स्कॉर्सेसी, मार्टिन : (१७ नोव्हेंबर १९४२). प्रसिद्ध प्रभावशाली अमेरिकन दिग्दर्शक, पटकथाकार, निर्माता आणि अभिनेता. त्याचे पूर्ण नाव मार्टिन मार्कअँटानियो ल्युसियानो स्कॉर्सेसी. त्याचा जन्म क्वीन्स, न्यूयॉर्क येथे झाला. त्याच्या लहानपणी त्याच्या कुटुंबियांनी मॅनहॅटन येथील लिटल इटली येथे स्थलांतर केले. तेथील कॅथलिक वातावरणाचा त्याच्या जीवनावर आणि चित्रपटकारकीर्दीवर मोठा प्रभाव पडला. तो लहान असताना त्याला दम्याचा आजार असल्याने इतर समवयस्क मुलांसोबत खेळण्याऐवजी तो कुटुंबासोबत इटालियन चित्रपट पाहायला जात असे. त्यावेळी नववास्तववादी चित्रपटसुद्धा त्याच्या पाहण्यात आले. त्यातूनच त्याचे चित्रपटाबद्दलचे आकर्षण वाढले. बायसिकल थिव्ह्ज, रोम, ओपन सिटी या लहानपणी पाहिलेल्या चित्रपटांचा प्रभाव त्याच्यावर असल्याचे मार्टिन सांगतो. त्याने वॉशिंग्टन स्क्वेअर महाविद्यालयामध्ये इंग्रजी विषय घेऊन पदवीचे शिक्षण घेतले (१९६४). पुढे न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये मास्टर ऑफ फाईन आर्ट्सची पदवी घेण्यासाठी दाखल असताना (१९६६) मार्टिनने काही लघुपट बनवले. त्यांतील द बिग शेव्ह  हा विनोदी लघुपट गाजला.

मार्टिन याने हूज दॅट नॉकिंग ऍट माय डोअर  हा पहिला चित्रपट हार्वी कायटेल आणि थेल्मा शूनमेकर यांच्यासोबत केला (१९६७). हा चित्रपट शिकागो चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला. प्रसिद्ध अमेरिकन दिग्दर्शक रॉजर कोरमान (Roger Corman) आणि जॉन कासाव्हेटस (John Cassavetes) हे त्याचे मार्गदर्शक. रॉजर कोरमान याच्या मार्गदर्शनाखाली मार्टिनने १९७३ मध्ये मीन स्ट्रीट्स  हा चित्रपट दिग्दर्शित केला. १९७६ मध्ये मार्टिनने टॅक्सी ड्रायव्हर  हा चित्रपट केला. याची कथा ट्रॅव्हिस बिकल या व्हिएतनामच्या युद्धावरून न्यूयॉर्कला परतलेल्या टॅक्सी ड्रायव्हरची आहे. मार्टिनच्या स्वत:च्या शैलीचे सर्व गुणधर्म तंतोतंत पाळणारा, हिंसेला नवीन रूप देऊ पाहणारा हा चित्रपट. हा चित्रपट यशस्वी झाला. यास ‘कान फिल्म फेस्टिवल’मध्ये पाम डी’ऑर हा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाच्या यशात पॉल श्रेडर या मार्टिनच्या विचारांशी साधर्म्य साधणाऱ्या लेखकाचा आणि प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रॉबर्ट डी निरोचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. यानंतर निर्मात्यांनी मार्टिनला १९७७ मध्ये न्यूयॉर्क, न्यूयॉर्क  ही खर्चिक निर्मिती असलेली संगीतिका करण्याची संधी दिली. मात्र हा चित्रपट पडला आणि मार्टिनची सर्व व्यावसायिक गणिते फसली. यातूनच पुढे मार्टिन अंमली पदार्थांचे सेवन आणि व्यसनाच्या आहारी गेला.

