भारताच्या ओडिशा राज्यातील एक प्राचीन स्थळ. ते भुवनेश्वर या राजधानीपासून ९ किमी. अंतरावर आहे. गंगावती नदीने वेढलेल्या या तटबंदीयुक्त नगराचा आकार १.१ चौ. किमी. इतका असून, प्रत्येक दिशेस दोन-दोन अशी एकूण ८ भक्कम प्रवेशद्वारे आहेत. या शहराच्या तटबंदीची बाहेरून उंची ९ मी. इतकी आहे.
या स्थळाचे उत्खनन सन १९४८-४९ साली बी. बी. लाल यांनी केले होते. सदर उत्खनन भारतातील स्वातंत्र्यानंतरचे पहिले मोठे उत्खनन होते. लाल यांनी पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वाराचे आणि लगतच्या परिसरात उत्खनन केले, त्यात त्यांना विविध रंगाची मृद्भांडी, भाजलेल्या मातीच्या मूर्ती, धातूची नाणी आणि इतर पुरावशेष प्राप्त झाले. सदर पुरास्थळाचा काळ त्यांनी इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. चौथे शतक असा निश्चित केला.
या पुरास्थळाचे पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक महत्त्व, आंतरिक स्थापत्य, तत्कालीन नगरवासियांची जीवनपद्धती, घरांची रचना आणि स्थळाचा कालानुक्रमिक विकास इत्यादी बाबी जाणून घेण्याच्या दृष्टीने येथे पुरातत्त्व विभाग, डेक्कन कॉलेज पुण्याचे रबिन्द्र कुमार मोहंती आणि कॉटसेन पुरातत्त्वीय संस्था आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ (लॉस अँजेल्स, अमेरिका) येथील मोनिका स्मिथ यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा उत्खननकार्य हाती घेण्यात आले (२००५-०९). तत्पूर्वी तटबंदीयुक्त शहराचा विशाल आकार आणि तत्कालीन सुनियोजित यंत्रणा लक्षात येण्याकरिता येथे विस्तृत भौगोलिक सर्वेक्षण करण्यात आले (२००२-०५). सदर उत्खनन हे तटबंदीच्या आत पश्चिमेकडे, पूर्वेकडील तटबंदीच्या वर, स्तंभ असलेल्या परिसरात, उत्तरी प्रवेशद्वार व लगतच्या परिसरात आणि तटबंदीच्या बाहेर करण्यात आले. उत्खननात प्राप्त पुराव्यांनुसार आणि कालमापन तिथीनुसार या स्थळाची प्राचीनता इ. स. पू. सहाव्या-सातव्या शतकापर्यंत गेली. या प्राचीन नगराविषयी अनेक नवीन बाबी उघडकीस आल्या. शिशुपालगडचा कालानुक्रमिक इतिहास स्तरशास्त्राप्रमाणे तीन कालखंडांमध्ये अनुक्रमे १) प्रारंभिक ऐतिहासिक काळ (इ. स. पू. आठवे ते इ. स. पू. चौथे शतक), २) ऐतिहासिक काळ (इ. स. पू. तिसरे ते इ. स. चौथे शतक) आणि ३) उत्तर ऐतिहासिक काळ (इ. स. पाचवे शतक) मध्ये विभागला आहे.
प्रारंभिक ऐतिहासिक काळामध्ये लोक उच्च प्रतीची, उत्कृष्ट भाजणीची काळ्या आणि तांबड्या रंगाची मूठ असलेली मृद्भांडी वापरत होते. तटबंदीच्या बाहेरील उत्खननात मातीचा भराव घातलेले तीन वर्तुळाकार आकाराचे दगडी अवशेष प्राप्त झाले. तटबंदीच्या बाहेर घराचे अवशेष प्राप्त झाले आहेत जे तटबंदीच्या आतल्या भागापेक्षा आकाराने मोठे आणि मोकळे आहेत, ज्यामध्ये मृद्भांडी, धातू इत्यादी पुरावशेष प्राप्त झाले. नगराच्या तटबंदीचे निर्माणकार्य इ. स. पाचव्या शतकापूर्वी झाले होते, असे या उत्खननामुळे लक्षात आले.
