पायीश, डोमिंगो : (इ. स. सोळावे शतक). पोर्तुगीज प्रवासी आणि इतिहासकार. त्याचा ‘दोमिंगो पाइश’ किंवा ‘पेस’ असाही उल्लेख आढळतो. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही; तथापि पोर्तुगीज सत्ता गोव्यात आल्यावर १५२० मध्ये हा भारतात आला व इतिहासकार बॅरोज याला लिहिलेल्या पत्रावरून तो १५३७ पर्यंत गोव्यात असल्याचे दिसते. १५२० ते १५२२ या काळात त्याने गोव्यालगतच्या विजयानगर साम्राज्यात प्रवास केला व प्रवासात जे पाहिले ते लिहून ठेवलेले दिसते.

पायीश दक्षिण भारतातील प्रसिद्ध विजयानगर साम्राज्यात पोर्तुगीज व्यापारी व दूत होता. त्याने विजयानगरचा थोर राजा कृष्णदेवराय (सु. १४८९—१५२९) याच्या कारकिर्दीतील विजयानगरचे विस्तृत वर्णन त्याच्या क्रोनिका दोस हेस दी बिसनाग (Chronica dos reis de Bisnaga) अर्थात क्रॉनिकल ऑफ द विजयानगर किंग्स या ग्रंथात केले आहे. पायीश म्हणतो, “विजयानगर रोमएवढे मोठे होते. तेथील राजप्रासादांनी लिस्बनच्या किल्ल्याएवढी जागा व्यापली होती. सुरेख उत्तुंग प्रवेशद्वारे, रुंद रस्ते, व्यापारी पेठा, मंदिरे, फळबागा, द्राक्षमळे यांमुळे शहरास शोभा प्राप्त झाली असून तेथे सर्व सुविधा उपलब्ध होत्या.”

विजयानगर साम्राज्य हे समुद्रकिनाऱ्यापर्यंत पसरलेले असल्याचे तो म्हणतो. तेथे प्रवेश करण्यासाठी त्याला अनेक डोंगररांगा ओलांडाव्या लागल्या व घनदाट जंगलातून प्रवास करावा लागला. या साम्राज्यातील काही महत्त्वाची शहरे ही समुद्रकिनारी असून तेथे उत्तम बंदरे असल्याचे व तेथे पोर्तुगीजांच्या वखारी असल्याचे तो म्हणतो. या जागांच्या यादीत तो मडगाव, अंकोला, भटकळ, होन्नावर, मेंगलोर, बर्सिलोर, कन्नूर या शहरांचा उल्लेख करतो. भटकळ येथून विजयानगर साम्राज्यात शिरण्यासाठी एकमेव रस्ता असल्याचे तो म्हणतो. भटकळ येथून ४० लीग (१३८ मैल) अंतरावर असणाऱ्या सोंडूर (Zambur) येथेपर्यंत त्याने जमिनीवरून प्रवास केला. हा भटकळपासूनचा व्यापारीमार्ग असून या रस्त्यावरून दरवर्षी ५ ते ६ हजार बैलांवर माल लादून मुख्य शहरात येतो, अशी माहिती पायीश देतो. तो लिहितो की, या प्रदेशात जंगल विरळ असून पूर्वेला डोंगर आहेत, परंतु काही ठिकाणी जाताना दाट झाडीतून जावे लागते. शहरांच्या व गावांच्या भोवती आंबा, फणस व चिंचेची झाडे असून त्या खाली प्रवासी विश्रांतीसाठी थांबतात. येथे एका मोठ्या वडाच्या झाडाचे वर्णन करताना तो लिहितो की, या झाडाचा पसारा इतका प्रचंड आहे की या खाली आम्ही आमचे ३२० घोडे तबेल्यात बांधतात तसे बांधले. हा प्रदेश प्रचंड समृद्ध असून येथे मोठ्या प्रमाणात गाई, बैल, म्हशी, शेळ्या-मेंढ्या व पक्षी दिसतात. या प्रदेशात भात, मका, विविध कडधान्ये व इतर अनेक पिके घेतली जातात. एवढी पिके आमच्या देशात पण घेतली जात नाहीत. येथील गावांभोवती मातीच्या भिंती असून मुख्य राजधानीभोवती दगडी भिंती बांधलेल्या आहेत. तसेच मोठ्या शहरात व सरहद्दीवर किल्ले बांधलेले दिसतात, परंतु गावात ते बांधलेले दिसत नाहीत. किल्ले बांधायला राजाची परवानगी घ्यावी लागते, असे तो लिहितो. येथील लोक त्यांनी बनवलेल्या घाण्यामध्ये बिया घालून तेल काढतात. येथे लोकांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी अनेक तलाव खोदलेले असून ते त्याची खूप काळजी घेतात. तो म्हणतो की, येथे हिवाळा कमी असल्यामुळे येथील काही तलावांतील पाणी मातकट होते किंवा ते कोरडे पडतात.

