदिरापर्यंत पोहोचता येते. वाटेत समर्थ रामदास स्वामींशी संबंधित रामघळ नावाची एक घळ (गुहा) आहे. भैरवाच्या मंदिराजवळून दक्षिणेकडून किल्ला व सह्याद्रीची मुख्य रांग यांमधील खिंडीत पोहोचता येते. खिंडीतून पुढे किल्ला उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत गडाच्या पश्चिमेकडील भागात जाता येते. खिंड सोडल्यावर लगेचच गडाच्या भग्न दरवाजाचे अवशेष दृष्टीस पडतात. दरवाजाचे खांब मातीत रूतलेले असून कमान अस्तित्वात नाही, पण या खांबांच्या अस्तित्वावरून येथे गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा असावा, असे निश्चित सांगता येते. याच वाटेने पुढे गडाची दक्षिणेकडील तटबंदी दिसते. या तटबंदीमध्ये बुरुजाचे भग्न झालेले अवशेष असून सध्या फक्त अर्धवर्तुळाकार पाया दिसून येतो. गडाला वळसा घालत, पश्चिमेकडील कातळापर्यंत जाता येते. या वाटेवर अजून एका बुरुजाचे अवशेष आहेत. पश्चिमेकडील कातळात गडावरील एकमेव पाण्याचे टाके आहे. या टाक्यात बारमाही पाणी असते. तेथून गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाणारी वाट खूप घसाऱ्याची आणि अवघड आहे.

भैरवगड किल्ला दुर्गमतेसाठी प्रसिद्ध आहे. गडाजवळून भैरव, गोवळ व सांबरसरी असे तीन घाटमार्ग कोकणात उतरतात. या सर्व घाटमार्गांवरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भैरवगड किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे. हा किल्ला कधी व कोणी बांधला याबद्दल तपशील नाही. येथे पुरातत्वीय उत्खनन झाले तर काही अवशेष दृष्टीस पडण्याची शक्यता आहे. भैरवगड, प्रचितगड यांसारख्या अनेक किल्ल्यांची नोंद पेशवे दप्तरमध्ये मिळते.

संदर्भ :

  • जोशी, सचिन विद्याधर, रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्ग वैभव , पुणे, २०१३.
  • रत्नागिरी आणि सावंतवाडी गॅझेटिअर, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मुंबई, १८८०.

                                                                                                                                                                                    समीक्षक : जयकुमार पाठक