अमावास्या :

                      ग्रहणाचे प्रकार

चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावरून परावर्तित झाल्यामुळे आपल्याला चंद्र प्रकाशित दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करीत असतो. खरे तर पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही एकमेकांसोबत फेरी घेत सूर्याभोवती फिरत आहेत. चंद्राच्या परिभ्रमणातील त्याच्या पृथ्वीच्या संदर्भात असणाऱ्या विविध स्थानांमुळे त्यावर पडणाऱ्या प्रकाशित भागाचेच दर्शन आपल्याला होत असते. त्यामुळेच आपल्याला चंद्राच्या विविध कला दिसतात. जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो त्या स्थितीला अमावास्या, तर जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते त्या स्थितीला आपण पौर्णिमा म्हणतो. चंद्राच्या सातत्याने होणाऱ्या चलनातील पौर्णिमा किंवा अमावास्या हे दोन्ही एक विशिष्ट स्थिती येणारे क्षण आहेत. या स्थिती दिवसाच्या २४ तासात कधीही येऊ शकतात. त्यामुळे पौर्णिमेचा किंवा अमावास्येचा (त्या तिथीचा) कालावधी नेहमी वेगळ्या वेळी सुरू होतो आणि वेगळ्या वेळी संपतो. हे आपल्याला पंचांगावरून समजू शकते. जर सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा (चंद्राच्या स्थितीनुसार; तिथीनुसार) असेल, तर तो दिवस पौर्णिमेचा आहे असे समजतात. जर सूर्योदयाच्या वेळी अमावास्या (चंद्राच्या स्थितीनुसार; तिथीनुसार) असेल, तर तो दिवस अमावास्येचा आहे असे समजतात.

अमावास्या म्हणजे चंद्राची शेवटची, न दिसणारी कला होय. अमा म्हणजे एकत्र आणि वास्य म्हणजे वास्तव्य, राहणे. या दिवशी चंद्र व सूर्य एकाच नक्षत्रात वास्तव्य करतात, म्हणून त्या तिथीला, या दिवसाला अमावास्या असे संबोधले जाते. अमावास्येच्या दिवशी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असतो, शिवाय सूर्य आणि चंद्र दोघांचे उदय व अस्त साधारणत: एकाच वेळेस होतात.

                                       सावल्या

अमावास्या स्थितीमध्ये चंद्राच्या पृथ्वीच्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठभागावर सूर्यकिरण पडत असल्यामुळे आणि या वेळी चंद्राचा पृथ्वीकडील भाग अप्रकाशित, सावलीत असल्यामुळे, चंद्र आपल्याला दिसत नाही. शिवाय चंद्र हा सूर्यासोबत असल्याने दिवसाच्या प्रकाशात तो अप्रकाशित चंद्र दिसणे शक्यच नसते. ज्या अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत अनुक्रमे येतात, तेव्हा आपल्याला सूर्यग्रहण दिसणे शक्य असते.

चंद्रकला

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर व आकार यामध्ये एक विलक्षण आश्चर्य दडलेले आहे. पृथ्वीपासून चंद्र जितक्या अंतरावर आहे, त्याच्या सुमारे ४०० पट अंतरावर सूर्य आहे आणि चंद्राच्या आकारापेक्षा सूर्याचा आकार देखील सुमारे ४०० पट आहे. यामुळे आपल्याला सूर्यबिंब आणि चंद्रबिंब हे साधारण सारख्याच आकाराचे दिसते आणि म्हणूनच सूर्यग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. खरे तर पातबिंदूवर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ही सावली जिथे पडते, त्या भागातूनच आपल्याला सूर्यग्रहण दिसते. चंद्राची सावलीही मध्यभागात गडद तर त्याच्या सभोवती विरळ असते. या मधल्या गडद सावलीतून चंद्रबिंबाने सूर्यबिंब पूर्ण झाकलेले दिसते, त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. तर आजूबाजूच्या विरळ सावलीतून खंडग्रास ग्रहण दिसते. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो आणि त्यामुळे तो कधी पृथ्वीच्या जवळ असतो, तर कधी लांब असतो. तो जेव्हा पृथ्वीपासून लांब असतो, तेव्हा तो सूर्यबिंबाला पूर्ण झाकू शकत नाही. कारण लांब गेल्याने त्याचे दृश्यबिंब आकाराने लहान होते. त्यामुळे काही ग्रहणात सूर्यबिंबाची बांगडीसारखी तेजस्वी कड झाकली जात नाही, ती दिसत राहते. या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणे नेहमीच अमावास्येला होतात. परंतु, सर्वच अमावास्यांना सूर्यग्रहण होतेच असे नाही.

                       पूर्णाकृती सूर्यग्रहण

पौर्णिमेप्रमाणेच अमावास्यादेखील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली गेली आहे. सोमवारी येणारी अमावास्या सोमवती अमावास्या म्हणतात तर शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिश्चरी अमावास्या म्हणतात. दिवाळीत येणारी अमावास्या लक्ष्मीपूजन म्हणून साजरी केली जाते. तसेच भाद्रपदातील अमावास्या सर्वपित्री अमावास्या म्हणून साजरी केली जाते. वैशाख महिन्यातील अमावास्येला शनी जयंती असते. आषाढी अमावास्येला दिव्याची (दीप) अमावास्या म्हणतात. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. त्या दिवशी बैलपोळा असतो.

पौर्णिमेप्रमाणेच अमावास्येलाही भरतीचे प्रमाण अधिक दिसून येते. पौर्णिमा आणि अमावास्येला येणाऱ्या भरतीला ‘उधाणाची भरती’ असे म्हणतात.

उत्तर भारतात चांद्रमास हा पौर्णिमान्त म्हणजे महिन्यातला शेवटचा दिवस पौर्णिमेचा, तर महाराष्ट्रात अमावास्यान्त महिना म्हणजे अमावास्या हा चांद्रमासाचा शेवटचा दिवस धरला जातो.

 

संदर्भ :

  • नायक, प्रदीप; खग्रास, १९९८.
  • आपटे, मोहन; चंद्रलोक, पुणे, २००८.

समीक्षक : आनंद घैसास