इत्सिंग : ( ६३५ – ७१३ ). समुद्रमार्गे भारतात येणारा हा पहिला चिनी बौद्ध यात्रेकरू. त्याने सातव्या शतकाच्या शेवटी भारताला भेट दिली. फाहियान व ह्यूएनत्संग (झुआन झान) या यात्रेकरूंप्रमाणेच इत्सिंग देखील बौद्ध धर्माचा अभ्यास करणे व बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांचे दर्शन घेणे या हेतूने भारतात आला होता. त्याचा जन्म बीजिंग (पेकिंग) जवळील फान यांग या ठिकाणी झाला. यावेळी चीनमध्ये सम्राट ताई-त्सुंग राज्य करत होता. इत्सिंग वयाच्या ९ व्या वर्षी तो शान-तुंग (शँटुग) डोंगरावरील मठामध्ये शान-यु व हुई-सी या गुरूंकडे शिकण्यासाठी गेला. १४ व्या वर्षी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन तो भिख्खू झाला. येथे त्याने  इतर विषयांबरोबर बौद्ध धर्माचा अभ्यास केला. ह्यूएनत्संग भारतातून चीनला परतल्यावर त्याच्या झालेल्या जंगी स्वागताचा इत्सिंग साक्षीदार असावा. एकूणच फाहियान व ह्यूएनत्संग यांच्यामुळे तो प्रभावित झाल्याचे दिसून येते.

इत्सिंग : एक काल्पनिक चित्र.

इत्सिंगने पाच वर्षे बौद्ध धर्माच्या विनय  या अंगाचा (नियम व कायदे) अभ्यास केला. तो मूलसर्वास्तीवाद या पंथाचा अनुयायी होता व फाहियानप्रमाणे त्याला विनय अंगाचा अभ्यास करण्यात विशेष रस होता. विनय विषयक ग्रंथांचे संकलन करणे व भारतातील बौद्ध धर्माचा अभ्यास करणे, हे त्याचे भारताला भेट देण्यामागचे प्रमुख उद्देश होते.

इत्सिंग गान्गझू (ग्वांग्जो / कँटन) बंदरामधून व्यापारी जहाजातून दक्षिणेकडे येण्यास निघाला (६७१). तो प्रथम श्रीविजय (सुमात्रा) येथे पोहोचला. तेथे व आजूबाजूच्या मलाया प्रदेशात त्याचे आठ महिने वास्तव्य होते. श्रीविजय शैलेंद्र राजवंशाच्या आश्रयाखाली एक मोठे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला आले होते. या ठिकाणी इत्सिंगने संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केला. श्रीविजय व त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये या काळी बौद्ध धर्माचा चांगलाच प्रसार झाला होता. येथील बौद्ध धर्म व परंपरांचे वर्णन इत्सिंगच्या प्रवासवर्णनात आढळते.

श्रीविजयहून समुद्रमार्गे इत्सिंग भारतात ताम्रलिप्ती येथे दाखल झाला. तेथून तो मगध येथे गेला व मगधाच्या परिसरात असणाऱ्या बोधगया, श्रावस्ती, कपिलवस्तु व इतर बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांचे त्याने दर्शन घेतले. नंतर नालंदा येथील विद्यापीठात दहा वर्षे त्याने संस्कृत व्याकरण व बौद्ध धर्माचे अध्ययन केले. या काळी नालंदा प्रसिद्धीच्या शिखरावर होते. येथील शिक्षण पद्धतीचे विशेषतः संस्कृत वाङ्मयाच्या अध्यापन पद्धतीचे त्याने त्याच्या ग्रंथात वर्णन केले  आहे. नालंदा येथे चीनहून बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी आलेल्या अनेक भिख्खूंशी त्याचा परिचय  झाला. या समकालीन तसेच काही जुन्या भिख्खूंची जीवनचरित्रे नंतर त्याने ग्रंथस्वरूपात शब्दबद्ध केली.

ताम्रलिप्तीहून व्यापारी जहाजाने इत्सिंग पुन्हा श्रीविजय येथे आला (६८५). आपल्या कामासाठी मदतनीस शोधण्यासाठी तो काही महिने चीनमध्ये गेला होता (६८९), तो काळ वगळता ६९५ पर्यंत त्याचा मुक्काम श्रीविजय येथे होता. येथील वास्तव्याच्या काळात त्याने आपल्या यात्रेचे वर्णन करणारा ग्रंथ नान- है- ची- कुएई- नि- फा- चुआन (भारत आणि मलाया द्वीपसमूह येथील बौद्ध धर्माच्या नोंदी) लिहून पूर्ण केला व त्याचे संपूर्ण हस्तलिखित आपल्या एका मित्राबरोबर चीनला पाठवले.

