दिशा, उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू (अधोबिंदू) :
आकाश निरीक्षण करतांना आपला प्रथम संबंध ‘दिशा’ या संकल्पनेशी येतो. आकाश निरीक्षण करताना आपण उभ्या असलेल्या ठिकाणाहून उत्तर दिशा कोठे येते याचे भान असणे अतिशय महत्त्वाचे ठरते. रात्रीच्या आकाशातले काही तारे आपल्याला उत्तर दिशा ठरविण्यास मदत करतात. ‘ध्रुवतारा’ (Polaris; Alpha Ursa Minoris) दिसल्यावर उत्तर दिशा सापडते. परंतु ध्रुवतारा हा काही चटकन ओळखता येईल, असा फारसा ठळक तारा नाही. ध्रुवतारा शोधण्याची एक युक्ती आहे. एकतर तो सप्तर्षी (Ursa Major Constellation) तारकासमूहावरून ओळखता येतो, नाही तर शर्मिष्ठा (Cassiopeia Constellation) तारकासमूहावरून ओळखता येतो. या दोन तारकासमूहांपैकी एकतरी तारकासमूह रात्रीच्या आकाशात नेहमीच असतो. सप्तर्षी तारकासमूहात सात ठळक तारे आहेत. हे तारे काल्पनिक रेषांनी जोडले, तर त्यांचा आकार काहीसा पतंगासारखा होतो. चार ताऱ्यांनी बनलेला शंकरपाळ्याच्या आकाराचा पतंग आणि त्याला लगत तीन ताऱ्यांची शेपटी. या पतंगाच्या पहिल्या दोन ठळक ताऱ्यांमध्ये जे अंतर दिसते, त्याच्या साधारण साडेपाच पट अंतरावर, त्याच सरळ रेषेत पाहत गेलो तर आपण ध्रुवताऱ्यापाशी पोहोचतो.
शर्मिष्ठा तारकासमूहाचा काल्पनिक आकार पाच ठळक ताऱ्यांनी बनलेला आहे. या ताऱ्यांनी इंग्रजी ‘एम्’(M) सारखी आकृती तयार करता येते. यातल्या पहिल्या तीन ताऱ्यांचा एक समभुज त्रिकोण बनतो, तर त्याला लगतचा त्रिकोण मात्र विशालकोन त्रिकोण बनतो. या ‘एम्’आकारातला तिसरा आणि चौथा तारा कल्पनेने जोडायचा. या जोडरेषेला कल्पनेने एक लंबदुभाजक (Perpendicular bisector) काढायचा, म्हणजे त्या त्रिकोणाच्या छोट्या रेषेच्या मध्यातून काटकोनात जाणारी एक रेषा काढायची. ही लंबरेषा आपल्याला थेट ध्रुवताऱ्याशी आणून सोडते. सप्तर्षी आणि शर्मिष्ठा या दोनही तारकासमूहांवरून आपण ज्या रेषांची कल्पना करतो, त्या जागेमध्ये ध्रुवताऱ्यापेक्षा अधिक ठळक असा दुसरा कोणताही तारा नाही. म्हणूनच ही युक्ती उपयोगी ठरते.
आपण उत्तरेकडे म्हणजे ध्रुवताऱ्याकडे तोंड करून उभे राहिलो, तर आपल्या बरोबर पाठीमागे येते ती दक्षिण दिशा. आपल्या उजव्या हातास येते ती पूर्व दिशा आणि डाव्या हातास येते ती पश्चिम दिशा.
या चार मुख्य दिशांखेरीज लगतच्या दोन दिशांच्या बरोबर दरम्यान येतात त्यांना ‘उपदिशा’ म्हणतात. मराठीत त्या दिशांना स्वतंत्र नावे आहेत. (या उपदिशांना इंग्रजीत स्वतंत्र नावे नाहीत.) उत्तर आणि पूर्व या दरम्यान येते ती ईशान्य (North-East) पूर्व आणि दक्षिण यांच्या दरम्यान येते ती आग्नेय (South-East) दक्षिण आणि पश्चिम यांच्या दरम्यान येते ती नैऋत्य (South-West) आणि पश्चिम आणि उत्तर यांच्या मधील उपदिशा वायव्य (North-West). आपल्याकडे दश-दिशा असे म्हणण्याचा एक प्रघात आहे. वर दिलेल्या आठही दिशा क्षितिजावर दर्शविण्यात येतात. तर ‘वरच्या दिशेला – उर्ध्व’ आणि ‘पायाखाली असलेली – अधर’ यांचा समावेश वरील आठ दिशांसोबत केला जातो. त्यामुळे एकूण दिशा दहा होतात.
उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू किंवा अधोबिंदू : ‘अध: बिंदू’पेक्षा ‘अधोबिंदू’ ही संज्ञा उच्चारायला सोपी पडते म्हणून अधिकतर ती वापरली जाते. आपण मोकळ्या मैदानात उभे राहिलो की आकाशगोलाची (Celestial Sphere) कल्पना आपल्याला जाणवते. या आकाशगोलाचा, ‘ख’ गोलाचा अर्धा भाग क्षितिजावर असतो, जो आपल्याला दिसतो. आकाशगोलाचा, ‘ख’ गोलाचा अर्धाभाग जमिनीखाली असतो, जो दिसत नाही, पण आपण त्याची कल्पना करू शकतो. क्षितिजावरच्या भागातील आकाशस्थ वस्तू आपल्याला दिसतात. आकाश गोलाचा उर्वरित अर्धा भाग क्षितिजाखाली असतो. ह्या भागातील आकाशस्थ वस्तू आपणास दिसत नाहीत. आकाशगोलाच्या दृश्य भागातील आपल्या बरोबर डोक्यावर (क्षितिजाच्या प्रतलाला आपल्या स्थानावरून काढलेल्या लंब रेषेत वर) येणाऱ्या बिंदूला ‘ऊर्ध्व बिंदू’ (Zenith) असे म्हणतात. (यालाच खस्वस्तिक, खमध्य, अशा संज्ञाही पूर्वी वापरात होत्या.) या ऊर्ध्वबिंदूच्या 180 अंशात (क्षितिजाला काढलेली ही लंबरेषा जमिनीखाली वाढवली असता ती ‘ख’ गोलाला जिथे पोहोचेल तिथे) बरोबर खाली येणारा आकाशगोलावरील बिंदू म्हणजे ‘अध:बिंदू’ किंवा ‘अधोबिंदू’ (Nadir). हा आकाशगोलाच्या क्षितिजाखालील अर्धगोलात असल्यामुळे तो आपल्याला कधीच दिसत नाही. उलट ऊर्ध्वबिंदू (Zenith) आपण नेहमीच पाहू शकतो. हे दोनही बिंदू मध्यमंडल आणि सममंडलाचे छेदनबिंदू असतात.
समीक्षक : आनंद घैसास