१९८० मध्ये रॉबर्ट डी निरो एक नवा विषय घेऊन मार्टिनकडे आला. जुन्या सर्व गोष्टीतून बाहेर पडून, मार्टिनने फारसा रस नसूनही रेजिंग बुल हा चित्रपट केला. कृष्णधवल निर्मिती, मंद चित्रगती, वैशिष्ट्यपूर्ण बॉक्सिंग खेळाचे चित्रण यामुळे हा चित्रपट यशस्वी ठरला. मानसिक संतुलन बिघडलेल्या एका बॉक्सरचा रिंगच्या आत आणि बाहेर सुरू असणारा समांतर प्रवास अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. हा चित्रपट ‘अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट’च्या सर्वोत्तम क्रीडापटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर तर सर्वोत्तम १०० चित्रपटांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतरच्या काळात मार्टिनने द किंग ऑफ कॉमेडी, आफ्टर आवर्स, द कलर ऑफ मनी  हे चित्रपट दिग्दर्शित केले. बऱ्याच वर्षांपासून मनात असलेले, धर्मसंस्थेबद्दलचे स्वत:चे विचार मांडण्यासाठी त्याने द लास्ट टेम्पटेशन ऑफ क्राईस्ट हा चित्रपट केला (१९८८).

मार्टिनची सर्व कारकीर्द लक्षात घेता १९९० मध्ये आलेला गुडफेलाज हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीचा सुवर्णमध्य आहे, असे मानले जाते. हा आजपर्यंतच्या सर्वोत्तम माफिया पटातील एक. हा चित्रपट हेन्री हिल आणि त्याच्या साथीदारांच्या आयुष्यावर आधारित असून या चित्रपटामध्ये तत्कालीन गुन्हेगारी विश्वाचे वर्णन खास मार्टिनच्या शैलीत दिसते. नंतरच्या काळात केप फिअर, द एज ऑफ इनोसन्स (१९९३) हे वेगळी वाट निवडणारे चित्रपट मार्टिनने केले. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला रॉबर्ट डी निरो सोबतचा कसिनो (१९९५) हा त्यावेळीचा सर्वाधिक हिंसक चित्रपट मानला गेला. या चित्रपटाला भरपूर व्यावसायिक यश मिळाले. याची पटकथाही त्यानेच लिहिलेली होती. मार्टिनने चार तासांचा अ पर्सनल जर्नी विथ मार्टिन स्कॉर्सेसी थ्रू अमेरिकन मुव्हीज नावाचा मुकपटांपासून ते १९६९ पर्यंतच्या अमेरिकी चित्रपट उत्क्रांतीचा आढावा घेणारा माहितीपट तयार केला आणि या माहितीपटाला समांतर असा माय व्हॉएज टू इटली  हा महत्त्वपूर्ण इटालियन चित्रपटांच्या उत्क्रांतीचा आढावा घेणारा माहितीपट केला. २००२ मध्ये हर्बर्ट ऍस्बरी यांच्या गॅंग्स ऑफ न्यूयॉर्क या माहितीपर पुस्तकावर आधारित डॅनियल डे लुईस आणि लिओनार्डो डीकाप्रिओ अभिनीत, पण कल्पित कथानक मांडणारा गॅंग्स ऑफ न्यूयॉर्क  हा नेत्रदीपक आणि तांत्रिक बाबींमध्ये सरस चित्रपट आला. त्यानंतर बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये लिओनार्डो डीकाप्रिओ आणि मार्टिन स्कॉर्सेसी ही द्वयी एकत्र दिसली.

मार्टिनने २००६ मध्ये द डिपार्टेड  हा चित्रपट केला. याचे वर्णन गुडफेलाज नंतरचा मार्टिनचा तेवढाच तोलामोलाचा चित्रपट असे केले जाते. अलन मॅक आणि फेलिक्स चाँग यांच्या इन्फर्नल अफेअर्सवर आधारित असलेला हा चित्रपट साऊथ बोस्टनमधील आयरिश गॅंगला संपवून स्वत:च वेगळें अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या आणि घराण्याच्या भूतकाळाशी झगडणाऱ्या कायदेरक्षकाची कथा मांडतो. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक,  पटकथा आणि संकलन असे चार अकादमी (ऑस्कर) पुरस्कार मिळाले.

मार्टिन २०१० मध्ये लिओनार्डोसोबत शटर आयलँड  नावाचा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, धक्कातंत्राचा वापर केलेला थरारपट घेऊन आला. २०११ मध्ये मार्टिनचा ह्युगो  नावाचा पहिला त्रिमितीय चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ५ अकादमी पुरस्कार मिळाले. २०१३ मध्ये आलेला द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट  हा जॉर्डन बेलफर्टच्या आयुष्यावरील चरित्रपट मार्टिनच्या दिग्दर्शनामुळे आणि लिओनार्डोच्या अभिनयामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. विनोदाची गडद छटा असलेला हा चित्रपट मार्टिनच्या कारकिर्दीतील सर्वात धाडसी आणि कमालीचा प्रयत्न मानला जातो. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला सायलेन्स  हा सुद्धा मार्टिनच्या धार्मिक विचारप्रक्रियेवर प्रकाशझोत टाकणारा, दोन मिशनरींच्या आपल्या गुरुंच्या शोधप्रवासावर आधारित होता.

याशिवाय मार्टिनने द लास्ट वॉल्ट्झ (१९७८), नो डिरेक्शन होम: बॉब डायलन (२००५), जॉर्ज हॅरिसन: लिविंग इन मटेरियल वर्ल्ड (२०११) असे माहितीपट सुद्धा केले. जॉर्ज हॅरिसन: लिविंग इन मटेरियल वर्ल्ड (२०११) हा माहितीपट ‘बीटल्स’ या जगप्रसिद्ध म्युझिक बँडमधील संगीतकार ‘जॉर्ज हॅरिसन’च्या आयुष्यावर आधारित आहे. या माहितीपटामध्ये जॉर्ज हॅरिसनच्या जाहीर कार्यक्रमांचे चित्रीकरण, खाजगी पत्रव्यवहार, वैयक्तिक चित्रफितींचा वापर केला आहे. याला सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे दोन एमी अवॉर्डस मिळाले.

मार्टिन स्कॉर्सेसीच्या शैलीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. एका सावकाश गतीने आणि वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी आरेखन यांचा मुक्तहस्ताने वापर करण्याच्या त्याच्या शैलीमुळे त्याचे चित्रपट नेहमीच वेगळे ठरले. त्याने हाताळलेल्या चित्रपटाच्या विषयांमध्ये त्याचा इटालियन-अमेरिकन संस्कृतीचा भूतकाळ डोकावतो. त्याचा चित्रपट स्वातंत्र्य, विश्वास, सामर्थ्य या संकल्पनांच्या व्याख्या नव्याने मांडू पाहत त्यावर भाष्य करतो. गुन्हेगारी विश्वाचे वास्तववादी दर्शन, अचानक उद्भवणारी,अंगावर येणारी हिंसा,विशिष्ट काळ उभा करण्याचे कसब आणि परिस्थितीने हतबल झालेल्या पात्रांच्या अंतरंगाचा शोध यांना त्याच्या चित्रपटात नियमित स्थान आहे..

मार्टिन स्कॉर्सेसी ५० वर्षाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. कोणाचेही पाठबळ नसताना, दर्जेदार कलाकृतींच्या जोरावर हॉलिवूडमध्ये स्वत:चे पाय घट्ट रोवून तो उभा आहे. १९९० मध्ये त्याने चित्रपट संवर्धनासाठी ‘द फिल्म फाउंडेशन’ची तर २००७ मध्ये ‘वर्ल्ड फिल्म फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. या संस्थांमार्फत भविष्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांसाठी जागतिक चित्रपटांचे संवर्धन, जुन्या, इस्टमन रंग फिकट होत जाणाऱ्या चित्रपटांचे जतन करण्याचे आणि चित्रपटीय भाषेचे ज्ञान दिले जाते.

मार्टिन स्कॉर्सेसीला अनेक पुरस्कार मिळाले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : १९७६ मध्ये टॅक्सी ड्रायव्हर  या चित्रपटासाठी कान फिल्म फेस्टिवलमध्ये पाम डी’ऑर पुरस्कार; १९९० मध्ये गुडफेलाजसाठी ‘बाफ्टा’चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार; २००२ मध्ये गॅंग्स ऑफ न्यूयॉर्कसाठी गोल्डन ग्लोबचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार; २००६ मध्ये द डिपार्टेड या चित्रपटासाठी ऑस्कर आणि गोल्डन ग्लोबचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन हा पुरस्कार; २०१० मध्ये ‘सेसिल बी डीमिल’ हा ‘गोल्डन ग्लोब’तर्फे मानद पुरस्कार; २०११ मध्ये ह्युगो या चित्रपटासाठी गोल्डन ग्लोबचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. २०११ मध्ये जॉर्ज हॅरिसन: लिविंग इन मटीरियल वर्ल्ड  या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे दोन ‘प्राईमटाईम एमी’ पुरस्कार मिळाले. २०१२ मध्ये ‘बाफ्टा फेलोशिप’ हा जीवनगौरव पुरस्कार बाफ्टातर्फे त्याला मिळाला.

समीक्षक : गणेश मतकरी