संत सहादुबाबा वायकर महाराज : (१८६३-१९६८). महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार आणि समाजसेवी.  पुणे जिल्ह्यात  वारकरी संप्रदायाचा वारसा मोठ्या निष्ठेने, श्रद्धेने जपला आहे. या जिल्ह्यातील जुन्नर – आंबेगाव परिसरात वारकरी संप्रदायाचा जो प्रसार झालेला दिसतो, त्याला कारण संतानी सांगितलेल्या शुद्ध, सात्विक, सुलभ परमार्थ मार्गाचा प्रसार करणारे निष्ठावंत भागवत भक्त या परिसरात निर्माण झाले. ह.भ.प. सहादुबाबा वायकर हे अशाच साधु पुरुषांपैकी एक होत. ‘नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञान दिप लावू जगी॥ अशा निरपेक्षपणे अंत:करणातील भक्तिभावाच्या प्रेरणेने व सामान्यजनांच्या हिताच्या तळमळीने रात्रंदिवस कष्ट करून लोकांना बाबांनी सन्मार्ग दाखविला. आज जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावागावांत अखंड हरिनाम सप्ताह, भजन-किर्तन, पारायण होत आहेत याचं श्रेय सहादुबाबा वायकर यांच्या अविरत भक्तीमार्गी कार्याला आहे.

आर्वीजवळच्या गुंजाळवाडी येथे त्यांचा जन्म झाला. वडिल भाऊ उमाजी वायकर हे मुंबई येथे कोळशाचा धंदा करणारे सुप्रसिद्ध व्यापारी होते. त्यामुळे  घराला प्रतिष्ठेबरोबरच सधनताही लाभलेली होती. बाबांचे बालपण व शिक्षण मुंबईत आपल्या भावंडासोबत सुखात सुरू झाले होते. १८६८ – ७६ या कालावधीत मराठी सातवीनंतर बाबांचे इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण झाले. येथील शाळेतील ख्रिस्ती धर्म शिकवणुकीचा बाबांच्या बालमनावर मोठा प्रहार झाला त्यानंतर त्यांनी ही शाळा सोडली.

शाळा सोडल्यानंतर काही दिवस बाबा कोळशाच्या धंद्यावर वडिलांना मदत करत. होतकरू, हुशार उमाजी वायकर यांची मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे धंदा तेजीत होता. त्याकाळात आर्वी, ओतूर, धोलवड, गुंजाळवाडी व परिसरातील अनेकांना त्यांनी रोजगार दिला. परंतु त्यांना अकाली स्वर्गवास झाला. त्यामुळे लहान वयातच सहादुबाबांचे पितृछत्र हरपले. कुटुंब विभक्तीनंतर धंद्याचा व्याप, संघर्ष यावर बाबांनी कायमचे पाणी सोडले. मुंबईतील प्रारंभिक जीवन संपवून आपला फाटका तुटका संसार घेऊन बाबा व भाऊ रखमा वायकर कायमचे गुंजाळवाडीचे रहिवाशी झाले. गीता भागवत करीती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥ या संत तुकोबारायांच्या उल्लेखाप्रमाणे बाबांनी पुढील वारकरी जीवन जगायचे ठरविले.

संत तुकोबांच्या उपदेशाप्रमाणे बाबांचे शेतकरी-वारकरी जीवन सुरू झाले. वयाच्या बावीसाव्या वर्षी बाबांनी पहिली आषाढी वारी केली. पत्नी भिकुबाई, पाच मुलगे, दोन मुली असा परमार्थ व प्रपंचाचा समन्वय साधत बाबा भजन कीर्तनात रममाण झाले होते. बाबांचे सासरे बाळाजी शिंदे यांनी मुलंबाळं नसल्याने आपली सर्व संपत्ती बाबांच्या गैरहजेरीत मुलगी भिकुबाईं यांचे नावे बक्षिसपत्र केली. बाबा घरी आल्यानंतर त्यांना हा वृत्तांत समजला.त्यांनी सासरे शिंदे यांना बोलावून, ‘ही तुमची इस्टेट तुम्ही परत घ्या, आम्हांला ती नको’, असे सांगून टाकले. त्यानंतर हे बक्षिस-पत्र रद्द केले गेले. चिरंजीव सितारामदादा यांनाही बुडीताची मालमत्ता मिळाली होती, या बाप-लेकांनी तीही धिक्कारली. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥ हा संत तुकारामांचा अर्थ विचार बाबांच्या वारकरी जीवनात तंतोतंत उतरवलेला दिसतो.