इत्सिंग चीनला परतल्यावर त्याचे खूप मोठे स्वागत करण्यात आले (६९५). चीनच्या इतिहासातील तो काळ सम्राज्ञी वू हिच्या वर्चस्वाचा होता. ती बौद्ध धर्माची अनुयायी होती. चीनमध्ये परतल्यानंतर तिच्या आश्रयाखाली इत्सिंगनें भारतातून आणलेल्या ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर करण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले. या कामी त्याला चीनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या  शिक्षानंद, ईश्वर व इतर भारतीय भिख्खूंचे साहाय्य लाभले. त्याने भारतातून नेलेल्या ५६ ग्रंथांचे २३० खंडांमध्ये भाषांतर केले (७००-७१२). त्यांपैकी मूलसर्वास्तीवाद या पंथाच्या विनयचे भाषांतर सर्वांत महत्त्वाचे आहे. त्याने लिहिलेल्या ५ ग्रंथांपैकी  एक म्हणजे ता – तांग – सी – यु – ची का ओ सेंग चुआन (थोर तांग राजवंशाच्या राज्यकाळात धर्माचा शोध घेण्यासाठी पश्चिमेकडील देशांत गेलेल्या प्रमुख भिख्खूंचे जीवन चरित्र). यामध्ये त्याने ५६ भिख्खूंचे चरित्र लिहिले आहे. या भिख्खूंपैकी बहुतांश भिख्खू चिनी, तर थोडे कोरियन होते. तसेच बरेचसे त्याचे समकालीन होते. ७१३ मध्ये इत्सिंग मरण पावला.

आपल्या भ्रमंतीदरम्यानच्या २५ वर्षांत (६७१–६९५) इत्सिंग जवळजवळ ३० पेक्षा जास्त देश फिरला. त्याचे प्रवासवर्णन त्याने आपल्या भारत आणि मलाया द्वीपसमूह येथील बौद्ध धर्माच्या नोंदी या ग्रंथात केलेले आढळते. ह्यूएनत्संगच्या लेखनात आढळणारी वैज्ञानिक दृष्टी व विषय वैविध्य यांचा अभाव इत्सिंगच्या लेखनात जाणवत असला, तरी मानव्य विद्येच्या दृष्टीने त्याच्या लेखनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेषतः तत्कालीन बौद्ध धर्म, त्याचा चीन व इतर देशांत झालेला प्रसार आणि तेथील धर्माचे स्वरूप, धर्मातील विविध पंथ व परंपरा यांच्या अभ्यासासाठी हे ग्रंथ उपयुक्त ठरतात. बौद्ध मठांतील जीवन, भिख्खू व भिख्खुणी यांची वस्त्रे, अन्न, प्रव्रज्येचे नियम, गुरुशिष्यसंबंध, रोग व त्यांवरचे औषधोपचार इ. विषयांसंबंधी तो सविस्तर माहिती देतो. ही माहिती महत्त्वाची व मनोरंजक आहे. ठिकठिकाणी तो आपल्या देशातील आचारविचारांची तत्कालीन भारतीय आचारविचारांशी तुलना करतो.  त्याने लिहिलेल्या ५६ भिख्खूंवरील ग्रंथामुळे या भिख्खूंना त्यांच्या खडतर प्रवासादरम्यान हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या, तरी भारतात येऊन धर्माचे खरे स्वरूप जाणून घेण्याची त्यांची तळमळ व जिज्ञासू वृत्ती यांचे दर्शन घडते. त्यांना भारतात आल्यानंतर मिळणारा मान-सन्मान यांचेही वर्णन आले आहे. नागानन्द नाटक, काशिकावृत्ति, भर्तृहरीची पतंजलीच्या महाभाष्यावरील टीका यांसंबंधी त्याने प्रसंगोपात्त दिलेली माहिती वाङ्‌मयेतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

संदर्भ :

  • Bapat, P. V. 2500 Years of Buddhism, Publication Division, Ministry of Information and Broadcasting, Government of India, New Delhi, 1956 (Reprint, 1971).
  • Heera, Bhupendra, Impact of Buddhism on Socio- Religious Life of the Asian People, Decent Books, New Delhi, 2007.
  • Lahiri, Latika, Chinese Monks in India, Motilal Banarasidass Publishers, Delhi, 1995.
  • Mittal, P. (compl), Origin and Development of Buddhism in India, (Collection of Articles from Indian Antiquary), Originals, Delhi, 2008.
  • Takakusu, J. A Record of the Buddhist Religion as Practised in India and the Malay Archipelago (A.D. 671 – 695), Oxord, 1896.

समीक्षक : प्रमोद जोगळेकर