स्थानिक याम्योत्तर वृत्त: निरीक्षकाच्या थेट ऊर्ध्वबिंदूतून (Z) (अंगणात उभे असताना निरीक्षकाच्या थेट डोक्यावर असणारा बिंदू ; Zenith) आणि उत्तर व दक्षिण बिंदूतून जाणारे महत्तम वर्तुळ म्हणजे स्थानिक याम्योत्तर वृत्त. दक्षिण दिशेचे संस्कृत नाव यम आहे तर वृत्त म्हणजे वर्तुळ, म्हणून याम्योत्तर वृत्त हे नाव.

पूर्व क्षितिजावर उगवून पश्चिम क्षितिजाकडे जाणाऱ्या कोणत्याही आकाशस्थ वस्तूला (ग्रह, तारा, चंद्र इ.) याम्योत्तर वृत्त ओलांडून जावेच लागते. ग्रह किंवा तारा याम्योत्तर वृत्तावर (किंवा मध्यमंडलावर) येतो, तेव्हा त्याचे उन्नतांश जास्तीत जास्त असतात. अर्थात हे कमाल उन्नतांश निरीक्षकाचे अक्षांश आणि तारकेची किंवा ग्रहाची क्रांती यावर अवलंबून असतात. या वृत्तामुळे ग्रह किंवा तारा उगवल्यापासून मावळण्यापर्यंतच्या एकूण कालावधीचे दोन समान भाग होतात.  उगवल्यापासून तो याम्योत्तर वृत्तावर येईपर्यंत आणि याम्योत्तर वृत्तापासून तो मावळेपर्यंत समान कालावधी लागतो. उदाहरणार्थ, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अकरा तासाचा कालावधी असेल, (म्हणजे दिनमान अकरा तास असेल) तर सूर्य उगवल्यापासून याम्योत्तर वृत्तावर (मध्यमंडलावर) येईपर्यंत सूर्याला 5 तास 30 मिनिटे लागतील. पुढे तेवढाच कालावधी सूर्यास्तापर्यंत लागेल. सूर्य याम्योत्तरवृत्तावर येणे म्हणजेच माध्यान्ह (Noon) होणे. म्हणजे याम्योत्तर वृत्तामुळे आकाशगोलाचे (Celestial Sphere) पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग होतात. तारा आकाशाच्या पूर्व भागात असेल, तर तो याम्योत्तर वृत्तावर यायचा आहे असा अर्थ होईल. या उलट ग्रह किंवा तारा पश्चिम भागात असेल तर त्याने याम्योत्तर वृत्त आधीच ओलांडले आहे असा अर्थ होईल.

याम्योत्तर वृत्त जगभरातील सर्वांसाठी एकच असणार नाही. ते निरीक्षकाच्या पृथ्वीवरील रेखांशावर अवलंबून असेल. मात्र एकाच रेखावृत्तावरील सर्व निरीक्षकांसाठी याम्योत्तरवृत्त एकच असेल.

याम्योत्तर वृत्तामुळे आकाशाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन समान भाग होत असल्यामुळे याम्योत्तरवृत्ताला मध्यमंडल (Meridian) असेही म्हणतात.

सूचना: माध्यान्ह होते तेव्हा सूर्य Z  बिंदूवरच (बरोबर डोक्यावर) असतो असे नाही. अक्षांशांप्रमाणे आणि वर्षाच्या कोणत्या दिवशी आपण सूर्य पाहातो आहोत, त्याप्रमाणे त्याचे Z बिंदूसंदर्भातील स्थान (उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे) बदलते असते. मात्र माध्यान्हवेळी सूर्य याम्योत्तरवृत्तावर असतो हे नक्की.

समीक्षक: आनंद घैसास