सममंडल : क्षितिजावर चार मुख्य दिशा दर्शविणारे बिंदू ( N, E, S, W ) आपल्याला माहीत आहेत. NZS हे याम्योत्तरवृत्त (Meridian) किंवा मध्यमंडल आहे. निरीक्षकाचे स्थान पूर्वेस किंवा पश्चिमेस बदलले, तर निरीक्षकाचे मध्यमंडलही बदलेल. निरीक्षक सापेक्ष मध्यमंडल बदलले तरी विशिष्ट निरीक्षकासाठी एकच मध्यमंडल असते. या मध्यमंडलास Z बिंदूत काटकोनात छेदणारे EZW हे वर्तुळ दाखविले आहे. या वर्तुळालाच सममंडल (Prime vertical) असे म्हणतात. हा शब्द अर्थवाही आहे. मंडल म्हणजे वर्तुळ आणि सम म्हणजे समान भाग करणारे. EZW या वर्तुळाने आकाशगोलाचे (Celestial Sphere) उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग केले आहेत म्हणून हे सममंडल.
याम्योत्तरवृत्ताला Z बिंदूत काटकोनात छेदणारे हे वर्तुळ पूर्व आणि पश्चिम या दिशादर्शक बिंदूतूनही जाते, म्हणून या वर्तुळाला ‘पूर्वापरवृत्त’ असेही म्हणतात. येथे पूर्व आणि अपर म्हणजे पूर्वेपेक्षा वेगळी (पश्चिम) म्हणून पृर्वापरवृत्त. याम्योत्तरवृत्ताप्रमाणेच सममंडलही निरीक्षक सापेक्ष बदलेल, पण विशिष्ठ निरीक्षकासाठी तेच राहील. आकाशात पूर्व क्षितिजावर उगवून पश्चिम क्षितिजाकडे प्रवास करणाऱ्या प्रत्येक वस्तूला याम्योत्तरवृत्त ओलांडावेच लागते. तसे सममंडलाचे होत नाही. काही ठराविक आकाशस्थ वस्तूच सममंडलावर येऊ शकतील. त्यासाठी आकाशस्थ वस्तूने दोन अटी पाळल्या पाहिजेत.
१) त्या वस्तूची क्रांति (Declination) निरीक्षकाच्या अक्षांशाएवढी (Latitude) किंवा त्यापेक्षा कमी असावी.
२ ) वस्तूची क्रांति आणि निरीक्षकाचे अक्षांश एकाच दिशेचे असावेत.
उदाहरणार्थ: – मुंबईचे अक्षांश १९ अंश उत्तर ( + १९ अंश ) आहेत. या ठिकाणच्या निरीक्षकासाठी ज्या आकाशस्थ वस्तूची क्रांति ० ते १९ अंश उत्तर यांच्या दरम्यान आहे किंवा १९ अंश उत्तर आहे तीच वस्तू सममंडलावर येईल. १९ अंश उत्तर क्रांती असलेला तारा ऊर्ध्व (Z) बिंदूपाशी येईल तेव्हाच तो सममंडलावर असेल. अर्थात याम्योत्तरवृत्तावरही असेल.
ज्याची क्रांति १९ अंश उत्तरपेक्षा कमी आहे असा तारा किंवा ग्रह मुंबईच्या निरीक्षकासाठी मध्यमन्डलावर येण्यापूर्वी आणि मध्यमंडल ओलांडून पुढे गेल्यानंतर असा दोन वेळेस मध्यमंडलावर येईल. असा एखादा ग्रह (Planet) किंवा तारा (Star) किती उन्नतांशावर (Altitude) असताना सममंडलावर येईल, तसेच तो सममंडलावर येईल तेव्हा त्याचे कालांश (Hour Angle) किती असतील, या दोन गोष्टी निरीक्षकाचे अक्षांश आणि सम्बन्धित ताऱ्याची क्रांति यावर अवलंबून असतील.
दक्षिण गोलार्धातील निरीक्षकाच्या दृष्टीनेही आकाशस्थ वस्तू सममंडलावर येऊ शकेल, मात्र वर सांगितलेल्या अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे.
समीक्षक : आनंद घैसास