आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती :
आकाशगोलावरील वस्तूंच्या या स्थाननिर्देशक पद्धतीत ‘आयनिकवृत्त’ (Ecliptic) हे संदर्भ वर्तुळ आणि वसंत संपात बिंदू हा आरंभ बिंदू असतो. ग्रह, सूर्य, चंद्र इत्यादी आकाशस्थ वस्तूंचे स्थान आयनिकवृत्तावर कोठे आहे, हे दर्शविण्यासाठी ‘भोग’ (Longitude) हा सहनिर्देशक वापरतात. वसंत संपातापासून आयनिक वृत्तावर पूर्वेकडे मोजलेले अंशात्मक अंतर म्हणजे भोग. खस्थ वस्तूचे स्थान आयनिकवृत्ताच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस किती अंशांवर आहे, हे ‘शर’ (Latitude) या निर्देशकाने कळते. इ.स. २००० च्या वसंत संपात बिंदूच्या संदर्भाने ‘मघा’ (रेग्युलस; Regulus; Alpha Leonis) ताऱ्याचे स्थान आयनिक पद्धतीप्रमाणे: भोग १५० अंश, ५७ मिनिटे, ६ सेकंद, आणि शर (+) ० अंश, २७ मिनिटे ५६ सेकंद आहे. यावरून मघा हा तारा आयनिकवृत्ताच्या उत्तरेस फार दूर नाही, असे लक्षात येईल. शर उत्तर की दक्षिण हे अनुक्रमे (+) धन आणि (-) ऋण चिन्हाने दाखवण्याचा संकेत आहे. भारतातील काही पंचांगे सूर्य, चंद्र, ग्रह, राहू आणि केतु यांचे दररोजचे भोग आणि शर देतात.
आयनिकवृत्त हा सूर्याचा पृथ्वीवरून दिसणारा आकाशमार्ग असल्यामुळे सूर्याचा शर नेहमीच ० अंश असतो. ग्रहांचे सूर्याभोवती होणारे कक्षीय परिभ्रमण आयनिकवृत्ताच्या पातळीत होत नाही. ग्रहांच्या कक्षापातळ्या आयनिकवृत्ताला छेदतात. त्यामुळे ग्रहाच्या कक्षेचा आयनिकवृत्ताशी होणारा कोन त्या त्या ग्रहाची कमाल शर मर्यादा ठरवितो. ग्रहमालिकेतील बुध (Mercury) ते नेपच्यून (Neptune) या ग्रहांपैकी युरेनस (Uranus) या ग्रहाच्या कक्षेचा आयनिकवृत्ताशी होणारा कोन सर्वात कमी ०.७७ अंश म्हणजे १ अंशाहूनही कमी आहे. तर बुधाच्या कक्षेचा आयनिकवृत्ताशी होणारा कोन सर्वात जास्त म्हणजे ७ अंशांचा आहे.
चंद्राची कक्षा आयनिकवृत्ताच्या पातळीशी सुमारे ५ अंशांचा कोन करते, त्यामुळे चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस ० ते ५ अंशांच्या मर्यादेत असू शकतो. त्यामुळे प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण (Solar Eclipse) किंवा प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण ( Lunar Eclipse) होत नाही.
समीक्षक : आनंद घैसास.