पुढे तो विजयानगर साम्राज्याचा विस्ताराचे वर्णन करतो. या राज्याच्या पश्चिम सरहद्दीवर पर्वतांची रांग असून तिच्या पश्चिमेस समांतर असा समुद्रकिनारा आहे व त्याची लांबी ३०० मैल आहे. याच्या पूर्वेकडे बालाघाट व कोरोमंडल असून एका बाजूला बंगालचा प्रदेश आहे. त्या जवळ ओरिसा (ओडिशा) राज्य असून उत्तरेस दख्खनचे साम्राज्य आहे. पश्चिमेच्या भटकळपासून ओरिसाच्या सरहद्दीपर्यंत या राज्याची रुंदी अंदाजे ३५० कोस असल्याचे तो लिहितो. याच्या पश्चिमेस आमचा गोव्याचा प्रदेश असून जो आम्ही आदिलशहाकडून युद्ध करून जिंकून घेतला आहे. ओरिसा हे राज्य नरसिंहरायाच्या राज्यापेक्षा मोठे असून ते बंगालपर्यंत पसरलेले आहे. त्याचा विस्तार पूर्वेकडे मलाक्का म्हणजे सध्याच्या मलेशियापर्यंत तर पश्चिमेस खंबायतपर्यंत आहे.

विजयानगरमधील लोकांबद्दल अशी माहिती देतो की, येथील लोक हे खूप निरोगी, सुदृढ व धिप्पाड असून गहुवर्णीय (light coloured) आहेत. येथील राजाकडे अगणित संपत्ती, अफाट फौज व कितीतरी हत्ती आहेत. तो पुढे धारवाड (दारचा) शहरातील एका दगडातून कोरलेल्या मंदिराचे, तसेच इतर मंदिरांचे वर्णन करतो. या मंदिरांवर पुरुष, स्त्री, देवता तसेच गाय, बैल, माकडे यांच्या प्रतिमा कोरलेल्या असल्याचे तो लिहितो. एका मंदिरात मानवी शरीर व हत्तीचे तोंड (गणपती) असलेल्या देवतेची मूर्ती असून सहा हातात शस्त्रे असल्याचे सांगतो. या मूर्तीच्या हातातली चार शस्त्रे या आधी अदृश्य झालेली असून इतर दोन जेव्हा अदृश्य होतील, तेव्हा जगाचा नाश होईल, असे तेथे सांगितले जाते. देवतेला दररोज नैवेद्य दाखवला जातो, त्यानंतर देवतेपुढे नर्तकी (देवदासी) नृत्य करत असल्याचे तो लिहितो. तो पुढे येथील वेश्यांची घरे अव्वल प्रतीची असून अधिकारी व श्रीमंत लोकांच्या वेश्यांचा मान खूप मोठा असल्याचे व या स्त्रियांना राजकुळातील स्त्रियांकडे जाण्यासाठी मज्जाव नसल्याचे तो लिहितो. पुढे तो येथील लोक सुपारी बरोबर पान खाऊन मुखशुद्धी करीत असल्याचे, तसेच गाय, बैल, डुक्कर सोडून इतर प्राण्यांचे मांस तेथील लोक खात असल्याचे तो लिहितो.

विजयानगर हे राजधानीचे शहर असून या शहराभोवती डोंगर असून याचा परीघ ८ कोस आहे. डोंगरामध्ये असणाऱ्या सपाट जागांवर भक्कम तटबंदी केलेली असून ती ओलांडल्याशिवाय शहरात प्रवेश करता येत नसल्याचे तो लिहितो. शहरात असणाऱ्या मोकळ्या जागेत भात खाचरे असून बागबगीचे देखील आहेत. यात संत्री, लिंबे वगैरे फळे तसेच विविध भाज्या पिकत असल्याचे तो लिहितो. या भाज्यांत कोबी पिकत नसल्याचे तो आवर्जून लिहितो. या शहरातील घरे रस्त्याच्या दुतर्फा बांधलेली असून अतिशय मजबूत व विस्तीर्ण आहेत. राजाने शहरात येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी खूप सवलती दिल्याची माहीती तो देतो. शहरात येणारे पाणी हे खोदलेल्या चरातून, नाल्यांतून व बंद नळांतून आणले जात होते. एका टेकडीवर राजाने नुकत्याच बांधलेल्या तलावाच्या कामावर १५ ते २० हजार माणसे काम करताना बघितल्याचे व या तलावाच्या बांधकामासाठी अनेक बळी दिलेले असल्याचे तो लिहितो. कृष्णदेवरायाचे वर्णन करताना तो राजाचा बांधा मध्यम असून त्याचा वर्ण गोरा, शरीरयष्टी सुदृढ व स्थूल असून त्याच्या तोंडावर देवीचे वण आहेत, असे तो लिहितो. त्याचा सर्वत्र दराराअसून तो अनेक गुणांनी संपन्न, कायम आनंदी व हसतमुख असल्याचे लिहून ठेवतो.

भारताच्या मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून पायीशने लिहिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. गोवा ते विजयानगरच्या त्याच्या प्रवासाची भौगोलिक माहिती योग्य प्रकारे त्याने नोंद करून ठेवली आहे. धारवाड येथील एकाश्म मंदिराबद्दलही तो माहिती देतो; तथापि ते मंदीर आज अस्तित्वात नाही.

संदर्भ :

  • Sewell, Robert, The Vijaynagar Empire – A Forgotten Empire, Madras, 1991.
  • लेले, मा. व्यं. अनु., एक नष्टस्मृती साम्राज्य किंवा विजयनगर साम्राज्याचा इतिहास, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक मंडळ, पुणे, १९१९.

                                                                                                                                            समीक्षक : प्रमोद जोगळेकर