जीवन विमा, अपघाती विमा, प्रवास विमा यासारख्या विमा उत्पादनांशी प्रत्येकाचा संबंध येतच असतो. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, मोटारीचा अपघात, एखादी वास्तू आगीच्या भक्षस्थानी पडणे अशा inसंकटकाळी विम्याचे महत्त्व लक्षात येते. दावा केल्यानंतर झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन अथवा आधी पॉलिसीत ठरल्याप्रमाणे विमा कंपनी विमाधारकाला अर्थसहाय्य पुरवते. विमा ही ग्राहकाला आर्थिक नुकसानीच्या बाबतीत संरक्षण देण्यासाठी तयार केलेली व्यवस्था आहे. जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर भारतातील विमा व्यवसायाची प्रगती होण्यास सुरुवात झाली. अनेक जागतिक कंपन्या भारतीय विमा कंपन्यांबरोबर हातमिळवणी करण्यास पुढे सरसावल्या. भारतीय विमा विनियामक विकास प्राधिकरण (IRDA) ही संस्था सर्व विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवते. एवढेच नव्हे तर या संस्थेद्वारा प्रत्येक विमा कंपनीला विमाशास्त्रज्ञांकडून मूल्यांकन करून घेणे बंधन कारक केले आहे. विमाविज्ञानाचे ‘जीवन विमा’ व ‘निवृत्तीवेतन’ हे दोन उपयोजन (Applications) असले तरी वित्तीय संस्थांमध्ये आर्थिक बोजा अथवा आर्थिक दायित्वाचे आगणन करण्यासाठी या विज्ञानाचा वापर केला जातो. गणितीय व संख्याशास्त्रीय पद्धतीचा उपयोग करून विमा, वित्त व तत्सम क्षेत्रातील संभाव्य धोका अथवा जोखमीचे मूल्यांकन करणे अथवा अनुमान करणे या व्यापक विषयास विमाविज्ञान (Actuarial Science ) असे म्हणतात. या विषयाच्या एका भागास विमाविषयक–सांख्यिकी (Actuarial Statistics) म्हणतात.

इतिहास प्राचीन काळी ग्रीस येथून मद्य, जैतुन (Olive) व मातीच्या भांड्यानी भरलेले गलबत आफ्रिकेला जात असे. हे गलबत परतताना मौल्यवान विदेशी मसाले, धातु व लाकूड घेऊन येत असे. श्रीमंत लोक या जलप्रवासास आर्थिक निधी पुरवत असत. या व्यवहारात गलबत जर लुप्त झाले तर गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळत नसे. पंरतु गलबत सुखरूप परतल्यानंतर मात्र गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीवर उच्च व्याजदराने परतफेड अपेक्षित असे. या व्यवहारास सागरी विमा असे म्हटले जात. तेराव्या शतकाच्या मध्यात जागतिक व्यापाराची व्याप्ती वाढल्यानंतर पारंपरिक गुंतवणूकदारांनी जलप्रवासात धोका नाही असे समजून सागरी विमाक्षेत्रात गुंतवणूक करणे थांबविले, पूढे व्यावसायिक जोखीम पतकरणारे अथवा विमाकारानी (Insurer) सागरी विमाक्षेत्रात गुंतवणुकीस सुरूवात केली. एडमंड हॅले या गणितज्ञाने 1693 मध्ये प्रथमच ब्रेस्लाऊ (Breslau) या शहरातील लोकांच्या मृत्युच्या वेळी असलेले वयाच्या आधारे मृत्यूसारणी (Mortality Table) तयार केली. ही मृत्यूसारणी व हॅलेचे सूत्र यांच्या आधारे आयुर्मानाच्या संभाव्यतेची गणना करण्यात आली. हीच संकल्पना पुढे विमाविज्ञानाचा पाया मानली गेली. जीवन विमा, वर्षासन किंवा वार्षिकी (Annuity) याकरिता दीर्घकालीन विमा संरक्षणाची मागणी वाढल्यामुळे सतराव्या शतकात विमाविज्ञानास गणिताची अधिकृत शाखा म्हणून मान्यता मिळाली. पारंपरिक जीवनविम्यामध्ये रोगविषयक स्थिती, जीवन सारणी, मृत्यूविषयक माहिती व चक्रवाढ व्याज यावर आधारित विमापत्र, वार्षिकीपत्र (Annuity) व सावधी विमापत्र (Endowment Policy) तयार केली जात असे