शिशुपालगडच्या दुसऱ्या ऐतिहासिक कालक्रमात वसाहतीमध्ये बराच बदल दिसून येतो. या काळात, लोकांच्या घरांच्या रचनेमध्ये बदल दिसून येतो. घरबांधणीकरिता पहिल्यांदा भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो आणि छताकरिता भाजलेले कवेलू वापरात आल्याचे पुरावे प्राप्त झाले. या काळात, लोकांच्या आवडीनिवडी मध्येही परिवर्तन दिसून येते. यांमध्ये रूलेटेड, काळी चकाकीयुक्त आणि तांबडी चकाकी असलेल्या मृद्भांड्यांचा वापर, लोकांच्या वैयक्तिक अलंकारामध्ये वृद्धी आणि गतकाळापेक्षा नवीन वस्तू दृष्टिगोचर होतात. सांस्कृतिक स्तर क्रमातील हा बदल शिशुपालगड येथील तत्कालीन काळातील सामाजिक आणि आर्थिक विकास दर्शवतो. महत्त्वाचे म्हणजे याच काळात मौर्य सम्राट अशोक याने कलिंगवर आक्रमण केले होते, परंतु त्याच्या विजयाने शिशुपालगड येथील तत्कालीन परिस्थितीवर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. इ. स. पू. पहिल्या शतकातील चेदी नरेश खारवेल याच्या उदयगिरी येथील हाथीगुंफा अभिलेखात वादळाने कमकुवत झालेल्या ‘कलिंगनगरीʼ या राजधानीच्या तटबंदी आणि प्रवेशद्वाराची दुरुस्ती केल्याचे नमूद केले आहे. शिशुपालगडच्या उत्खननांमध्येही तटबंदीच्या पश्चिम आणि उत्तर प्रवेशद्वाराची डागडुजी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे तटबंदीच्या आत उभे असणारे अठरा स्तंभ आणि उत्खननात प्राप्त लगतचे चापाकार स्थापत्य याच कालखंडातील आहे. अशा प्रकारे ‘कलिंगनगरीʼ हे स्थळ आजचे शिशुपालगड असल्याचे भक्कम पुरावे प्राप्त झाले आहेत.
उत्तर ऐतिहासिक काळामध्ये लोकांनी तटबंदीच्या आत उत्तरेकडे वस्ती केल्याचे पुरावे प्राप्त झाले. प्रथम या काळातील लोकांनी चाक आणि पुष्पाची छाप असलेली मृद्भांडी वापरली व नंतर राखडी रंगाची खोबणीयुक्त नवीन पद्धतीची मृद्भांडी वापरात आणल्याचे प्रमाण प्राप्त झाले. ओडिशाच्या इतर पुरास्थळांमध्ये या राखडी मृद्भांड्यांना मध्ययुगीन कालखंडात समाविष्ट केले जाते. या काळातील स्थापत्य बांधकामाचा कोणताही पुरावा मात्र उत्खननांत आढळला नाही.
उत्खनन आणि सर्वेक्षणांमुळे शिशुपालगड या सुनियोजितपूर्ण नगराच्या आत प्रवेशद्वारापासून काटकोनात छेद देणाऱ्या रस्त्यांची व्यवस्था, राजवाडा, राजतंत्रीय किंवा प्रशासनिक भवनाचे स्थापत्य, सामान्य लोकांची निवासस्थाने, नाणी आणि इतर महत्त्वपूर्ण पुरावे प्राप्त झाले. उत्खननात प्राप्त एकूण पुरावशेषांच्या आधारावर असे दिसून येते की, प्राचीन शिशुपालगड या नगराचा आवाका मोठा होता व नगरात विपुल लोकसंख्या व आर्थिक स्थैर्य होते. शिशुपालगड हे पूर्व भारतातील महत्त्वाचे राजकीय, आर्थिक, व्यापारी आणि क्षेत्रीय केंद्र म्हणून कार्यरत होते. या उत्खननामुळे शिशुपालगड पासून ९ किमी. अंतरावर असलेल्या अशोकाच्या धौली येथील अभिलेखात नमूद ‘तोसलीʼ हे स्थळ शिशुपालगड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इ. स. सहाव्या शतकानंतर येथील वस्तीचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले. येथील वस्ती साधारणतः १.५ किमी. पश्चिमेकडे मंदिर परिसरात स्थानांतरित झाल्याने हे पुरास्थळ ओस पडण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत हे पुरास्थळ भुवनेश्वर शहराचा भाग बनलेले असून अतिक्रमणामुळे सदर स्थळ नष्ट होण्याचा मार्गावर आहे.
संदर्भ :
- Lal, B. B. ‘Sisupalgarh 1948: An Early Historical Fort in Eastern Indiaʼ, Ancient India, 5, P. 62-105, 1949.
- Mohanty, R. K & Monika, L. Smith, ‘Excavations at Sisupalgarh 2005ʼ, Man and Environment, XXXI (1): 27-32, 2006.
- Mohanty, R. K.; Smith, M. L.; Donkin, A. & Greene, G. A. ‘Archaeological Research at Sisupalgarh 2007: An Early Historical City in Orissaʼ, Puratattva, Vol 37:142-154, 2007.
- Smith, Monika & Mohanty, R. K. ‘Excavations at Sisupalgarh 2005-2006ʼ, Bulletin of the Deccan College Postgraduate and Research Institute, 66-67: 191-198, 2007.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर