संगमनेरकर, गुलाबबाई : (१९३२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत. नृत्यचंद्रिका म्हणून त्यांना ओळखले जाते. लावणी क्षेत्रात बैठकीच्या लावणीची अदाकारी याविषयी ज्या ज्या वेळी बोलले जाते तेव्हा हमखास डोळ्यासमोर येणारे नाव म्हणजे गुलाबबाई संगमनेरकर होय. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे त्यांचे गाव. दयाराम मोरे आणि शिवडाबाई उर्फ शांताबाई या दांपत्याच्या पोटी  यांचा जन्म झाला. त्यांची आई तमाशातील उत्तम कलाकार म्हणून ओळखली जायची. दगडोबा साळी यांच्या तमाशात शिवडाबाई यांनी अनेक वर्षे काम केले होते. आपला लोककलेचा वारसा लेकीने पुढे चालवावा म्हणून त्यांनी मुलगी गुलाबला लहानपणापासून लावणी शिकवायला सुरुवात केली. जेमतेम तीन चार इयत्ता शिकल्यावर गुलाबबाईंना त्यांच्या आईने बाहेर लावणी शिकायला पाठवायचे ठरवले. लावणी क्षेत्रात त्यावेळी राधाबाई बुधगावकर हे नाव गाजत होते. त्यांच्या संगीत पार्टीचा नाशिकला मुक्काम असताना शिवडाबाईंनी कन्या गुलाबला राधाबाई बुधगावकर यांच्याकडे लावणीचे धडे घ्यायला पाठवले. पण अनेक दिवस सोबत राहूनही राधाबाईंनी गुलाबबाईंना प्रत्यक्षात काहीही शिकवीत नव्हत्या. त्यांच्या घरातली कामे करून छोटी गुलाब कुठेतरी आडोशाला उभी राहून राधाबाईंची अदाकारी बघायची, त्यातले बारकावे टिपायची.

राधाबाईंकडे मुलीला फारसे शिकायला मिळत नाही हे लक्षात आल्यावार शिवडाबाईंनी गुलाबला राधाबाईंच्या पार्टीतून घेऊन आल्या आणि छबु नगरकर, सुगंधा सिन्नरकर यांच्याकडे काही महिने लावणीचे धडे गिरवायला ठेवले. या दोन्ही ठिकाणी काही गोष्टी शिकल्यावर गुलाबबाई बनुबाई शिर्डीकर यांच्या पार्टीत दाखल झाल्या. पठ्ठे बापूराव, राम जोशी, परशराम, सगनभाऊ यांच्या अनेक लावण्यांची गायकी आणि अदाकारीचा त्यांनी अभ्यास केला.

मुलगी मोठी होत होती तशी आपल्या मुलीच्या नावाने संगीतपार्टी काढावी असे त्यांच्या आई वडिलांच्या मनात आले. लावणी क्षेत्रातील तीन चार मोठ्या कलावतींकडे शिकून मुलीचा लावणीचा उत्तम अभ्यास झालंय हे लक्षात आल्यावर दयाराम मोरे यांनी मुंबईहून संगीत पार्टीसाठी लागणारी वाद्ये मागवली. संगमनेरला संगीतपार्टीतील सादरीकरणाचा सराव केला आणि गुलाबबाई संगमनेरकर यांच्या नावाने संगीत पार्टी सुरू केली. संगीत पार्टीची सुरुवात करण्यासाठी त्यांनी कलानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरची निवड केली. कोल्हापूरच्या कवठेकर थिएटरमध्ये गुलाबाबाई संगमनेर यांच्या स्वतःच्या संगीतबारीची सुरुवात झाली. सहा महिने कोल्हापुरात कार्यक्रम केल्यावर गुलाबबाईंच्या आईने पंढरपूरचा दौरा नक्की केला. यामागे दोन हेतू होते, पंढरपूरला कार्यक्रम तर सादर होणार होतेच पण तिथे भामाबाई पंढरपूरकर यांच्याकडून काही नवीन शिकता येईल. पंढरपूरला आल्यावर गुलाबाबाई भामाबाईंकडे जाऊ लागल्या आणि त्यांच्या लक्षात आले की लावणीत अदाकारी तर महत्वाची असतेच पण लावणीचे शब्द बारकाईने समजून घेतले तर अदाकारी अधिक खुलते. तसेच आपण जिथे कार्यक्रम सादर करतोय तिथल्या आजूबाजूच्या गोष्टींचा लावणीत कसा उपयोग करून घ्यायचा ही महत्त्वाची गोष्टही त्या भामाबाईंकडून शिकल्या. लावणी सादर करताना बाजूला असलेला एखादा खांब, वादकांच्या समोरचा तबला, पडद्याचं टोक या सगळ्याचा भामाबाई अतिशय समर्पक उपयोग करून घ्यायच्या.

पुढे महाराष्ट्रात नावलौकिक झाल्यावर मुंबई दौऱ्यात गुलाबबाईंना एच.एम.व्ही. या नामांकित कंपनीने निमंत्रित केले. यासाठी संगीतकार विठ्ठल शिंदे यांचा पुढाकार महत्वाचा ठरला. त्यांनीच ध्वनिमुद्रण कलागृहाच्या वातावरणात बुजाणाऱ्या गुलाबबाईंना धीर देऊन त्यांच्याकडून मनाजोग्या चाली गाऊन घेतल्या. एच.एम.व्ही. कंपनीने काढलेल्या ध्वनिमुद्रणाला (रेकॉर्ड) चांगला प्रतिसाद मिळाला. रेडिओवरून या लावण्या प्रसारित होऊ लागल्या. गुलाबाबाईंच्या साथीला त्यांच्या धाकट्या भगिनी मीरा याही आल्या होत्या. गुलाब – मीरा संगीत पार्टीने त्याकाळात प्रचंड लोकप्रियता मिळवली. दिल्लीला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले. तेव्हा महाराष्ट्रातून गुलाबबाईंना दिल्लीत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. दिल्लीसारख्या महानगरात राजकारण, समाजकारण, कलाक्षेत्रातील मान्यवरांसमोर कार्यक्रम सादर केल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यावेळी राज्यात ढोलकी फडाचे कार्यक्रम गावोगाव तंबू लाऊन व्हायचे. खानदेशातील प्रसिद्ध तमाशा फडमालक आनंदराव महाजन यांच्या तमाशात काही काळ काम केल्यावर ढोलकी फडातील नामांकित कलावती कांताबाई सातारकर यांच्या बरोबर गुलाबबाईंनी लोकनाट्य तमाशाही सादर केला. पण ही भागीदारी फार काळ टिकली नाही. खानदेशात गुलाबबाई संगमनेरकर या नावाला मोठे वलय होते. या कारणास्तव गुलाबबाईंनी पुन्हा संगीतबारीकडे आपला मोर्चा वळवला. स्वतःचा तंबू शिवून घेऊन त्यांनी आणखी पाच सहा संगीत पार्ट्यांना एकत्र केले आणि शिरपूर, साक्री, अमळनेर, धुळे, शहादा आदी भागात कार्यक्रम करायला सुरुवात केली. सगळीकडे त्यांचे कार्यक्रम गाजत असताना धुळ्याच्या मुक्कामात त्यांना स्थानिक गुंडगिरीचा अतिशय वाईट अनुभव आला. तोवर त्यांच्या मुली अलका, कल्पना याही कार्यक्रमात सहभाग घेऊ लागल्या होत्या. भविष्यात अशी वेळ वारंवार येऊ शकेल म्हणून त्यांनी खानदेशातील कार्यक्रम बंद करून केवळ बंदिस्त थियेटरमध्ये कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात आर्यभूषण थिएटरला त्यांच्या संगीत पार्टीचे कार्यक्रम जोरात सुरु झाले. काही दिवस पुण्यात आणि काही दिवस मुंबईत कार्यक्रम सुरु असताना गुलाबबाई संगमनेरकर हे नाव अभिजन वर्गातही गाजू लागले. त्याचदरम्यान लता मंगेशकर या आजोळची गाणी या नावाने काही गाणी करीत होत्या. आजकाल जसे गाण्यांचे अल्बम असतात असा काहीसा तो प्रकार होता. लताबाईंनी सगळ्या प्रकारची गाणी गायली पण त्यांनी फारशा लावण्या गायलेल्या नाहीत. त्यांच्या आजोळच्या गाणी  या ध्वनिचित्रफितीत एक लावणी समाविष्ट करण्याचे ठरले. योगायोगाने या लावणीवर अदाकारी करण्यासाठी लताबाईंपुढे गुलाबबाई संगमनेरकर हे नाव गेले. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील अजरामर लावणी म्हणून ओळखल्या जात असलेल्या ‘ राजसा जवळी जरा बसा ‘ या लावणीवर गुलाबबाई संगमनेरकर यांनी अदाकारी केली.

आपल्या दोन्ही मुली व एक मुलगा लावणी क्षेत्रात स्थिरावल्यावर गुलाबबाई संगमनेरकर यांनी काही वर्षे प्रकाश आणि जयमाला इनामदार यांच्याबरोबर गाढवाचे लग्न  या लोकनाट्याचे काही कार्यक्रम केले. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा एखाद्या कसलेल्या लावणी नृत्यांगणेला लाजवील अशी लावणी सादर करायचा. त्याच्या मार्गदर्शनाखाली कितीतरी मुली लावणी शिकल्या. अकलूजला होणाऱ्या लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमात लावणी सादर करणाऱ्या अनेक संचाचा तो नृत्य दिग्दर्शक असायचा. त्यानेही लावणीचा संच स्थापन करून अनेक कार्यक्रम केले. पण दुर्दैवाने त्याचे अकाली निधन झाले. आई शिवडाबाई पासून सुरु झालेली लोककलेची परंपरा गुलाबबाई संगमनेरकर यांच्या चौथ्या पिढीतही सुरु आहे. आयुष्यभर अनेक मानसन्मान मिळवलेल्या या कलावतीला महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन