रणभूमी पुरातत्त्व हा संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेचा एक भाग आहे. विसाव्या शतकातील प्रमुख आणि निर्णायक लढायांच्या इतिहासाकडे (पहिले व दुसरे महायुद्ध) पुरातत्त्वीय पद्धतीने पाहण्याच्या संकल्पनेतून या शाखेची सुरुवात झाली; तथापि आधुनिक काळातीलच नव्हे तर प्राचीन व मध्ययुगीन काळातील लढायांचाही त्यात समावेश केला जातो. तसेच केवळ लढाईच नाही तर संपूर्ण युद्धामागची पार्श्वभूमी आणि सामाजिक व आर्थिक परिणाम यांसंबंधी ऐतिहासिक निष्कर्ष काढण्यासाठी पुरातत्त्वीय पुरावे वापरले जातात. म्हणूनच आता रणभूमी पुरातत्त्वाची व्याप्ती वाढून त्याचे युद्धांचे पुरातत्त्व (Archaeology of War) असे रूपांतर झाले आहे. या शाखेत प्रामुख्याने ऐतिहासिक युद्धांचा अभ्यास केला जात असल्याने एक प्रकारे रणभूमी पुरातत्त्व ही ऐतिहासिक पुरातत्त्वाची उपशाखा आहे, असे मानले जाते.

लिटल बिग रिव्हर लढाईच्या अवशेषांचे पुरातत्त्वीय उत्खनन.

एखाद्या लढाईचा रणभूमी पुरातत्त्वीय अभ्यास करताना त्या विशिष्ट लढाईत वापरलेली हत्यारे, शिरस्त्राणे, संरक्षक पोलादी मुखवटे, बंदुका, तोफा वगैरे ही पुरातत्त्वीय साधने असतात. जगभरात अनेक देशांमध्ये लढाईत कामी आलेल्या लोकांची दफनस्थळे हा रणभूमी पुरातत्त्वातील महत्त्वाचा पुरावा आहे. अशी साधने शोधताना धातूशोधकांचा उपयोग केला जातो. याखेरीज रणक्षेत्रात बनवलेले खंदक, बंकर, तटबंदी व इतर अडथळे, लष्करी वाहने, संपर्काची साधने यांचा भू-भौतिकी उपकरणांनी शोध घेतला जातो. सर्व अवशेषांची पारंपरिक पुरातत्त्वीय पद्धतीने तपशीलवार नोंदणी करून या विशिष्ट लढाईसंबंधी उपलब्ध लिखित साधनांच्या आधारे (सैनिकांची रोजनिशी, सेनापतींच्या नोंदी, पत्रव्यवहार, जमाखर्चाचे तपशील, नकाशे इत्यादी) निष्कर्ष काढले जातात. एखादी लढाई घडून गेल्यानंतर त्या रणभूमीची साफसफाई होणे किंवा त्या ठिकाणी विकासकामांमुळे पुरावे नष्ट होणे आणि मुळात लढाईचे क्षेत्र अथवा सैन्याचा तळ येथे अल्पकाळ मानवी वावर असणे, या सर्व मर्यादा निष्कर्ष काढताना लक्षात घेतल्या जातात.

रणभूमी पुरातत्त्वीय संशोधनाचा प्रारंभ एडवर्ड फिट्झगेराल्ड (१८०९ — १८८३) या हौशी इंग्लिश संशोधकांनी केला असल्याचे मानले जाते. पुरातत्त्वविद्येचा मुख्य हेतू पुराणवस्तू गोळा करणे होता, त्या काळी (१८४२ मध्ये) फिट्झगेराल्ड यांनी काही ठिकाणी उत्खनन केले. त्यांनी त्या वेळी प्रचलित पुरातत्त्वीय पद्धत वापरून इंग्लंडच्या इतिहासातील सुप्रसिद्ध नेस्बी लढाईची (१६४५) रणभूमी शोधून काढली होती. तसेच १९५८ मध्ये अमेरिकन लष्करी इतिहासकार डॉन रिकी (१९२५ — २०००) यांनी धातूशोधकांचा वापर केला होता. तथापि आधुनिक रणभूमी पुरातत्त्वीय संशोधनाची सुरुवात पीटर न्यूमन यांनी १९७०-१९८० या दशकात केली. त्यांनी १६४२ ते १६४६ या दरम्यान झालेल्या पहिल्या इंग्लिश यादवी युद्धातील सुप्रसिद्ध अशा मार्स्टन मूर लढाईच्या (१६४४) रणभूमीचा पुरातत्त्वीय पद्धतीने अभ्यास केला.

आधुनिक काळातील लढाईच्या पुरातत्त्वीय अभ्यासातून उपयुक्त माहिती मिळते, हे अमेरिकेच्या इतिहासातील कुप्रसिद्ध अशा लिटल बिग रिव्हर लढाईच्या (१८७६) संदर्भातील संशोधनातून ठळकपणे दिसून आले. आजच्या मोंटाना राज्यात घडलेल्या या लढाईत स्थानिक अमेरिकन इंडियन जमातींनी एकत्रितपणे जनरल कस्टर (१८३९ — १८७६) याच्या सातव्या घोडदळाचा संपूर्ण विनाश केला होता. या लढाईचे अनेक नवीन पैलू १९८९ मधील रणभूमी पुरातत्त्वीय अभ्यासामुळे कळून आले आहेत. जर्मनीतील ओस्नाब्रूक या गावाजवळ इ. स. ९ मध्ये अर्मिनियस याच्या आधिपत्याखाली जर्मन टोळ्यांनी रोमन सेनापती पब्लिकस क्विन्सिटिलियस वारस याच्या प्रचंड लष्कराचा पराभव केला. या भीषण लढाईच्या जागी अनेक शिरस्त्राणे, मुखवटे, भाले आणि शस्त्रांखेरीज नाण्यांसह अनेक वस्तू आढळून आल्या.

रणभूमी पुरातत्त्वीय संशोधनाचा पद्धतशीर आणि सर्वांगीण अभ्यासाचा पहिला प्रकल्प इंग्लंडमधील ब्रॅडफर्ड विद्यापीठाने १९९६ ते २००६ दरम्यान हाती घेतला. २९ मार्च १४६१ रोजी झालेल्या इंग्लंडच्या इतिहासातील सुप्रसिद्ध टोटनच्या लढाईत हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. या सैनिकांचे सामुदायिक दफन टोटन गावाच्या मध्यभागी आढळले होते. ब्रॅडफर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षण प्रकल्पात रणभूमीच्या विविध भागांचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास करण्यात आला आणि लढाईत मरण पावलेल्या लोकांबद्दल निष्कर्ष काढले गेले.

एखाद्या लढाईच्या संदर्भात ती लढाई, अथवा युद्धाचे समर्थन करणारी वर्णने ही दोन्ही अथवा लढणार्‍या सर्व पक्षांच्या भूमिकांनुसार वेगवेगळी असतात. अशा वेळी प्रत्यक्ष लढाईत काय घडले, याचे अधिक वस्तुनिष्ठ पुरावे रणभूमी पुरातत्त्वातून मिळतात. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात १९४३ मध्ये पोलंडमधील ’कात्यिन रानात’ (Katyn Woods) ४५०० पोलिश सैनिकांचे हत्याकांड झाले. तेथे त्यांचे सामूहिक दफन आढळल्यानंतरचा वादविवाद हे याचे उत्तम उदाहरण आहे. नाझी जर्मनीने यासाठी तत्कालीन सोव्हिएत महासंघाला जबाबदार धरले, तर सोव्हिएत महासंघाने जर्मनीला दोषी ठरवले. या कुप्रसिद्ध कात्यिन हत्याकांडामधील घटनाक्रमाचा उलगडा २००२ मधील रणभूमी पुरातत्त्वीय संशोधनामुळे झाला आणि या हत्याकांडाचा सोव्हिएत फौजेशी संबंध होता, हे स्पष्ट झाले.

रणभूमी पुरातत्त्वाच्या अनुषंगाने रणभूमी हे वारसास्थळ म्हणून जतन करावे, अशी कल्पना आता पुढे आली आहे. तसेच रणभूमी पुरातत्त्वीय स्थळांकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. जगभर अनेक देशांमध्ये रणभूमी वारसास्थळे युद्धस्मारक अथवा प्रत्यक्ष रणभूमीच्या ठिकाणी असणारे संग्रहालय या स्वरूपाची आहेत. परंतु रणभूमी पुरातत्त्वीय अभ्यासाचा अथवा तशा वारसास्थळांचा दुरूपयोग होऊ शकतो, ही गोष्ट अनेक अभ्यासकांनी दाखवून दिली आहे. इ. स. ९ मध्ये जर्मन टोळ्यांनी प्रचंड रोमन सैन्याचा पराभव केल्याची घटना नाझी काळात त्यांच्या विचारधारेचा प्रसार करणार्‍या प्रचारात ठळकपणे वापरण्यात आली होती. अलीकडच्या काळात सर्बिया व भूतपूर्व यूगोस्लाव्हिया यांच्यात १९९१ ते २००१ दरम्यान भीषण संघर्ष झाला. या काळात युद्धगुन्हे केल्याचा आरोप असलेले सर्बियाचे तत्कालीन अध्यक्ष स्लोबोदन मिलोश्लेविच (१९४१—२००६) यांनी सर्बियन लोकांना भडकवण्यासाठी सन १३८९ मधील कोसोवो लढाईचा प्रचारात वापर केला. असा दुरूपयोग अथवा त्यांचा भावना भडकवण्यासाठी होणारा वापर टाळण्यासाठी रणभूमी वारसास्थळावर कोणत्याही एका पक्षाचे अवाजवी उदात्तीकरण आणि हिंसक घटनांचे अतिरंजित वर्णन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. तसेच रणभूमी वारसास्थळ हा नकारात्मक वारसा असल्याने ते मनोरंजनाचे स्थान नाही, हे लक्षात घेऊन पुरातत्त्वीय वस्तूंची मांडणी करणे गरजेचे असते.

संदर्भ :

  • Carman, J. ‘Battlefields as cultural resources’, Post-Medieval Archaeology, 39,: 215-223, 2005.
  • Foard, G. & Morris, R. The Archaeology of English Battlefields : Conflict in the Pre-Industrial Landscape,  York : Council for British Archaeology, 2012.
  • Freeman, P. W. & Pollard, T. Eds., Fields of Conflict : Progress and Prospect in Battlefield Archaeology, Oxford, 2001.
  • Newman, P. R. & Roberts, P. R.  Marston Moor 1644 : The Battle of the Five Armies, Pickering : Blackthorn, 2003.
  • Saunders, Nicolas, ‘Excavating memories : archaeology and the great war: 1914-2001’, Antiquity, 76: 101-108, 2002.

                                                                                                                                                                                   समीक्षक : सुषमा देव