चंद्राच्या कला : चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करीत असतो. पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही एकमेकांसोबत सूर्याभोवती फिरत आहेत. चंद्र जरी आकाराने गोल चेंडूसमान असला, तरी तो खूप दूर असल्याने पृथ्वीवरून मात्र चंद्रबिंब सपाट वर्तुळाकार वाटते. चंद्र हा ताऱ्यांप्रमाणे स्वयंप्रकाशित वस्तू नाही. चंद्रावर सूर्याचा जो प्रकाश पडतो, तो परावर्तित होतो, त्यामुळे चंद्राचा तेवढाच प्रकाशित झालेला भाग आपल्याला दिसतो. चंद्राच्या परिभ्रमणातील त्याच्या पृथ्वीच्या संदर्भात असणाऱ्या विविध स्थानांमुळे, त्यावर पडणाऱ्या प्रकाशित भागाचेच दर्शन आपल्याला होत असते, परंतु त्याचा अंधारातला भाग पटकन समजून येत नाही. अर्थात, जे प्रकाशित चंद्रबिंब वेगवेगळ्या आकारात आपल्याला दिसते, त्यालाच आपण चंद्राच्या कला असे म्हणतो. या कला रोज बदलताना आपल्याला जाणवतात. कधीकधी चंद्रकोर दिसत असताना चंद्राचा अंधारातला भागही पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे करड्या रंगात दिसून येतो.

 

चंद्राचा पृथ्वीभोवती एक फेरी मारण्याचा कालावधी २७.३ दिवसांचा आहे.  वर्तुळाचे एकूण ३६० अंश ÷ २७ = १३.३ अंश. म्हणजे चंद्र रोजच आकाशात सुमारे १३.३ अंश पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आपल्याला दिसतो. या चंद्राच्या १३ अंशातून पुढे जाण्यालाच तिथी असे ओळखतात. या काळात पृथ्वीही चंद्राला सोबत घेऊन तिच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत पुढे जात असते. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकदा एका रेषेत आले, (असे अमावास्येला होते) की परत तसे ते एका रेषेत येण्यासाठी लागणारा कालावधी मात्र २७.३ दिवसांपेक्षा थोडा अधिक म्हणजे सुमारे २९.५ दिवस होतो. त्यालाच आपण सुमारे ३० दिवसांचा एक चांद्रमास – भारतीय कालगणनेत महिना – असे ओळखतो. या संपूर्ण काळात आपल्याला चंद्राच्या विविध कला दिसतात. या कला अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत सुमारे पंधरा दिवस वाढत जाणाऱ्या, तर पौर्णिमा ते अमावास्या हे पंधरा दिवस लहान लहान होत जाणाऱ्या दिसतात. कला वाढत जाणाऱ्या पंधरा दिवसांना ‘शुक्लपक्ष’, तर कला लहान होत जाणाऱ्या पंधरा दिवसांना ‘कृष्णपक्ष’ असे ओळखले जाते.

चंद्रावर पडणारा सूर्यप्रकाश एकसारखा असला तरी आपल्याला दिसणारा चंद्राचा प्रकाशित भाग मात्र आपल्या त्याच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे कमी अधिक होत राहतो.

प्रत्येक कला ही चंद्राचा किती पृष्ठभाग आपल्याला प्रकाशित दिसतो त्यावर अवलंबून असते. अमावास्येच्या स्थितीमध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अशी सरळ रेषेत स्थिती असते. जर ते एकाच प्रतलात आले, तर अशा वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. जिथे ती सावली पडते, त्या सावलीच्या भागातून सूर्यग्रहण दिसते. या स्थितीत चंद्राचा प्रकाशित भाग हा आपल्या विरुद्ध बाजूला असतो. तर अंधाराचा भाग आपल्याकडे. अर्थात तेव्हा चंद्रबिंब अंधारलेले असते. तसेच त्यावेळी दिवसा सूर्यासोबतच चंद्र आकाशात प्रवास करत असतो. आकृतीमध्ये ०% ही अमावास्येची स्थिती दाखवलेली आहे.

अमावास्येनंतर चंद्र पूर्वेच्या दिशेने पुढे सरकताना, आपल्याला चंद्राचा अधिकाधिक प्रकाशित भाग चंद्रकोरीच्या स्वरूपात दिसायला लागतो. याला आपण शुक्ल पक्षातील चंद्र असे संबोधतो. अशावेळी सूर्यास्तानंतर आपल्याला जेव्हा २५% प्रकाशित चंद्रकोर दिसते, त्या स्थितीला शुक्ल (किंवा शुद्ध) चतुर्थी असे म्हणतात.

चंद्र जसजसा पुढे सरकतो आणि पृथ्वीच्या संदर्भात सूर्याशी ९० अंशाचा कोन करतो, तेव्हा आपल्याला चंद्राचा ५०%  भाग प्रकाशित दिसतो. याला आपण शुक्ल अष्टमी असे म्हणतो.

शुक्ल एकादशी : या स्थितीमध्ये चंद्राचा ७५% भाग आपल्याला प्रकाशित दिसतो.

सूर्य आणि चंद्र हे जेव्हा पृथ्वीच्या संदर्भात एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात, तेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते. त्यामुळे या स्थितीत आपल्याला चंद्राचे बिंब १००%  प्रकाशित दिसते. याला आपण पौर्णिमा म्हणतो. या स्थितीमध्ये जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका समान प्रतलात आले, एका रेषेत आले, तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होते.

पौर्णिमेनंतर चंद्र कक्षेत पुढे गेल्यावर त्यावर पडणारा सूर्यप्रकाश हळूहळू कमी होत गेलेला आपल्याला दिसतो. याला आपण कृष्णपक्ष असे म्हणतो. या स्थितीत जेव्हा आपल्याला चंद्राचा ७५% भाग प्रकाशलेला दिसतो, त्याला कृष्ण चतुर्थीची चंद्रकोर असे आपण म्हणतो.

पौर्णिमेनंतर सुमारे एक आठवड्याने, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांची स्थिती पुन्हा ९० अंशाच्या कोनात येते.  तेव्हा आपल्याला चंद्राचा ५०% भागच प्रकाशलेला दिसतो, त्याला आपण कृष्ण अष्टमी संबोधतो.

त्यानंतर आपल्याला चंद्रबिंब जेव्हा फक्त २५% प्रकाशलेले दिसते, तेव्हा आपण ती कृष्ण एकादशी आहे असे म्हणतो.

चंद्राची ही सूर्यसापेक्ष एक फेरी जेव्हा पूर्ण होते, म्हणजे तो पुन्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य अशा स्थितीत, सूर्याच्या दिशेला येतो, तेव्हा पुन्हा अमावास्या होते.

संदर्भ :

समीक्षक : आनंद घैसास