जुन्नर भागातील शेतकऱ्यांचा साधा पोषाख, प्रेमळ व नम्र वागणूक, लोकांबद्दल जिव्हाळा स्वच्छ व्यवहार आणि भगवंताच्या भक्तीत रंगलेले अंत:करण असे बाबांचे सोज्वळ स्वरूप होते. खेडवळ दिसणाऱ्या पण उज्वल असणाऱ्या व्यक्तिमत्वाने त्याकाळात आपल्या भोवतालच्या समाजात ज्या चांगल्या प्रेरणा निर्माण केल्या त्या प्रचाराची आधुनिक साधने घेऊन गाजावाजा करणाऱ्या एखाद्या समाज सुधारकालाही शक्य नाही. बाबांनी कधी पायी चालत, तर कधी सायकल किंवा बैलगाडीने फिरून कथा-किर्तनतून केलेल्या प्रबोधन कार्यातून गावेच्या गावे मद्य-मांसाहारापासून मुक्त झाली. ग्रामदेवतांना बळी देण्याच्या प्रथेतील हिंसा बंद पाडली आणि सात्विक जीवनाचे आदर्श अनेकांच्या जीवनात साकार झाले. जुन्नर-आंबेगाव परिसरातील शेतकरी आणि त्यांनी कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईत केलेल्या वस्त्या हे बाबांचे कार्यक्षेत्र होते. सहादुबाबांनी आपले कार्यक्षेत्र संत विचारांनी, भजन-किर्तनांनी सतत वाजते, गाजते ठेवले. दिंड्या-पालख्या, नामसप्ताह – ग्रंथ पारायणांचे उपक्रम राबवून संस्कार घडविणारी यंत्रणा उभी केली. त्यांच्या गुरुबंधूनी, सहकारी आणि अनुयायांनी जुन्नर – आंबेगाव परिसरातील अनेक गावे त्यांच्या उद्दिष्टांना अनुसरून वारकरी विचारांनी भारून टाकली.

जवळपास ६०-६५ वर्षे बाबा माऊलींबरोबर चाकणकरांच्या दिंडीत पंढरपुरला जायचे. कित्येक वर्षे चाकणकरांच्या दिंडीचे नेतृत्व सहादुबाबांच्या खांद्यावर होते. मोठ्या समाजाचा नेता होऊन आपण चोख राहून इतर व्यवहारात ‘अलिप्त कमळ जळी जैसे’ असे निर्मळ जीवन जगण्याचा पायंडा बाबांनी लोकांना घालून दिला आणि टिकवला, हाच बाबांच्या परमार्थाचा पुरूषार्थ होय. बाबा हे नुसते समाजाचे श्रद्धास्थान नव्हते तर ती एक परमार्थ मार्गातील वारकरी समाजाची शक्ती बनली होती. संत सहादुबाबा वायकर यांची वारकरी नित्यनेमाची भजनी मालिका महिन्याचे वारकरी, दिंडीवाले, फडकरी यांच्या सर्वतोमुखी गाजली, लोकप्रिय झाली. मामासाहेब दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर, शंकरमहाराज खंदारकर या महाराष्ट्रातील विख्यात विद्वानांनी संत सहादुबाबांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

केवळ टाळ आणि माळ एवढ्याच भक्तीकार्यात बाबांची वाटचाल चाललेली नव्हती तर त्यात सामाजिक जीवनाची उभारणी व्हावी यासाठी त्यांचे जीवन खर्ची पडले. अनेक लोककलाकारांना व तमाशा कलावंताना बाबांनी वारकरी संप्रदायात सामावून घेतले. त्याना विठ्ठलभक्तीचा कानमंत्र दिला. त्यांना सोबत घेऊन पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. पांडुरंगाचे दर्शन घडवले. याचाच परिणाम म्हणून ‘वारी’ आणि ‘बारी’ एकत्र नांदू लागली. याचे आदर्श उदाहरण म्हणजे राष्ट्रपती पदक विजेते सुप्रसिद्ध तमासगीर भाऊ बापू नारायणगांवकर हे बाबांचे अनुयायी झाले. ते नित्यनेमाने देहूची वारी करत. आजही भाऊ बापूंची समाधी पंढरपुरात उभी असल्याचा उल्लेख आढळतो. ‘वारी’ आणि ‘बारी’ यांचा समन्वय जुन्नर परिसरात नांदत आहे. बाबांनी चार वेळा अनेक अनुयायांसह चारधाम यात्रा केली. दिव्याने दिवा लावतात तसे सहादुबाबांनी अनेकांच्या ह्रदयात भक्ती-ज्ञानाची ज्योत लाविली. ह.भ.प. रामदासबाबा मनसुख व  ह.भ.प. कोंडाजीबाबा डेरे यांना सहादुबाबांच्या बाबांच्या कार्याने प्रेरणा लाभली.

ह.भ.प. रामकृष्णबुवा जाधव, सुमंतबुवा नलावडे, भिकाजीबुवा बच्चे, भिकाजीबुवा काशिद, गंगारामबुवा घोलप, शंकरबुवा बोडके, घाटपांडे गुरूजी, मारूतीबुवा चव्हाण, मुरलीधरबुवा वाईकर, पुंडलिकबुवा खांडगे, आत्मारामबुवा घुले, आत्मारामशास्त्री बोरकर, सुदामबुवा वाईकर, विष्णुबुवा गबाले, चंद्रकांतबुवा पटाडे, बजरंगबुवा आंधळे या अनुयायांनी प. पू सहादुबाबांचा वारसा समर्थपणे सांभाळला. ह.भ.प. सुमंतमहाराज नलावडे हे आजही आपल्या किर्तनरूपी सेवेचा प्रारंभ व सांगता संत सहादुबाबांचे नाव घेऊनच करतात. त्यांच्या मुर्तीची पंढरपुरच्या मठात प्रतिष्ठापना करून ह.भ.प. सुमंतमहारांजानी गुरू-शिष्य नाते आजही जपले आहे.

संदर्भ : क्षेत्र संशोधन