विमाविषयक-सांख्यिकी : विमा काढणे ही जरी सर्वमान्य अशी प्रचलित गोष्ट असली तरी त्यामागील शास्त्र हे अतिशय गुंतागुंतीचे प्रकरण आहे. विमाविषयक सांख्यिकी हे शास्त्र मूलतः गणित, सांख्यिकी, अर्थशास्त्र आणि वित्त या चार या क्षेत्रांवर अवलंबून आहे. विमाक्षेत्रात सांख्यिकीचा भरपूर उपयोग होतो. त्यासाठी सांख्यिकीतील संभाव्यताशास्त्राचा अभ्यास उपयोगी ठरतो. त्याचप्रमाणे विमा कंपन्यांकडे किती पैसा असावा की जेणेकरून भविष्यात येणाऱ्या विमाधारकांच्या दाव्यांच्या परताव्याची रक्कम याचा अंदाज येणे आवश्यक असते.

विमासांख्यिकीचे मुख्यत्वेकरून दोन प्रकार पडतात. चेतन (जीवन) विमा सांख्यिकी आणि अचेतन (सामान्य) विमा सांख्यिकी (Non-life or General).

चेतन (जीवन) विमा सांख्यिकी : जीवन विमा मध्ये पॉलिसी घेतानाचे व्यक्तीचे वय ही सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते. जीवन विम्याचे हप्ते ठरविण्यासाठी माणसाच्या उर्वरित आयुष्याचे अनुमान काढून त्याप्रमाणे हिशेब करावा लागतो. कोणत्याही देशातील माणसाचे सरासरी आयुर्मान जरी लोकगणनेनुसार माहिती असले तरी प्रत्येक माणसाचे एकूण आयुर्मान हे चल स्वरूपात असते. विमाधारकांना अनेक प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध असतात. त्या त्या आवश्यकतेप्रमाणे त्या तयार केलेल्या असतात. उदाहरणार्थ, जीवन विमा पॉलिसीमध्ये ग्राहक विम्याचे मासिक अथवा वार्षिक हप्ते ( premium) आयुष्यभर देत राहतो. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विमाकंपनी त्याच्या वारसांना ठरलेली रक्कम देते. ही रक्कम अर्थातच आत्तापर्यंत पॉलिसिधारकाने भरलेल्या हप्त्याच्या रकमेपेक्षा बरीच जास्त असते. पॉलिसी काढल्यानंतर लगेच मृत्यू झाला तरी कंपनीला तेवढीच रक्कम वारसांना द्यावी लागते अथवा जर वीस वर्षांनी मृत्यू झाला तरी तेवढीच रक्कम द्यावी लागते. साहजिकच विमाकंपनीला या सर्व गोष्टींचा विचार करून हप्त्याची रक्कम ठरवावी लागते.

अचेतन (सामान्य) विमा सांख्यिकी : स्वास्थ्य विमा, प्रवास विमा, गृह विमा, वाहन विमा या सर्व विमा उत्पादनांचा अंतर्भाव या अचेतन विमा सांख्यिकी प्रकारात होतो. स्वास्थ्य विमा ही खूप गरजेची बाब झाली आहे. हृदयरोग, कर्करोग यासारख्या रोगांवरचे उपचार प्रचंड महागडे आणि सामान्य माणसाच्या हाताबाहेरचे असतात. तसेच ते दीर्घकाळ चालणारे असतात. याप्रकारच्या विमा संरक्षणामध्ये विमाधारकाला त्या त्या वर्षापुरते विम्याचे कवच लाभते. प्रवास विम्याच्या बाबतीत सुद्धा विमा कवच हे त्या प्रवासाच्या काळापुरते असते. प्रवासाच्या कालावधीत काही संकट आले तर त्या व्यक्तीला आर्थिक साहाय्य  मिळते. प्रवास संपल्यानंतर मात्र कोणतेही साहाय्य मिळत नाही. या प्रकारच्या विमा उत्पादनांना विशिष्ट मुदतीचा विमा (Term Insurance) असे संबोधले जाते.

