दिगंश :

दिक्‌ + अंश = दिगंश (दिशात्मक अंश), स्थानिक / क्षितिज सहनिर्देशक पद्धतीमधील (Horizon system) दिगंश (Azimuth) आणि उन्नतांश (Altitude) हे दोन सहनिर्देशक (Coordinates) आहेत. दिगंश हे अंशात्मक माप आहे. दिगंशला ‘क्षित्यंश’ असेही म्हणतात.

आकृतीत आकाशगोल (Celestial sphere) दाखविला आहे. N—E—S—W हे वर्तुळ म्हणजे निरीक्षकाचे क्षितीज (Horizon) आहे. या वर्तुळाच्या केंद्रस्‍थानी  C या बिंदूपाशी निरीक्षक उभा आहे (असे समजा). निरीक्षकाच्या थेट लंबरेषेत आकाशात वर Z  हा बिंदू आहे. या बिंदूला ‘ऊर्ध्वबिंदू’ म्हणतात. या बिंदूतून जाणाऱ्या N—Z—S या वर्तुळास सममंडल, मध्यमंडल किंवा =>‘याम्योत्तरवृत्त’ (Meridian) म्हणतात. यामुळे आकाशाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग होतात. क्षितिजावरील N, E, S, आणि W हे बिंदू अनुक्रमे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशा दर्शवितात. या चार बिंदुंपैकी कोणत्याही दोन लगतच्या बिंदुंमध्ये 90 अंशाचे अंतर आहे. स्‍थानिक सहनिर्देशक पद्धतीमध्ये N हा आदिबिंदू किंवा संदर्भबिंदू (Reference point) धरला जातो. या संदर्भबिंदूपासून म्हणजे उत्तरेकडून पूर्वेकडे (घड्याळ्‍याच्या काट्याच्या दिशेने) जात 0 अंशापासून 360  अंशापर्यंत, म्हणजे N  येथे परत उत्तरेला येईपर्यंत मोजलेले अंशात्मक अंतर म्हणजे दिगंश किंवा क्षित्यंश होत (कधीही उत्तरेकडून उलट दिशेने पश्चिमेकडून पुढे जात नाही). समजा आकृतीमधील निरीक्षकाला आकाशाच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात X  हा तारा दिसत आहे. Z बिंदूपासून ताऱ्यातून जाणारे => ऊर्ध्वमंडल (Vertical circle) क्षितिजाला A  या बिंदूत छेदते. म्हणून क्षितिजावरील N—E—A  या अंशात्मक अंतरास X ताऱ्याचे दिगंश म्हणतात. आकृतीत दाखविलेल्या X  ताऱ्याचे दिगंश 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी आहेत हे लक्षात येईल.

उपदिशांचे दिगंश: पूर्व आणि दक्षिण यांच्या दरम्यानची दिशा ‘आग्नेय’ म्हणून आग्नेय दिशेचे दिगंश (90 + 45) म्हणजे 135 अंश आहेत. दक्षिण आणि पश्चिम यामधील उपदिशा नैऋत्य. पश्चिम आणि उत्तर यामधील उपदिशा वायव्य तसेच उत्तर व पूर्व यामधील उपदिशा ईशान्य. या उपदिशांचे दिगंश अनुक्रमे 225, 315, आणि 45  अंश असतील.

समीक्षक : आनंद घैसास