निरपेक्ष प्रत :

दृश्य प्रत म्हणजे अवकाशस्थ वस्तूची पृथ्वीवरून दिसणारी तेजस्विता. परंतु दिसणाऱ्या तेजस्वितेवरून ताऱ्याची खरी तेजस्विता कळू शकत नाही. एखादा तारा खूप तेजस्वी असला तरी तो आपल्यापासून खूप दूर अंतरावर असल्यामुळे अंधुक दिसेल, तर एखादा सामान्य तारा तुलनेने जवळ असल्यामुळे तेजस्वी दिसेल.  यावर उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी ताऱ्याची ‘निरपेक्ष प्रत’ ही संकल्पना तयार केली. निरपेक्ष प्रत म्हणजे अवकाशस्थ वस्तूची आपल्यापासून १० पार्सेक (parsec) म्हणजे ३२.६ प्रकाशवर्ष अंतरावरून दिसणारी  दृश्य प्रत. कल्पना करा की कोणतेही तारे जर पृथ्वीपासून दहा पार्सेक अंतरावर आणून ठेवले, तर ते तारे पृथ्वीवरून ज्या प्रतीचे दिसतील, ती त्या ताऱ्याची निरपेक्ष प्रत असेल.

निरपेक्ष प्रतीवरून ताऱ्यांची खरी तेजस्विता म्हणजे दीप्ती कळू शकते. निरपेक्ष प्रत आणि दृश्य प्रत यांचा वापर करून खगोलशास्त्रज्ञ ताऱ्यांची अंतरे मोजू शकतात. तसेच ताऱ्याची दृश्य प्रत आणि अंतर माहीत असेल, तर त्याची निरपेक्ष प्रत किती तेही काढता येऊ शकते. थोडक्यात सांगायचे तर निरपेक्ष प्रत ही संकल्पना खगोल भौतिकशास्त्रात ताऱ्यांची दीप्ती ठरवताना खूप महत्त्वाची समजली जाते.

सूर्याची दृश्य प्रत जरी -२६.७ असली तरी त्याची निरपेक्ष प्रत + ४.८ आहे. यावरून असेही लक्षात येते की सूर्य हा एक सर्वसामान्य तेजस्वितेचा तारा आहे. हंस ताऱ्याची दृश्य प्रत जरी +१.२५ असली, तरी त्याची निरपेक्ष प्रत -८.४ आहे. अर्थात प्रत्यक्षात त्याची दीप्ती सूर्याच्या तुलनेत अनेक पटीनी अधिक आहे.

दृश्य प्रत किंवा निरपेक्ष प्रत सांगताना ० ते +१…+२.. +३… या संख्या अंधुकपणा वाढवत जाणाऱ्या किंवा तेजस्विता कमी होत जाणाऱ्या असतात, तर ० ते -१…-२… -३ अशा संख्या तेजस्विता वाढवत जाणाऱ्या असतात.

समीक्षक : आनंद घैसास