विमाशास्त्रज्ञ : विमा कंपन्या ज्या तज्ञ माणसांना नेमतात त्यांना विमाशास्त्रज्ञ (Actuary) असे संबोधले जाते. गणितज्ञ नथॅनिएल बॉडिच (Nathaniel Bowditch) यांना अमेरिकेतील पहिले विमाशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. तर एल. एस. वैद्यनाथन (L. S. Vaidyanathan)  यांना भारतातील पहिले विमाशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांच्याच प्रयत्नातून राष्ट्रीयीकरणानंतर भारतीय विमा क्षेत्राचा विकास झाला. 21 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ‘Actuaries Day’ म्हणुन विमाक्षेत्रात साजरा केला जातो.

भारतात इन्स्टिट्यूट ऑफ अक्चुरीज ऑफ इंडिया (IAI- Institute of Actuaries of India)  ही संस्था लोकांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेच्या अभ्यासक्रमाचे आणि परीक्षा इत्यादी बाबत माहिती www.actuariesindia.org या संकेतस्थळावर मिळू शकते.

विमाशास्त्रज्ञांना आणि इतर विमा व्यावसायिकांना बाजारात मोठी मागणी आहे. वेगवेगळ्या विमाउत्पादनांविषयीचे आर्थिक धोके याबद्दलचे संख्याशास्त्रीय अनुमान बांधणे, या धोक्यांच्या वारंवारतेची संभाव्यता जोखणे इत्यादी कामांची गरज विमा कंपन्यांना भासते. सांख्यिकी हा विमाशास्त्राचा पाया आहे.

विमाशास्त्रज्ञांना या सर्व विमा उत्पादनांचे हप्ते, त्यांची वारंवारता ठरवावी लागते. ही सर्व आकडेमोड अतिशय गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असते. ती करताना विमाशास्त्रज्ञाला देशातील आर्थिक, वित्त, गणित आणि सांख्यिकी या विषयातील ज्ञान असणे आवश्यक ठरते.  त्याचबरोबर विमा कंपनी या तज्ञांची नेमणूक करत असल्याने कंपनीचे भले होईल अशी जागरूकता पण त्यांना ठेवावी लागते. प्रत्येक विमा उत्पादनाच्या बाबतीत भविष्यात केव्हा आणि किती प्रमाणात कंपनीला रक्कम द्यावी लागेल याचा बराचसा अचूक वेध घेणे जरूरीचे असते. त्याचबरोबर कंपनीचा इतर खर्च, नोकरदारांचे पगार, प्रशासकीय खर्च इत्यादींचा अंदाज बांधून त्यात कंपनीचा लाभांश मिळवून हा आकडा तयार करावा लागतो. विमाविषयक सांख्यिकी या शास्त्रात या सर्वांचा अंतर्भाव होतो.

संदर्भ :

• Bowers, N. L.; Gerber, H. U.; Hickman, J. C.; Jones, D. A.; Nesbitt , C. J. Actuarial Mathematics, 2nd Edn. Sahaumburg, 1997.

•Deshmukh, S. R. Actuarial Statistics: An Introduction Using, 2009.

• Harriett, E. J.; Dani, L. L. Principles of Insurance: Life, Health and Annuities, 2nd Edn., 1999.

• Neill, Alistair, Life Contingencies, 1977.

• Palande, P. S.; Shah, R. S.; Lunawat, M. L. Insurance in India – Changing Policies and Emerging Opportunities, New Delhi, 2003.

समीक्षक :  डॉ. संजीव सबनीस