धनिष्ठा नक्षत्र :

नक्षत्रचक्रातील धनिष्ठा हे २३ वे नक्षत्र आहे. धनिष्ठा नक्षत्राचे २ चरण मकर राशीत तर २ चरण कुंभ राशीत समाविष्ट आहेत. धनिष्ठेच्या एका बाजूला शर तारकासमूह म्हणजे (Sagitta Constellation), आणि जंबुक (Vulpecula Constellation ) हे तारकासमूह आहेत, तर त्यांच्या विरुद्ध बाजूला अश्वमुख (Equules Constellation) हा तारकासमूह आहे. धनिष्ठेचे पाश्चात्य नाव डेल्फिनस (Delphinus Constellation) असून तो सगळ्यात छोटा तारकासमूह म्हणून प्रसिद्ध आहे. डॉल्फिन या माशासारख्या आकारावरून हे नाव त्याला दिलेले आहे. तसेच त्याच्या लांबट आयतासारख्या आकारामुळे  त्याला ‘जॉबची शवपेटी’ ‘Job’s Coffin’ असेही एक नाव आहे.

धनिष्ठेत ५ तारे समाविष्ट आहेत. आपल्याकडे ‘धनिष्ठा पंचक’ या नावानेच ते माहिती आहेत. यातले ५ तारे म्हणजे सुआलोसिन (Sualocin; Alpha Delphini), रोटनेव (Rotanev; Beta Delphini), डेल्टा डेल्फिनी (Delta Delphini), गॅमा डेल्फिनी (Gamma Delphini) आणि अल्‍डल्फिन (Aldulfin; Epsilon Delphini).

सुआलोसिन हा तारा या नक्षत्रातला सगळ्यात तेजस्वी तारा असून तो एक नव्हे तर सात A, B, C, D, E आणि F अशा वेगवेगळ्या ताऱ्यांनी एकत्रित दिसणारा तारा आहे. त्याची एकत्रित दृश्यप्रत ३.७७ इतकी आहे. त्यातील सुआलोसिन तारा एक तारा नाही, तर Aa आणि Ab हे दोन प्रत्यक्ष द्वैती असणारे तारे तेथे आहेत, तर B,C,D,E आणि F हे सारे त्यांच्या आसपास दिसणारे, नजरेच्या टप्प्यात शेजारी शेजारी येणारे, पण एकमेकांशी संबंध नसणारे ‘जोड तारे’ म्हणता येतील. गंमत म्हणजे हे B, C, D, E आणि F तारेही प्रत्येकी द्वैती तारे आहेत असे आता माहीत झाले आहे.  सुआलोसिन Aa आणि Ab आपल्या पासून अंदाजे २४१ प्रकाशवर्षे दूर असून B9V या वर्णपटीय प्रकारात मोडतात.

सुआलोसिन Sualocin हे नाव यातल्या अल्फा ताऱ्याला आणि रोआनेव्ह Roanev हे नाव बीटा ताऱ्याला इटालियन खगोलशास्त्रज्ञ Niccolo Cacciatore याने दिले होते. हा ग्युसेप्प पियाझीचा सहकारी होता आणि त्याने केलेल्या यादीत ही नावे प्रथम आलेली दिसतात. गंमत म्हणजे त्याच्या स्वत:च्या नावाची लॅटिन आवृत्ती Nicolaus Venator अशी होते आणि त्याचे स्पेलिंग उलट केले तर Sualocin आणि Rotanev हा शब्द होतो. आपल्याच नावाचा त्याने असा वापर केला हे मात्र खूप नंतर समजून आले. मात्र आय.ए.यू.च्या नव्या नियमांनुसार सुआलोसिन हे नाव यातल्या फक्त Aa याच ताऱ्याचे मानले जाणार आहे.

या तारकासमूहाशी संबंधित ग्रीक पुराणात दोन/तीन मनोरंजक कथा आहेत. वैदिक ऋषी धनिष्ठांना ‘श्रविष्ठा’ असेही म्हणत. ‘चतस्त्रो देवी रजरा: श्रविष्ठा:’ या मंत्रात मात्र धनिष्ठांच्या ४ तारकाच मानलेल्या दिसतात.

संदर्भ :

  • परांजपे, गो. रा. सृष्टीज्ञान, आकाश दर्शन ॲटलास किंवाहा तारा कोणता ? महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९७२.
  • जोशी, पं. महादेवशास्त्री, नक्षत्र लोक, पुणे, २०११.
  • दीक्षित, शंकर बाळकृष्ण, ज्योतिर्विलास अथवा रात्रीची दोन घटका मौज, पुणे, १९०४.

समीक्षक : आनंद घैसास