रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील किल्ला. देवरुख गावातून बेलारी फाटा मार्गे निरगुडवाडीच्या पुढे गडाच्या मेटापर्यंत गाडी रस्ता झालेला आहे. तेथून पुढे पायवाटेने किल्ला उजवीकडे ठेवत वळसा घालता येतो. उजव्या बाजूला वर महिमतगडाची तटबंदी दिसते. पश्चिमेकडील खिंडीपर्यंत पोहोचल्यावर खिंडीच्या पलीकडे कुंडी गावातून येणारा मातीचा रस्ता दिसतो. या खिंडीपर्यंत आता गाडी रस्ता झालेला आहे. खिंड ज्या धारेवर आहे, त्या धारेवरून गडाच्या पूर्वाभिमुख दरवाजाजवळ पोहोचता येते.

महिमतगड

दरवाजाची कमान उत्तम स्थितीत असून त्यावर मध्यभागी एका फुलाचे शिल्प कोरलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजूस सैनिकांसाठी देवड्या दिसून येत नाहीत.

खांब टाके, महिमतगड.

किल्ल्यावर कातळामध्ये पाण्याची तीन टाकी खोदलेली आहेत. यांपैकी एक पूर्णतः खांब टाके असून या टाक्यात तीन कोरीव खांब आहेत. या खांबांवर नक्षीकाम केलेले दिसते. एका टाक्यामधे बारमाही पाणी असते. पुढे उजवीकडे खोल दरी दिसते. याच भागात डावीकडील कातळात एक खोदलेली गुहा काही प्रमाणात गाळाने भरलेली दिसते. पण ही गुहा किंवा लेणे नसून एक खांब टाकेच होते. सध्या येथे पाणी नसते. या खांब टाक्याच्या अलीकडे आणि दरवाजाच्या आतील बाजूस एक कोरडे टाके आहे. या भागात थोडी सपाटी आहे.

त्रिकोणी बुरूज, महिमतगड.

बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा दुसरा दरवाजा दिसतो. या दरवाजाची कमान मात्र शिल्लक नाही. पण दरवाजाची कमान पेलणारे खांब आजही तेथे दरवाजा असल्याच्या खुणा दर्शवितात. हा दरवाजा उत्तराभिमुख असून मुख्य दरवाजापासून अंदाजे ३० फूट उंचीवर आहे. येथील रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर डावीकडे एक बांधीव तलाव आहे. याला घोडे तलाव असे संबोधले जाते. रामेश्वर मंदिराच्या जोत्यावर घुमटीसदृश्य छोटे मंदिर आहे. मंदिरात शंकराच्या पिंडीवर छत म्हणून सध्या ॲस्बेस्टसचा पत्रा लावलेला आहे. मंदिरात शंकराची पिंड असून त्यावर तांब्याचे कवच चढवलेले आहे. पिंडीसमोर नंदी आहे. पिंड व नंदी हे एका मजबूत जोत्यावर आहेत. याच जोत्यावर गणेशाची एक मूर्ती आहे. मंदिराचे खांब जोत्याजवळ पडलेले दिसून येतात.

माची, महिमतगड.

उत्तरेकडील तटाजवळ महिषासुरमर्दिनीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती अत्यंत सुबक आहे. या मंदिराला लाकडी मंडप होता. सध्या मंदिराच्या बाहेरील मोकळ्या जागेत दोन छोट्या आकाराच्या तोफा ठेवलेल्या आहे. तीन फूट लांबीच्या या तोफा उचलता येऊ शकतात. गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे जाताना एका छोट्या घुमटीमधे हनुमानाची मूर्ती ठेवलेली आहे. माथ्यावर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. गडाच्या पूर्वेकडे माचीसदृश्य भाग असून माचीकडील वाटेत एक छोटे घुमटीवजा देऊळ आहे. घुमटीमधे कोणतीच मूर्ती दिसत नाही, पण स्थानिकांच्या मते हे भवानी देवीचे देऊळ असावे. माचीवरील तटबंदी उत्तम स्थितीत आहे. माचीवरील एक बुरूज गोलाकार असून त्यावर चढण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. माचीवरील दुसरा बुरूज त्रिकोणी आकाराचा आहे. गडावर बांधकामाची काही जोती दिसतात. महिषासुरमर्दिनी मंदिराच्या १०० मी. अलीकडे एका बुरुजावर ७ फूट लांबीची एक तोफ आहे. किल्ल्याला एकूण ९ बुरूज व २ माच्या आहे.

तोफ, महिमतगड.

किल्ल्यासंबंधी विश्वसनीय ऐतिहासिक नोंद अद्यापि मिळालेली नाही. किल्ल्याची दुर्गमता, विविध मंदिरे इ. वास्तू व दरवाजाची बांधणी पाहता हा किल्ला आदिलशाही किंवा निजामशाही कालखंडात बांधलेला नसावा. तो विजापूरकरांनी घेतल्याचे पुरावे मिळत नाहीत. गडावरील स्थापत्यशास्त्रीय पुरावे पाहता किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या काळात बांधला असावा. पुढे हा किल्ला सातारच्या छ. शाहूंकडे किंवा ताराबाईंकडे असण्याची शक्यता जास्त आहे.

 

 

संदर्भ :

  • गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले भाग -२, पुणे, १९०५.
  • जोशी, सचिन विद्याधर, रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्गवैभव, पुणे, २०१३.

                                                                                                                                                                                   समीक्षक : जयकुमार पाठक