सूर्यग्रहणसूर्यग्रहण अमावास्येला होते. अमावास्येचा क्षण म्हणजे सूर्य-चंद्र युतीचा क्षण असतो. आयनिकवृत्ताच्या संदर्भात बोलायचे तर त्याक्षणी सूर्य आणि चंद्र यांचे भोग (longitude) समान असतात. त्यामुळे पृथ्वी आणि सूर्य यांची केंद्रे जोडणाऱ्या रेषेवर पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान चंद्र येऊ शकतो. मात्र चंद्राची कक्षा आयनिकवृत्ताशी सुमारे 5 अंशाचा कोन करीत असल्यामुळे अमावास्येच्या क्षणी सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या एकाच बाजूस असले, तरी, सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस चंद्र असू शकतो. या कारणामुळे प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही. चंद्राची कक्षा आयनिकवृत्ताला दोन बिंदूत छेदते. या छेदनबिंदूंना पातबिंदू (nodes) असे म्हणतात.  सूर्य यापैकी एका पातबिंदूजवळ असतांना अमावास्या झाली, तर चंद्रबिंब सूर्यबिंबाला अंशत: किंवा पूर्णपणे झाकू शकते. यावरून सूर्यग्रहणाचे खंडग्रास सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण इ. प्रकार होतात. सूर्यग्रहणात सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असतो. त्यामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश चंद्रामुळे अडला जातो आणि चंद्राच्या दोन प्रकारच्या सावल्या (shadows) पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. एक असते विरळ सावली (Penumbra) आणि दुसरी असते गडद सावली (Umbra). यांना उपछाया (Penumbra) आणि प्रच्छाया (Umbra) असेही काही ठिकाणी संबोधतात. पृथ्वीच्या ज्या भागावर विरळ सावली पडते, तेथील निरीक्षकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. गडद सावली ज्या भागावर पडते, त्या भागात खग्रास ग्रहण (Total Eclipse) दिसते.  विरळ सावलीची त्रिज्या सुमारे 3,000 किमीच्या आसपास असल्यामुळे खंडग्रास ग्रहण पृथ्वीच्या जास्त भागातून दिसते. गडद सावलीची जास्तीत जास्त रुंदी 250 किमी असू शकते. त्यामुळे पृथ्वीवरील फारच थोडा प्रदेश खग्रास ग्रहणाच्या टप्यात येतो. पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे असतो (म्हणजे जेथे दिवस असतो) तो संपूर्ण भाग चंद्रसावलीने झाकला जात नाही. जेथे दिवस असतो, पण चंद्राची विरळ सावलीही जेथे पडत नाही, अशा प्रदेशातही सूर्यग्रहण दिसत नाही. जेथे विरळ सावली पडते तेथे मात्र खंडग्रास ग्रहण दिसते. गडद सावली पडते तेथे खग्रास सूर्यग्रहण दिसते. प्रत्येक ग्रहणात विरळ सावली पृथ्वीवर पडू शकते, पण चंद्राच्या बदलत्या अंतरामुळे गडद सावली पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतेच असे नाही. असे घडल्यास खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणाचा स्पर्श (first contact) नेहमी सूर्यबिंबाच्या पश्चिम बाजूकडून होतो आणि मोक्ष (Last Contact) पूर्व बाजूकडे होतो.

चंद्राची सावली पृथ्वीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकते. यामुळे सर्वच निरीक्षकांच्या दृष्टीने स्पर्शवेळ (first contact) व मोक्षवेळ (last contact) समान असत नाही. स्पर्श ते मोक्ष हा कालावधी जास्तीत जास्त चार तास असतो. प्रत्येक वर्षी किमान दोन सूर्यग्रहणे होतातच. एखाद्या वर्षी सूर्यग्रहणांची कमाल संख्या 4 किंवा 5 असू शकते.

थोडक्यात सूर्यग्रहण होण्यासाठी अमावास्या असणे आणि सूर्य पातबिंदूजवळ असणे या दोन गोष्टी आवश्यक आहेत. सूर्य आणि चंद्र यांची बिंबे पुरेशी मोठी असल्यामुळे सूर्य अगदी पातबिंदूवरच असला पाहिजे असे नाही. पातबिंदूपासून सूर्याचे अंतर (भोग) 15 अंश 21 कला यापेक्षा कमी असेल तर सूर्यग्रहण होतेच. सूर्य आणि पातबिंदू यामधील अंतर 15 अंश 21 कला  ते 18 अंश 31 कला यांच्या दरम्यान असेल तर सूर्यग्रहण होण्याची शक्यता असते. तर हे अंतर 18 अंश 31 कलांपेक्षा जास्त असेल, तर सूर्यग्रहण होऊ शकत नाही.

 समीक्षक : आनंद घैसास